महाराष्ट्रात ‘महाकवी कालिदास’ पुरस्कार वितरणाचा केला जात आहे सोपस्कार !

२-३ वर्षांचे पुरस्कार एकत्रित प्रदान करणार

मुंबई, २ सप्टेंबर (वार्ता.) – संस्कृत भाषेचा प्रचार, प्रसार, संशोधन, प्रकाशन, अध्ययन, अध्यापन आणि संस्कृत भाषेविषयी अन्य उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना महाराष्ट्र सरकारच्या वतीने ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. प्रतिवर्षी संस्कृतदिनाच्या दिवशी या पुरस्काराचे वितरण करण्याचा शासनाचा आदेश आहे. प्रत्यक्षात मात्र संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी असलेले हे पुरस्कार संस्कृतदिनी दिलेच जात नाहीत. हेच काय, तर संस्कृतदिनापर्यंत या पुरस्कारांची घोषणाही होत नाही. सरकारच्या सवडीनुसार कधीही या पुरस्कारांचे वितरण होत आहे. मागील काही वर्षांत तर २-३ वर्षांचे पुरस्कार एकदम प्रदान करण्याची प्रथा चालू करून पुरस्कार वितरणाचा सोपस्कार पार पाडला जात आहे.

१. राज्य सरकारच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाकडून या पुरस्काराचे वितरण केले जाते. वर्ष २०१२ मध्ये ‘महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार’ या नावाने शासनाकडून आदेश काढण्यात आला आहे. यामध्ये पुरस्कार संस्कृतदिनी म्हणजे नारळी पौर्णिमेच्या दिवशी देण्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र वर्ष २०१३ पासून एकदाही हा पुरस्कार संस्कृतदिनाच्या दिवशी देण्यात आलेला नाही.

२. सरकारच्या सोयीनुसार ऑक्टोबर, डिसेंबर या मासांत, म्हणजे कधीही पुरस्कार घोषित केले जात आहेत. यामध्ये पुरस्कार घोषित झालेल्या काही मान्यवरांचे निधन झाल्यामुळे त्यांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्याची वेळ आल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

३. वर्ष २०१६ आणि वर्ष २०१७ या २ वर्षांचे पुरस्कार वर्ष २०१८ मध्ये, तर वर्ष २०१८, २०१९ आणि २०२० या वर्षांचे पुरस्कार वर्ष २०२१ मध्ये एकत्रित देण्यात आले. वर्ष २०२१ चा पुरस्कार अद्यापही घोषित झालेला नाही. अशा प्रकारे ‘महाकवी कालिदास’ यांच्या नावाने संस्कृत भाषेच्या उत्कर्षासाठी दिल्या जाणार्‍या पुरस्कारकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे.

४. प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत कार्यकर्ता आणि अन्य राज्यातील संस्कृत अभ्यासक आदींसाठी प्रत्येकी १, तर संस्कृत शिक्षक आणि प्राध्यापक यांना प्रत्येकी २ असे एकूण ८ पुरस्कार दिले जातात.

पुरस्काराच्या रकमेत १ रुपयाचीही वाढ नाही !

‘महाकवी कालिदास संस्कृत साधना’ या नावाने प्राचीन संस्कृत पंडित, वेदमूर्ती, संस्कृत शिक्षक, संस्कृत प्राध्यापक, संस्कृत कार्यकर्ते या पात्रतेतील ८ पुरस्कार महाराष्ट्र शासनाकडून प्रदान केले जातात. पुरस्कार चालू केल्यापासून म्हणजे मागील ९ वर्षांत पुरस्कारासाठी दिल्या जाणार्‍या या रकमेत १ रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. याउलट राज्यात उर्दू भाषा आणि साहित्य यांच्या उत्कर्षासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जात आहे. काही थातूरमातूर कार्यक्रम दाखवून उर्दू भाषेच्या विकासासाठी राज्यात आलिशान इमारती बांधण्यात आल्या आहेत. राज्यात नांदेड, मालेगाव आणि सोलापूर येथे बांधण्यात आलेल्या इमारतींसाठी १५ कोटी ४८ लाख रुपयांपर्यंत निधीचे वितरण करण्यात आले आहे. यासह नागपूर आणि मुंबई येथे उर्दू घरे प्रस्तावित आहेत. एकीकडे उर्दू भाषेच्या उत्कर्षासाठी सरकारी तिजोरीतून कोट्यवधी रुपयांचा व्यय होत असतांना देवभाषा संस्कृत मात्र उपेक्षित आहे.

संपादकीय भूमिका

उर्दू भाषेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी; मात्र ९ वर्षांत संस्कृत भाषेच्या पुरस्कारात एक रुपयाचीही वाढ नाही !