आळंदी (जिल्हा पुणे) – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७२९ व्या संजीवन समाधीदिन सोहळ्यातील कार्तिकी एकादशी, २६ नोव्हेंबर या दिवशी लाखो वैष्णव भाविकांच्या साक्षीने हरिनाम गजरात साजरी झाली. २७ नोव्हेंबर या दिवशी ‘श्रीं’चा रथोत्सव होत आहे. २५ नोव्हेंबरला श्री पांडुरंगाच्या पालखी सोहळ्यातील दिंडीची नगरप्रदक्षिणा आणि इंद्रायणी नदीत पांडुरंगाच्या पादुकांचे वैभवी स्नान हरिनाम गजरात झाले. आळंदीला यात्रेचे स्वरूप आले आहे. भाविकांची सोय चांगली झाली आहे.
भाविकांनी शहरात विविध ठिकाणी चालू असलेल्या ज्ञानदान सोहळ्यातील कीर्तन, प्रवचनात श्रवण सुखाचा आनंद घेतला. यात्रेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा मंदिरासह परिसरात चालू आहे. यास भाविक वारकरीही आनंदाने उपस्थित रहात आहेत. या वर्षी माऊली मंदिरासह इंद्रायणी नदी घाटावरील आकर्षक विद्युत् रोषणाईने भाविकांचे लक्ष वेधले.
भाविकांसाठी विविध सुविधा !
आळंदी देवस्थानाच्या वतीने भाविक, वारकरी, नागरिक, तीर्थयात्री यांच्या सेवेसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. भाविकांसाठी दर्शनबारी, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, थंडी आणि पावसापासून सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर परिसरातून सीसीटीव्ही छायाचित्रकाद्वारे दर्शन बारीसह सर्वत्र घडणार्या घटनांवर, हालचालींवर लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आरोग्य सेवेत सुसज्ज रुग्णवाहिका तैनात करून सेवेत सज्ज झाल्या आहेत. पिंपरी पोलीस आयुक्तालयाच्या आयुक्त कार्य क्षेत्र अंतर्गत कार्तिकी यात्रेच्या काळातील पोलीस बंदोबस्त तैनात केला असून यात भाविकांच्या सुरक्षेस प्राधान्य देण्यात आले आहे.