Jammu Increased Terror Attacks : जम्मूत आतंकवादी कारवायांत वाढ : वर्षभरात ४५ ठार !

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरात आतंकवाद्यांनी जम्मूला मोठ्या प्रमाणात लक्ष्य केल्याची माहिती सुरक्षा अधिकार्‍यांनी नुकतीच येथे दिली. जम्मू विभागातील १० पैकी ८ जिल्ह्यांना आतंकवादाची झळ बसली असून त्यांमध्ये एकूण ४४ जण ठार झाले आहेत. वर्षभरात एकूण १८ सैनिक यांना वीरमरण आले आणि १३ आतंकवाद्यांचा ठार करण्यात यश आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. याखेरीज या आक्रमणांमध्ये १४ नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत.

१. जम्मू विभागाच्या रियासी, दोडा, किश्तवार, कठुआ, उधमपूर आणि जम्मू या जिल्ह्यांमधील आतंकवादी आक्रमणांमध्ये वाढ झाल्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली आहे.

२. अधिकृत आकडेवारीनुसार दोडा, कठुआ आणि रियासी या ३ जिल्ह्यांमध्ये या वर्षी प्रत्येकी ९ जणांचा आतंकवादी आक्रमणांमध्ये मृत्यू झाला. त्यापाठोपाठ किश्तवारमध्ये ५, उधमपूरमध्ये ४, जम्मू आणि राजौरीमध्ये प्रत्येकी ३, तर पूंछमध्ये प्रत्येकी २, अशी प्राणहानी झाली.

हुतात्मा नायब सुभेदार राकेश कुमार यांना वाहिली श्रद्धांजली !

किश्तवारमध्ये दोन ग्राम संरक्षकांची हत्या करणार्‍या आतंकवाद्यांचा शोध चालू होता. या वेळी किश्तवारमधील केशवान जंगलामध्ये आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत नायब सुभेदार राकेश कुमार यांना वीरमरण आले, तर ३ सैनिक घायाळ झाले. या चकमकीत वीरमरण आलेल्या नायब सुभेदार राकेश कुमार यांना सैनिकांनी श्रद्धांजली वाहिली.

संपादकीय भूमिका

सरकार या आतंकवादाचा बीमोड कसा आणि कधी करणार आहे ?