France, 8 Convicted : फ्रान्समधील शिक्षक हत्या प्रकरणी ८ दोषींना ३ ते १६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

प्रेषित महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या कथित आरोपाचे प्रकरण

फ्रान्स न्यायालय

पॅरिस – प्रेषित महंमद पैगंबरांचे व्यंगचित्र दाखवल्याच्या कथित आरोपावरून शिक्षकाची हत्या केल्याच्या प्रकरणी फ्रान्सच्या न्यायालयाने ८ आरोपींना दोषी ठरवले आहे. विशेष न्यायालयाने आरोपींना ३ ते १६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. आरोपींमध्ये ७ पुरुष आणि १ महिला यांचा समावेश आहे. वर्ष २०२० मध्ये सॅम्युअल पॅटी नावाच्या शिक्षकाची पॅरिसमध्ये १८ वर्षीय अब्दुल्लाख अंझोरोव्ह नावाच्या मुसलमानाने हत्या केली होती. या आक्रमणानंतर काही घंट्यांनी अंझोरोव्ह याला पोलिसांनी ठार केले होते.


न्यायालयाने अंझोरोव्हचे २ मित्र नईम बौदौद (वय २२ वर्षे) आणि अझीम अप्सिरखानोव्ह (वय २३ वर्षे) यांना आरोपीला साहाय्य केल्याच्या प्रकरणी प्रत्येकी १६ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. पॅटीविरुद्ध द्वेष पसरवल्याविषयी न्यायालयाने कट्टर इस्लामी गटाशी संबंधित अब्देलहकिम सेफ्रिओई याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यासह पॅटी यांच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्याचे वडील ब्राहिम चनिना यांना पॅटी यांच्या विरोधात खोट्या ‘पोस्ट’ प्रसारित केल्याच्या प्रकरणी १३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अन्य ४ आरोपींना वेगवेगळ्या प्रकरणात दोषी ठरवून त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.