Bangladesh Hindu Houses and Temples Vandalized : बांगलादेशात हिंदु तरुणाकडून फेसबुक पोस्टद्वारे मौलानाच्या कथित अवमान केल्यावरून हिंदूंवर आक्रमणे

  • १३० घरे आणि २० हिंदु मंदिरांची तोडफोड

  • २०० हिंदु कुटुंबांचे पलायन

हिंदूंची अनेक घरे आणि मंदिरे यांची तोडफोड

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील सुनामगंज जिल्ह्यात एका हिंदु तरुणाने फेसबुकवरून कथित पोस्ट केल्यावरून धर्मांध मुसलमानांनी हिंदूंची अनेक घरे आणि मंदिरे यांची तोडफोड केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस आणि सैन्य तैनात करण्यात आले आहे. ३ डिसेंबर या दिवशी या २१ वर्षीय आकाश दास नावाच्या हिंदु तरुणाने ‘हेफाजत-ए-इस्लाम’ संघटनेचे नेते मौलाना (इस्लामाचा अभ्यासक) मुफ्ती मामूनुल हक यांच्यावर फेसबुक पोस्टमध्ये टीका केल्याचा आरोप आहे. दोराबजारमध्ये धर्मांध मुसलमानांच्या जमावाने १३० घरे आणि २० हिंदु मंदिरांची तोडफोड केली. यामुळे येथील २०० हिंदु कुटुंबांना पलायन केले आहे. आक्रमणाच्या घटनांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाली आहेत. ही घटना पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी आकाश दास याला अटक केली आहे.

१. सुनामगंज शहरातील केंद्रीय लोकनाथ मंदिराचे सरचिटणीस खोकन रॉय यांनी सांगितले की, मुसलमानांनी लोकनाथ मंदिराची तोडफोड केली आणि १५ लाख रुपयांहून अधिक किमतीच्या मौल्यवान वस्तू चोरल्या. सुमारे १०० घरांचीही हानी झाली आहे. उपजिल्हा पूजा उद्यापन परिषदेचे अध्यक्ष गुरु डे यांच्या घराची आणि तेथील मंदिराची तोडफोड करण्यात आली. मुसलमानांनी सोन्याच्या दागिन्यांची अनेक दुकाने आणि हिंदूंची दुकानेही लुटली.

२. सुनामगंजच्या या घटनेनंतर हिंदू प्रश्‍न विचारत आहेत की, जर ही चूक एका व्यक्तीने केली असेल, तर त्यासाठी त्यांना शिक्षा का भोगावी लागत आहे ?

संपादकीय भूमिका

  • सामाजिक माध्यमांतून कथित अवमान झाल्याचा बनाव करून हिंदूंवर आक्रमण करण्याच्या घटना बांगलादेशात गेल्या काही वर्षांपासून चालू आहेत. याला ‘सामाजिक माध्यम जिहाद’ असे कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • बांगलादेशातील हिंदूंचा वाली भारत किंवा कोणताही देश नाही, हे त्यांनी लक्षात घेऊन आता जीव वाचवण्यासाठी लढावे किंवा बांगलादेशातून पलायन करावे, असेच म्हणावे लागेल !