|
नागपूर, २१ डिसेंबर (वार्ता.) – राज्याची कायदा-सुव्यवस्था राखण्यास सत्ताधारी सरकार अपयशी ठरले आहे. कापूस, सोयाबीन, तूर उत्पादक शेतकर्यांना त्यांनी देशोधडीला लावले आहे. महाराष्ट्रातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकली आहे. अन्न आणि औषध प्रशासनावरही नियंत्रण ठेवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. पोलीस सत्ताधार्यांच्या हातातील बाहुले बनले असून सत्ताधार्यांनी पोलीस बळाचा वापर करून विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूक काळात तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. जनतेचे हित न साधता स्वतःचे हित जपणारे हे स्वार्थी आणि अकार्यक्षम सरकार आहे, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी २० डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील भाषणात केली.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की,
१. ‘राज्य थांबणार नाही’, हे ब्रीदवाक्य सरकार सतत म्हणत आहे. गेल्या अधिवेशनाची परिस्थिती पाहिली, तर राज्य कोणत्या क्षेत्रात पुढे गेले ? असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात आहे.
२. ५ डिसेंबर या दिवशी शपथविधी होऊनही सरकारला अद्याप खाते वाटप करता आले नाही. गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध जिल्ह्यांत घडलेल्या घटनांकडे सरकारने पाठ फिरवली आहे.
३. राज्यातील शिक्षण, आरोग्य, उद्योग विभाग यांची परिस्थिती भयावह आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने घोषित केलेल्या आकडेवारीत उत्तर प्रदेशचा गुन्हेगारीत पहिला क्रमांक, तर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे.
४. मागील वर्षात सरासरी १२६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. वर्ष २०२३ मध्ये ४५ सहस्र ४३४ महिला अत्याचारांच्या घटना नोंदवल्या असून सायबर गुन्ह्यांत राज्य ४ थ्या क्रमांकावर आहे.
५. पुणे येथील कारागृहात कारागृह अधिकारी पठाण यांना मारण्याचा प्रयत्न झाला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुसलमानांचे पुणे येथे वास्तव्य आहे.
६. सत्ताधारी आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून त्यांची हत्या झाली आहे. सत्ताधार्यांची ही स्थिती असेल, तर सर्वसामान्य जनतेची स्थिती काय असेल ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
७. ते म्हणाले की, बीड येथील सरपंच संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येतील आरोपी वाल्मिकी कराड हा मंत्र्याच्या जवळचा कार्यकर्ता आहे. गेले ४ दिवस त्याचे नागपूर येथे वास्तव्य असतांना पोलीस त्याला पकडू का शकले नाहीत ? असा प्रश्न उपस्थित करत आरोपींना राजकीय आश्रय देणार्यांवर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी केली.
८. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७५ खुनाच्या घटना समोर आल्या असून जिल्ह्यात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूर येथे ‘हिट अँड रन’च्या घटना घडल्या; मात्र नागपूर येथील घटनेत मंत्र्याच्या मुलाला अटक करण्यात आलेली नाही.