वर्ष २०२३ पेक्षा यंदा दीडशेहून अनेक गुन्हे उघड
नवी मुंबई – नवी मुंबई शहरात अमली पदार्थ विक्रीच्या संदर्भातील गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. वर्ष २०२४ मध्ये यासंदर्भातील ६५४ प्रकरणे उघड झाली, तर वर्ष २०२३ मध्ये अमली पदार्थांच्या गुन्ह्याचे प्रमाण ४७५ इतके होते. रेव्ह पार्टी किंवा इतर तस्करी यांच्या माध्यमातून अमली पदार्थ तरुण-तरुणींपर्यंत पोचवले जातात.
नवी मुंबईत गांजा आणि ब्राऊन शुगर हे मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात येत आहेत. वर्ष २०२४ मध्ये ६७ लाख ८३ सहस्र रुपयांचा गांजा, तर ३० लाख १० सहस्र रुपयांची ब्राऊन शुगर जप्त करण्यात आली आहे. ६७ लाख ८१ सहस्र रुपयांची चरस आणि ५५ सहस्र रुपयांचे मेथाडोन जप्त करण्यात आले. तसेच जप्त केलेल्या मद्याची एकूण किंमत ३३ कोटी २७ लाख रुपये आहे. यंदा अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत गुन्ह्यांमध्ये ९३९ जणांना अटक झाली, तर गेल्या वर्षी ८११ जणांना अटक झाली होती. यावर्षी अटकेत असलेल्यांपैकी ५८ जण विदेशी नागरिक आहेत. यांमध्ये प्रामुख्याने आफ्रिकी नागरिकांचा समावेश आहे. वर्ष २०२३ मध्ये अटक केलेल्यांमध्ये ३७ परदेशी नागरिक होते.