युक्रेनला साहाय्य करणार्या युरोपीय देशांत अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न
लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे वृत्तपत्र ‘द इंडिपेंडंट’च्या वृत्तानुसार गेल्या १२ महिन्यांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी पाश्चात्त्य देशांविरुद्ध गोपनीय युद्ध चालू केले आहे. नुकतेचे लिथुआनिया देशात एका मालवाहू विमानाचा अपघात झाला होता. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये रेल्वे स्थानक, विमानतळ आणि अमेरिकी दूतावासात बाँब असल्याची अफवा पसरवण्यात आली. याच पद्धतीने ब्रिटनमध्ये अमेरिकी वायूदल तळाजवळ ड्रोन दिसले. वेल्समध्ये शस्त्रनिर्मिती करणार्या कारखान्यात स्फोट झाला. बाल्टिक समुद्रात टेलीकम्युनिकेशन केबल्स तोडल्या गेल्या. युरोपीय गुप्तचर संस्थांनुसार या घटना वेगवेगळ्या दिसत असल्या, तरी त्यामागे रशियाचा हात आहे.
१. युक्रेनमध्ये विदेशी गुप्तचर सेवेचे प्रमुख ओलेक्सांद्र डॅनिल्युक म्हणाले की, युरोपीय संघटना आणि नाटो देशांविरुद्ध रशिया गुप्तचर संस्थांकडून होणार्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी युरोपात लवकरात लवकर एक मध्यवर्ती यंत्रणा स्थापित केली पाहिजे.
२. रशियाची गुप्तचर संस्था ‘केजीबी’ या सर्व कारवायांमध्ये सहभागी आहे. फेब्रुवारी २०२२ च्या शेवटी युक्रेनमध्ये युद्ध चालू झाल्यानंतर रशियाने गोपनीय युद्धही चालू केले. रशियाने युरोपमधील हेरांसाठी स्थानिक पातळीवर भरती केली. यात युरोपियन असंतुष्ट आणि गुन्हेगारी टोळ्यांचे साहाय्य घेतले. ते युरोपमध्ये युक्रेनला साहाय्य करणार्यांना लक्ष्य करू शकतील.
३. ब्रिटनची गुप्तचर संस्था ‘एम्.आय. ५’चे महासंचालक केन मॅकॉलम यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, ही आक्रमणे रोखण्यासाठी आक्रमक कारवाई करावी लागेल.
४. जर्मनीच्या परदेशी गुप्तचर सेवेचे प्रमुख ब्रुनो काहल यांनी सांगितले की, रशियाच्या कारवायांचा धोका लक्षणीय वाढला आहे. नाटो देशांनी कलम ५ (एका सदस्य राष्ट्रावरील आक्रमण हे सर्वांवर आक्रमण आहे) लागू करण्याचा विचार करावा.
५. ब्रिटनच्या आतंकवादविरोधी कायद्याचे स्वतंत्र समीक्षक जोनाथन हॉल केसी यांनी सांगितले की, रशियाच्या गुप्तचर कारवायांना धोका आहे. युरोपमध्ये रशियासाठी जाळपोळ आणि हत्या करणार्या आरोपींनी न्यायालयात मान्य केले आहे की, रशियाने त्यांना या कृती करण्यासाठी पैसे दिले होते.