पेडणे भागात ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा प्रयत्न हाणून पाडू ! – भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांची चेतावणी

पेडणे हा संस्कृती जपणारा तालुका असल्याचा आमदार प्रवीण आर्लेकर यांचा दावा

आमदार प्रवीण आर्लेकर

पेडणे, ४ डिसेंबर (वार्ता.) – सरकारने पेडणे येथे ‘सनबर्न’ महोत्सव लादण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पेडणे येथील जनता सज्ज झाली आहे. ‘सनबर्न’ महोत्सवाच्या विरोधात मी जनतेसमवेत रहाणार आहे, अशी चेतावणी भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली आहे. धारगळ पंचायतीने २ डिसेंबर या दिवशी धारगळ येथे २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न’ महोत्सवाच्या आयोजनाला संमती दिली आहे. सरकारच्या दबावामुळे पंचायतीने ‘सनबर्न’ महोत्सवाला संमती दिल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी ही चेतावणी दिली.  ते पुढे म्हणाले, ‘‘जनतेला नको असलेले प्रकल्प आणि महोत्सव मलाही लोकप्रतिनिधी या नात्याने नको आहेत. सरकारने हा महोत्सव काही ठराविक जणांना हाताशी धरून जनतेच्या माथी मारू नये. पेडणे हा तालुका संस्कृती जपणारा आहे.’’

पेडणे येथील युवकांची दिशाभूल

आमदार प्रवीण आर्लेकर म्हणाले, ‘‘सनबर्न’ महोत्सवात असलेले कक्ष हे महागडे असतात. असे कक्ष उभे करणे पेडणे येथील युवकांना परवडणारे आहेत का ? पेडणे येथील टॅक्सीचालकांचीही काही जण दिशाभूल करत आहेत. दिशाभूल करणार्‍या व्यक्तींपासून पेडणे येथील युवकांनी सावध रहावे.’’