दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्ते आणि हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केलेली तक्रार यांचा परिणाम !
मुंबई, ३ सप्टेंबर (वार्ता.) – कवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार प्रदान करण्याविषयी कालिदास संस्कृत विद्यापीठ, सरकार आणि प्रशासन यांच्या उदासीन धोरणाविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सलग काही दिवस वृत्तांसह लेख प्रसिद्ध झाला होता. यानंतर हिंदु जनजागृती समितीने याविषयी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडे तक्रार केली. त्यामुळे उच्च शिक्षण विभाग आणि कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ यांनी हा पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यवाहीला प्रारंभ केला आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २ सप्टेंबर २०२२ च्या अंकामध्ये पृष्ठ क्रमांक १ वर ‘महाराष्ट्रात महाकवी कालिदास पुरस्कार वितरणाचा केला जात आहे सोपस्कार’ हे वृत्त ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आले होते. यावर फेब्रुवारी २०२३ मध्ये हिंदु जनजागृती समितीने या प्रकरणी उच्च शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली. यानंतर दैनिक ‘सनातन प्रभात’ मधील वृत्ते आणि समितीच्या वतीने घेण्यात आलेला पाठपुरावा, यांमुळे ६ जून २०२३ या दिवशी सरकारच्या उच्च शिक्षण विभागाने हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा उल्लेख करत पुणे येथील संचालकांना पत्र पाठवले. या पत्रानंतर जून मासातच सरकारकडून पुरस्काराची विज्ञापन देण्यात आली. सध्या पुरस्कारासाठीचे अर्ज प्राप्त झाले असून त्याची पडताळणी शेष आहे.
पुढील आठवड्यात छाननी समिती बैठक घेणार !
याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने नागपूर येथील कालिदास संस्कृत विश्वविद्यापिठाच्या पुरस्कार समितीच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधला असता येत्या आठवड्यात छाननी समितीची बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाची प्रतही प्राप्त झाल्याचे सांगून छाननी समितीच्या बैठकीनंतर पुढील कार्यवाही चालू होईल, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पुरस्कार प्रदान करण्याची प्रशासकीय कार्यवाही करणार्या उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विश्वविद्यापिठात कुलगुरूंची नियुक्ती झाली नसल्याने पुरस्कार प्रदान करण्याच्या प्रक्रियेत विलंब झाल्याचे सांगत यापुढील कार्यवाही चालू करण्यात आल्याचे सांगितले.
दैनिक ‘सनातन प्रभात’ने यासाठी उठवला आवाज !
१. संस्कृतसाठी एकमात्र असलेल्या या पुरस्कारामध्ये वर्ष २०१३ पासून १ रुपयाचीही वाढ केलेली नाही. या उलट उर्दू भाषेसाठी वर्षभरात १३ हून अधिक पुरस्कार दिले जातात. त्यावर ६६ लाख रुपयांहून अधिक व्यय होतो.
२. संस्कृत विश्वविद्यापिठाला पुरस्काराची मागील ६ वर्षांचे १८ लाख रुपये शासनाकडून अद्याप मिळालेले नाही.
३. शासन आदेशात ‘संस्कृतदिनी पुरस्कार द्यावा’, असा स्पष्ट आदेश असूनही आतापर्यंत एकदाही हा पुरस्कार ‘संस्कृतदिनी’ देण्यात आलेला नाही. २-३ वर्षांचे पुरस्कार एकदम दिले गेले आहेत. वर्ष २०२१ मध्ये वर्ष २०१५ पासूनचे ६ पुरस्कार एकदम देण्यात आले.
सनातन प्रभात:#Exclusive : दीड वर्ष निवड आणि छाननी समितीच्या बैठका झाल्याच नाहीत ! कालिदास संस्कृत विश्वविद्यालय ८ वर्षांपासून पुरस्काराच्या निधीपासून वंचित ! |