सडेतोड आणि परखड भाष्य करणारे व्यक्तीमत्त्व म्हणून भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखले जातात. भारतात असतांना, तसेच परदेशात गेल्यावरही भारताकडे वक्रदृष्टीने पहाणार्या देशांना त्यांची अचूक जागा दाखवणे, यात त्यांचा हातखंडा कुणीही धरू शकणार नाही. आजवर जे अन्य मंत्र्यांना जमू शकलेले नाही, ते जयशंकर यांनी सहजपणे; पण तितक्याच दायित्वाने साध्य केलेले आहे. रोखठोक बोलून त्यांनी जगभरात स्वतःचा पर्यायाने भारताचा दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळेच तर ‘पाहुणा देश’ म्हणून ‘जी ७’च्या बैठकीत भारताला निमंत्रित करण्यात आले असतांनाही कुठलाही आडपडदा न बाळगता त्यांनी युरोपला स्पष्टपणे त्याच्या दायित्वाची जाणीव करून दिली. ‘आपण पाहुणे म्हणून आलो आहोत, तर सगळे निमूटपणे ऐकून घेऊ किंवा सहन करू’, असा विचार न करता त्यांनी त्यांचे परराष्ट्रमंत्री हे पद चोखपणे पार पाडले. ते म्हणाले, ‘‘युरोपियन युनियन हा भारताचा सर्वांत मोठा व्यावसायिक भागीदार, तसेच गुंतवणूकदारही आहे. आम्ही सातत्याने मोठे करार करत आहोत. दोन्ही लाभदायक करार आर्थिक सहकार्य वाढवू शकतात. जर युरोपला त्याच्या तत्त्वांची इतकी काळजी असेल, तर त्याने स्वतःच रशियाशी सर्व व्यापार संपवला पाहिजे.’’ ‘केवळ ‘भारत’ या एकाच सूत्रावर मते न मांडता सर्वच राष्ट्रांशी हातमिळवणी करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दृष्टीने स्थैर्य प्रस्थापित केले आहे’, असे म्हणता येईल. ‘युरोपसारख्या मोठ्या राष्ट्राला उपदेश देतांना भारताचे मूल्य अल्प होईल का ?’, असा विचार त्यांनी कधीच केला नाही. याउलट जयशंकर यांच्या कणखर नीतीमुळे भारताचे मूल्य जागतिक स्तरावर दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
धाडसी व्यक्तीमत्त्व !
मध्यंतरी ते एस्.सी.ओ.च्या बैठकीसाठी पाकिस्तानमध्ये गेले होते. खरेतर एखाद्या देशात जाऊन, त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे शत्रूराष्ट्रात जाऊन त्याला त्याची चूक दाखवणे हे तितके सोपे किंवा सहज नसते; पण जयशंकर यांनी तेही धाडस दाखवले. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन पाकपुरस्कृत आतंकवादाविषयी त्याला चांगलेच सुनावले. आतापर्यंत इतके मोठे पाऊल उचलण्याचा ना कुणी विचार केला, ना कुणाला ते कधी जमले ! तेथील परिषद उधळून लावणार असल्याची धमकी तालिबानी संघटनेने दिली होती. त्यामुळे अशा स्थितीत खरेतर तेथे पोचणे जिकिरीचेच होते; पण पळपुटेपणा रक्तातच नसल्याने जयशंकर धाडसाने तेथे गेले. पाकला खडे बोल सुनावले. पाकचे वाभाडे काढले आणि तितक्याच अभिमानाने भारतात परतले. अमेरिकेच्या परराष्ट्र सचिवांनी भारतातील मानवी हक्कांच्या परिस्थितीवर लक्ष असल्याचे सांगितल्यावर जयशंकर म्हणाले, ‘‘ज्या प्रकारे अमेरिका भारतातील मानवाधिकारांवर स्वतःचे मत व्यक्त करते, त्याचप्रमाणे भारतही अमेरिकेतील मानवाधिकार उल्लंघनावर स्वत:चे मत मांडतो.’’ अमेरिकेच्या भूमीत जाऊन तिला तोडीस तोड उत्तर देणे, हे जयशंकर यांच्या ठाम भूमिकेमुळेच त्यांना जमले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका याही देशांना त्यांनी वेळोवेळी सुनावले. बांगलादेशाची राजधानी ढाका येथे वर्ष २०२३ मध्ये झालेल्या ‘हिंद महासागर परिषदे’त त्यांनी चीन आणि पाकिस्तान यांना खडेबोल सुनावत ‘चाणक्यनीती’ जपली आहे. वाटाघाटीच्या पटलावरच बहुतांश युद्धे संपवण्याचे कौशल्य जयशंकर यांच्यात आहे. असे परराष्ट्रमंत्री भारताला लाभले, यात देशाचे हितच आहे. जयशंकर यांच्याआधी भाजपच्या सुषमा स्वराज यांनीही परराष्ट्रमंत्री पदावर असतांना महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली होती. अशा प्रकारे राष्ट्राभिमानी, राष्ट्रहित तत्पर व्यक्ती परराष्ट्रमंत्री नियुक्त केल्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही राष्ट्रनीती वाखाणण्यासारखी आहे.
काँग्रेसमुळे भारताची गळचेपी !
आधीच्या सरकारांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी प्रत्येक वेळी कथित ‘शांतीची कबुतरे’ उडवण्याचेच काम केले. त्याच्या पलीकडे जाऊन ‘राष्ट्रासाठी काही तरी करायला हवे’, ‘अरे’ला ‘कारे’ म्हणायला हवे, हेच मुळात कुणी कार्यवाहीत आणले नाही. त्यामुळे ‘कुणीही यावे आणि भारताला टपली मारून जावे’, अशी गत देशाची झाली होती. देश कणखर नव्हे, तर पोकळ बनला होता. सर्वच स्तरांवर भारताची गळचेपी झालेली होती. काँग्रेसने ६० वर्षे भारतावर राज्य केल्याचाच हा परिणाम आहे; कारण तत्कालीन काँग्रेस सरकारने केवळ आतंकवादी आणि शत्रू यांच्यासाठीच पायघड्या घातल्या. अशाने आंतरराष्ट्रीय हितसंबंधच जणू पायदळी तुडवले गेले. ‘परराष्ट्रनीती जोपासायची असते’, हे कुणाच्याही तत्त्वात नव्हते. आता ती खर्या अर्थाने जोपासली जाते, जपली जाते आणि जयशंकर यांच्यासारख्या मंत्र्यांमुळे टिकवलीही जात आहे. परराष्ट्र संबंधांमध्ये दर्जेदार सुधारणा होत आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराला बळकटी मिळाली आहे. देशाबाहेर पाऊल टाकल्यावरही भारताचे हित जपण्याचाच त्यांनी वेळोवेळी प्रयत्न केला. यामुळेच देशाचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, तसेच राष्ट्रांमधील सामंजस्य आणि निकोपता टिकून रहाते.
‘भारताने रशियाकडून तेल खरेदी केले नसते, तर जागतिक बाजार नष्ट झाला असता’, इतके स्पष्टपणे प्रतिपादन करणारे जयशंकर हे एकमेव परराष्ट्रमंत्री आहेत. अशा या प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वाविषयी आंतरराष्ट्रीय स्तरावरील माध्यमांमध्येही चर्चा चालू असते, ही भारतासाठी विशेष आणि महनीय गोष्ट आहे. भारताकडे वाकड्या दृष्टीने पाहिले, तर आपल्याला कडवट किंवा तिखट उत्तर मिळेल, हे सर्वच राष्ट्रांना आता चांगलेच ठाऊक झाले आहे. भारतातील काही नेते किंवा राजकारणी परदेशात जाऊन भारतविरोधी गरळओक करतात; पण जयशंकर यांनी असे कधीच केले नाही. परदेशात जाऊन राजकारण न करता स्पष्ट भूमिकेचाच सातत्याने पुरस्कार केला. गोवा येथील ‘शांघाय सहकार्य परिषदे’तही त्यांनी सडेतोड भूमिका घेत भारताची वेगळीच छाप उमटवली. त्या कालावधीत काश्मीरच्या पूंछमध्ये आतंकवादी आक्रमण झाले होते. हे लक्षात घेता फसवेगिरी करणार्या पाकला धडा शिकवण्यासाठी जयशंकर यांनी द्विपक्षीय चर्चेस नकार दिला होता. कोणत्याही राष्ट्रहितद्रोही घटनेवर त्यांचे भाष्य हे असतेच. त्यामुळे त्यांचा प्रत्येक परदेश दौरा १०० टक्के यशस्वी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अचूक फलनिष्पत्ती देणारा ठरतो. ‘आव्हानात्मक ठरणार्या शत्रूराष्ट्रांच्या वरचढ ठरण्यासाठी भारत सातत्याने प्रयत्नशील आहेच. त्यात यशस्वी झाल्यास भारतात खर्या अर्थाने शांतता नांदेल. आता भारताला भेडसावणारा जो काही उरलासुरला आतंकवाद किंवा खलिस्तानवाद राहिला आहे, तो समूळ नष्ट करण्यासाठी जयशंकर यांनी प्रयत्न करावेत’, असे भारतियांना वाटते !
भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण करणारे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी भारताला भेडसावणारा आतंकवाद आणि खलिस्तानवाद समूळ नष्ट करण्यासाठी प्रयत्न करावेत ! |