बांगलादेशात सेनादल घुसवा, अन्‍यथा येथील बांगलादेशी घुसखोरांना शोधून पळवून लावू ! – नितीन शिंदे, प्रदेशाध्‍यक्ष, हिंदु एकता आंदोलन

सांगली येथे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्‍याचारांच्‍या निषेधार्थ हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे धरणे आंदोलन !

आंदोलनाच्या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांनी बांगलादेशाच्या प्रतिकात्मक ध्वजाचे दहन केले

सांगली, ५ डिसेंबर (वार्ता.) – गेली अनेक महिने बांगलादेशातील हिंदूंवर अनन्‍वित अत्‍याचार करून तेथील जिहाद्यांकडून त्‍यांचे शिरकाण केले जात आहे. बांगलादेशात सेनादल घुसवून तेथील हिंदूंवरील अत्‍याचार थांबवा, अन्‍यथा हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटना आणि हिंदु एकता आंदोलन संघटना या देशात अनधिकृत वास्‍तव्‍य करत असलेल्‍या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून पळवून लावतील, अशी चेतावणी हिंदु एकता आंदोलनाचे प्रदेशाध्‍यक्ष श्री. नितीन शिंदे यांनी येथे दिली.

आंदोलनात मार्गदर्शन करतांना माजी आमदार श्री. नितीन शिंदे

बांगलादेशामधील इस्‍कॉन मंदिराचे पुजारी चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांना अनधिकृतपणे अटक आणि हिंदूंवर होत असलेले अत्‍याचार यांच्‍या निषेधार्थ हिंदु एकता आंदोलनाच्‍या वतीने ५ डिसेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता येथील महानगरपालिका समोरील शाळा क्रमांक १ जवळ धरणे आंदोलन करण्‍यात आले. त्‍या वेळी ते बोलत होते. या आंदोलनात हिंदुत्‍वनिष्‍ठ मोठ्या संख्‍येने उपस्‍थित होते. हिंदुत्‍वनिष्‍ठांनी दिलेल्‍या घोषणामुळे सर्व परिसर दणाणून गेला.

धरणे आंदोलनात घोषणा देतांना हिंदुत्‍वनिष्‍ठ

उपस्‍थित मान्‍यवर…

आंदोलनात ‘इस्‍कॉन’चे सर्वश्री माधव देशमुख, अवधूत राजमाने, शुभानंद प्रभु, हिंदु एकता आंदोलनाचे जिल्‍हाध्‍यक्ष श्री. संजय जाधव, शहरप्रमुख श्री. प्रकाश चव्‍हाण, हिंदुत्‍वनिष्‍ठ सर्वश्री अनिरुद्ध कुंभार, अवधूत जाधव, सुनील पोळ, भाजपचे श्री. बाळकृष्‍ण बेलवलकर, श्री. सुधाकर साळुंखे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. किरण कुलकर्णी, श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचे श्री. चैतन्‍य तांबोळकर यांसह हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांचे सदस्‍य आणि पदाधिकारी उपस्‍थित होते.

मान्‍यवरांचे मनोगत…

१. बांगलादेशातील इस्‍कॉनचे प्रमुख चिन्‍मय कृष्‍णदास प्रभु यांना नियमबाह्य रितीने अटक करण्‍यात आली असून त्‍यांची त्‍वरित सुटका करण्‍यात यावी, अशी मागणी सांगली येथील ‘इस्‍कॉन’चे संत पू. मत्‍स्‍यअवतार प्रभु यांनी केली.

२. ‘इस्‍कॉन’चे श्री. गोपीनाथ दास प्रभु यांनी ‘बांगलादेशातील हिंदूंचे प्रतिनिधीत्‍व करणारे चिन्‍मय प्रभु, त्‍यांचे अनुयायी आणि हिंदूंचे रक्षण करण्‍यासाठी भारताने धडक कृती करावी’, अशी मागणी केली.

३. भाजपचे श्री. श्रीकांत शिंदे म्‍हणाले की, बांगलादेशाशी राजकीय, व्‍यापारी आणि अन्‍य सर्व प्रकारचे संबंध भारताने तोडून बांगलादेशाची आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर कोंडी करावी.