|
नागपूर, १६ डिसेंबर (वार्ता.) – संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा, यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून दिल्या जाणार्या ‘कवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराच्या रकमेत शासनाने १ लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. नागपूर येथील ‘कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालया’द्वारे प्रतीवर्षी हा पुरस्कार दिला जातो; मात्र मागील ६ पुरस्कारांच्या वितरणाचा निधीही सरकारकडून विश्वविद्यालयाला देण्यात आला नव्हता. दैनिक ‘सनातन प्रभात’ने सर्वप्रथम हा प्रकार वृत्ताद्वारे उघड करून वेळोवेळी याविषयीची वृत्ते प्रसिद्ध केली होती. या दोन्ही मागण्यांवर शासनाने कार्यवाही केली असून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये १६ डिसेंबर या दिवशी महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार योजना यांसाठी पुरवणी मागण्यांमध्ये २३ लाख ६८ सहस्र रुपये इतका निधी संमत केला आहे.
संस्कृतचा प्रचार-प्रसार करणारे प्राध्यापक, शिक्षक, पुरोहित, कार्यकर्ते आदी ८ जणांना ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्कार दिला जातो. यामध्ये सन्मान चिन्हासह प्रत्येकी २५ सहस्र रुपये दिले जात होते. वर्ष २०१२ पासून हा पुरस्कार देण्यात येत आहे; मात्र मागील १२ वर्षांमध्ये या पुरस्काराच्या रकमेत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. उर्दू भाषेच्या प्रसार-प्रसारासाठी प्रतिवर्षी १० हून अधिक पुरस्कार आणि कार्यक्रम राबवले जातात. त्यासाठी लाखो रुपयांचा निधी व्यय होत असल्याची आकडेवारीही दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्यात आली होती. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये संस्कृत भाषेसाठी दिलेल्या जाणार्या ८ पुरस्कारांसाठी प्रत्येकी १ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने पुरस्काराविषयी उघड केलेली अन्य सूत्रे !
१. या पुरस्काराविषयी काढण्यात आलेल्या शासन आदेशामध्ये ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार संस्कृतदिनाच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी देण्यात यावा’, असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे; मात्र एकदाही हा पुरस्कार संस्कृत दिनाच्या दिवशी देण्यात आलेला नाही. तरी प्रतीवर्षी संस्कृतदिनाच्या दिवशी पुरस्कार प्रदान करून त्याचा सन्मान राखावा.
२. वर्ष २०१५ ते २०२० मधील ६ वर्षांचे महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वर्ष २०२१ मध्ये एकदम दिले गेले. त्यापूर्वीही २-३ वर्षांचे पुरस्कार एकदम दिले गेले. हा पुरस्कार प्रतिवर्षी देण्यात यावा, असे शासन आदेशात असूनही त्याप्रमाणे होत नाही.
पुरस्कार सोहळ्याच्या रखडवलेल्या निधीसाठीही पैसे संमत !
वर्ष २०१५ ते २०२० या काळातील पुरस्कारांच्या सोहळ्यासाठी कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाकडून १८ लाख १७ सहस्र ९५८ रुपये इतका निधी व्यय करण्यात आला होता; मात्र सरकारकडून ही रक्कम अद्यापही देण्यात आलेली नाही. हा प्रकार दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आला होता. हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये हा निधीही शासनाकडून संमत करण्यात आला आहे.
हिंदु जनजागृती समितीचे महत्त्वपूर्ण योगदान !दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे तत्कालीन मंत्री चंद्रकांत पाटील यांना ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्काराचा निधी वाढवावा, तसेच हा पुरस्कार वेळच्या वेळी दिला जावा’, अशी मागणी करण्यात आली होती. हिंदु जनजागृती समिती आणि समितीच्या सुराज्य अभियानाद्वारे हे सूत्र सातत्याने सरकारकडे लावून धरण्यात आले होते. समितीच्या या मागणीला यश आले आहे. |