संपादकीय : पंजाबच्या पाद्रयाचे ‘प्रताप’ !

पाद्री बजिंदर सिंह त्याच्या कार्यालयात आलेल्या महिलेला मारत आहे

पंजाबचे पाद्री बजिंदर सिंह याच्या विषयीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहे. यामध्ये तो त्याच्या कार्यालयात आलेल्या एका महिलेला आणि एका तरुणाला स्वत:जवळील वस्तू फेकून मारत आहे. अंगावर धावून जात त्या महिलेच्या कानशिलात लगावत आहेत, असे त्यामध्ये दिसत आहे. ‘शांतीचा पुतळा’ असे म्हणून ज्या पाद्र्यांचे वर्णन केले जाते, त्या पाद्र्यांपैकी हा एक पाद्री अतिशय आक्रमक होऊन संबंधितांशी हुज्जत घालतांना दिसत आहे. हा बजिंदर सिंह पाद्री पंजाब येथील तोच पाद्री आहे, ज्याने कर्करोग झालेल्याला बरे केल्याचे, मृताला जिवंत केल्याचे दावे केले आहेत. त्याच्या प्रार्थनासभांमध्ये कर्करोग किंवा असाध्य आजार झालेल्या रुग्णांना आणले जाते आणि ‘येशूला केलेल्या प्रार्थनेमुळे ते पूर्णपणे बरे होऊन जातात’, असा दावा केला जातो. पाद्री बजिंदर सिंह याच्याविषयी महत्त्वाचा भाग म्हणजे संबंधित महिलेने पाद्र्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला होता आणि या संदर्भात पोलिसात तक्रारही दिली होती. याच पाद्र्याने वर्ष २०१८ मध्येही अन्य एका महिलेवर बलात्कार केल्यामुळे कारावास भोगला आहे. म्हणजे हा पाद्री वासनांधतेसाठी प्रसिद्धच आहे, हे या उदाहरणातून लक्षात येते. असे असूनही भारतातील चर्च संस्था याविषयी गप्प आहे. एवढी मोठी घटना घडली, तरी सामाजिक माध्यमांवर झालेला गहजब किंवा चर्चा या व्यतिरिक्त प्रसारमाध्यमांनी हा विषय तेवढा उचलून धरलेला नाही.

धर्मांतरामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात पालट !

पंजाब येथे ख्रिस्त्यांकडून तेथील शीख आणि हिंदू यांचे धर्मांतर करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या घटनांमुळे पंजाब येथील धर्मनिहाय लोकसंख्येच्या प्रमाणात पालट होत आहे. शीख समुदाय पंजाब येथे मोठ्या प्रमाणात आहे. पंजाब येथील शीख समुदाय धर्माप्रती कट्टर मानला जातो; मात्र तेथे ख्रिस्त्यांनी अशी काही जादू केली आहे की, कट्टर मानले जाणारे शीख मोठ्या संख्येने ख्रिस्ती पंथात धर्मांतर करत आहेत. मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणार्‍या धर्मांतराच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होत आहेत. यामध्ये पंजाबी व्यक्तीला पगडीसह  ‘पवित्र पाण्यात’ बुडवून धर्मांतर करणे, पंजाबी महिला, मुली यांचे धर्मांतर करणे; तेथे सभा घेऊन अपंग किंवा लुळ्यापांगळ्या व्यक्तीला ‘आशीर्वाद’ देऊन धडधाकट व्यक्तीप्रमाणे चालायला, उड्या मारायला सांगणे; येशू-येशू अशा भजनाचे कार्यक्रम करणे, प्रथितयश व्यक्तींना ख्रिस्ती पंथाविषयी सकारात्मक बोलायला लावणे, असे अनेक प्रसंग घडत आहेत. हे सर्व सार्वजनिकरित्या चालू आहे. सामाजिक माध्यमांमध्ये मूळ पंजाबी समूह आणि राष्ट्रप्रेमी ‘सार्वजनिकरित्या होणार्‍या धर्मांतराला सरकारचे समर्थन आहे का ? सरकारचे साहाय्य आहे का ?’, अशी विचारणा करत आहेत. पंजाब येथे वर्ष २०११ मध्ये दीड टक्का असलेली ख्रिस्त्यांची लोकसंख्या आता १० टक्क्यांच्या आसपास पोचल्याचे सांगितले जाते. यातून किती वेगाने ख्रिस्तीकरण होत आहे, याची कल्पना येईल.

मूळ ओळख टिकवणे !

बजिंदर सिंह यांच्याप्रमाणे मूळ पंजाबी शीख असलेले अंकुर नरौला, अमृत संधू, सुखपाल राणा, गुरुनाम सिंह, कंचन मित्तल हे ख्रिस्ती धर्मात धर्मांतरित झाले आणि नंतर आता ख्रिस्ती धर्माचा प्रचार करत आहेत. ख्रिस्त्यांनी ज्यांचे धर्मांतर केले आहे, त्यांची नावे मात्र पंजाबी आहेत. लोकांना त्यांची शीख पंथाची ओळख तशीच ठेवून, त्यांची पंजाबी ओळख तशीच ठेवून त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रकार चालू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शीख समुदाय त्यांच्याकडे आकर्षित होत आहे. लोकांचे जत्थेच्या जत्थे धर्मांतरित होत आहेत. यातील महत्त्वाचे म्हणजे पेंटॉकॉस्टल चर्च संस्थेकडून जी चर्च उभारली जात आहेत, ती त्यांनी मंदिराप्रमाणे बनवली आहेत. चर्चमध्ये मंदिरांप्रमाणे बैठक व्यवस्थाच ठेवली आहे. पंजाब येथे ज्या शोभायात्रा, धार्मिक मिरवणुका हिंदू आणि शीख यांच्याद्वारे काढल्या जायच्या, त्या ख्रिस्त्यांकडून ख्रिस्ती सण-उत्सवांच्या निमित्ताने काढल्या जात आहेत. ख्रिस्ती गाणी पंजाबी शब्द घालून पालटली आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भ्रम निर्माण करून, एक प्रकारे फसवून हे कारनामे चालू असल्यामुळे ‘धर्मांतरित झालो म्हणून पुष्कळ काही गमावले’, असे लोकांना न वाटता ‘केवळ स्वत:ची श्रद्धा पालटली, उर्वरित सर्व आधीप्रमाणेच आहे’, असे वाटते. हे ख्रिस्ती लोकांना सुविधा आणि प्रलोभने देत आहेत. गरिबांना घरे बांधण्यासाठी पैसे  आणि शिधा दिला जातो, तर मुलांना विदेशात शिक्षणासाठी खर्च देण्यात येतो. त्यामुळे लोकांना ख्रिस्ती पंथाची भुरळ पडली आहे. लोक पैसे, सुविधा, शिक्षण यांसाठी स्वत:चा धर्मही त्यागण्यास सिद्ध आहेत, अशी भयावह परिस्थिती पंजाबमध्ये आहे.

पंजाबच्या काही भागांत चर्च आणि त्यांचे पाद्री यांचा प्रभाव एवढा वाढला आहे की, राजकीय पक्षांना मते मिळवण्यासाठी या पाद्र्यांचे साहाय्य घ्यावे लागते. गुरुदासपूर आणि अन्य एका जिल्ह्यात असलेला ख्रिस्त्यांचा प्रभाव आता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ख्रिस्त्यांना त्यांच्या कारवाया वाढवण्यासाठी, प्रचार वाढवण्यासाठी विदेशातून मोठ्या प्रमाणात पैसा येत आहे, हे निश्चितच आहे. येथे महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, हे ख्रिस्ती पाद्री फसवून लोकांचे धर्मांतर करत आहेत, महिलांवर अत्याचार करत आहेत, ताळतंत्र सोडून वागत आहेत, तर त्यांच्यावर कठोर कारवाई का होत नाही ? पंजाब येथील काही राजकीय नेत्यांना निवडणुकीत निवडून आणण्यासाठी या ख्रिस्ती धर्माेपदेशकांनी साहाय्य केले आहे. त्याच्या ऋणापायी त्यांच्या या धर्मांतराच्या कारवायांकडे राजकीय पक्षांसह पोलीस दुर्लक्ष करतात. याउलट खलिस्तानी आतंकवादी हिंदूंच्या हत्या करत आहेत, हिंदूंवर आक्रमणे करत आहेत. पंजाबमधील सुवर्णमंदिरात ‘हा पंजाब आहे, भारत नाही’, असे तेथील सेवेकर्‍यांकडून सांगितले जाते. यातून ख्रिस्ती आणि खलिस्तानी यांची भयावह युती झाली आहे कि काय ? अशी शंका येते. काही निहंग शिखांचा अपवाद वगळता या ख्रिस्त्यांना कुणी विरोध केलेला नाही. यातून ही छुपी युती हिंदूंना लक्ष्य करण्याकरता आहेच; मात्र शिखांचेही अस्तित्व संपवून त्यांना भारत आणि हिंदू यांच्या विरोधात उभे करण्याकडे आहे. शीख, पोलीस आणि शासनकर्ते यांना याकडे लक्ष द्यावे वाटत नाही; कारण त्यांचाही कल त्याकडे असल्याचे ध्वनित होते. पंजाब येथील हे धर्मांतराचे प्रकार रोखण्याची अत्यंत आवश्यकता आहे, अन्यथा ईशान्येकडील राज्ये जी मूळ हिंदु होती, ती ख्रिस्तीबहुल झाली आहेत. त्यांच्यात फुटीरतेची बीजे रोवली गेली आहेत. पंजाब येथे मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचे सेवन होत असल्यामुळे त्याचे वर्णन ‘उडता पंजाब’, असे केले जाते. आता त्यापुढे जाऊन ‘ख्रिस्ती पंजाब’ असे होऊ नये, अशी सर्व भारतियांना अपेक्षा !

हिंदू आणि शीख यांचे फसवून धर्मांतर करणारे पंजाब येथील पाद्र्यांचे खरे स्वरूप पोलीस-प्रशासन कधी उघड करणार ?