१० सहस्र कार्यकर्ते संचलनात सहभागी !
मुंबई – ‘गीता जयंती’चे औचित्य साधून बजरंग दल शौर्य दिवसाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमांचे आयोजन करते. या वर्षी बजरंग दलाच्या वतीने कोकण प्रांतात एकूण ४ ठिकाणी शौर्य संचलन/यात्रांचे आयोजन करण्यात आले होते. १५ डिसेंबर या दिवशी राजा बडे चौक येथे पार पडलेल्या संचलनासाठी १० सहस्र कार्यकर्ते उपस्थित होते. संचलनानंतर छत्रपती शिवाजी पार्क येथे भारतीय सैन्यदलातील कमांडर भूषण देवन आणि पू. स्वामी विज्ञानानंद यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी इस्लामी आक्रमकांनी आक्रमण केलेली ३० सहस्र मंदिरे परत घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
‘वर्ल्ड इकॉनोमिक फोरम’चे संस्थापक पू. स्वामी विज्ञानानंद म्हणाले, ‘‘आपण शूरवीर, परमप्रतापी योद्ध्यांचे वंशज आहोत. या देशावर कित्येक आक्रमकांनी आक्रमण केले; परंतु तरीही या देशाची सभ्यता-संस्कृती कुणीही मिटवू शकले नाही. बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार करणार्या सर्व जिहाद्यांनासुद्धा सांगू इच्छितो की, भारतीय सेना ही ढाक्यापर्यंत घुसून यांचा माज उतरवू शकते. हिंदूंनी इथून पुढे शत्रूप्रती कसलीही दया न दाखवता त्यांना त्यांच्या भाषेत आक्रमकतेने उत्तर दिले पाहिजे. बॉलिवूडचे अभिनेते नाही, तर देशासाठी बलीदान देणारे क्रांतीकारक आपल्यासाठी आदर्श आहेत.’’ या प्रसंगी विवेक कुलकर्णी, मोहन सालेकर, राजेंद्र पवार, श्रीराज नायर, रणजित जाधव यांसह अन्य उपस्थित होते.