देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःच्या प्राणांची पर्वा न करणारे धर्मवीर विश्वासराव डावरे !

आज धर्मवीर विश्वासराव डावरे यांची १३६ वी जयंती आहे. त्या निमित्ताने…

वर्ष १८५७ च्या बंडानंतर देशासाठी बलीदान करण्याच्या परंपरेतील डावरे घराणे. पूर्वज केशवराव पानिपतच्या रणांगणावर हुतात्मा झाले होते. विश्वासरावांचे आजोबा नारायणराव यांनी स्वातंत्र्य युद्धासाठी महाराष्ट्रातून कार्य केले. विश्वासरावांचे काका, हुतात्मा गोविंदराव हे क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे सहकारी होते. ४ वेळा प्रयत्न करून पकडता आले नाही; म्हणून इंग्रज सरकारने गोविंदरावांना पुण्यात वर्ष १८७९ मध्ये जिवंत जाळून हुतात्मा केले.

१. बळवंतराव आणि माधवराव डावरे यांना काळ्या पाण्याची शिक्षा अन् विश्वासराव डावरे यांचा जन्म

कोळी समाजाच्या उठावाला इंग्रज सरकार विरुद्ध साहाय्य केल्याच्या आरोपावरून विश्वासरावांचे वडील बळवंतराव आणि काका माधवराव यांना इंग्रज सरकारने जन्मठेपेची शिक्षा दिली. या काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी त्यांना अंदमानला वर्ष १८७३ मध्ये पाठवले. ११ वर्षे खडतर शिक्षा भोगल्यानंतर माधवराव आणि बळवंतराव यांना कारावासाबाहेर वायपर बेटावरच रहाण्याची सवलत वर्ष १८८५ मध्ये मिळाली. बळवंतराव यांच्या पत्नी गीताबाईंनी त्यांच्यासमवेत वास्तव्य करण्याची अनुमती मिळवण्यासाठी मुंबईच्या गव्हर्नरकडे अर्ज केला; पण त्यांच्याकडून नकार मिळाला. पुढे कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलकडे अपील करून गीताबाईंनी अनुमती मिळवली. वर्ष १८८५ मध्येच गीताबाई अंदमानात रहाण्यास गेल्या. ७ नोव्हेंबर १८८८ या दिवशी वायपर बेटावर गीताबाईंचे पुत्र, म्हणजेच विश्वासराव यांचा जन्म झाला. २१ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर डावरे-बंधूंच्या सुटकेचा आदेश वर्ष १८९५ मध्ये आला. मासातून एकदा जाणारी बोट सुटण्यास ३ दिवस होते. आजारी गीताबाईंनी सांगितले, ‘नको मरण अंदमानात !’  सर्व स्थावर जंगम दान करून त्या बोटीने सर्व जण कलकत्तामार्गे पुण्याला परतले. लोकमान्य टिळक यांनी त्यांचे पुण्यात स्वागत केले. डावरे बंधूंच्या सुटकेनंतर २१ वर्षांनी ‘सेल्युलर जेल’ बांधला गेल्यामुळे त्याच्या ‘मानपटा’वर डावरे बंधूंची नावे नाहीत. दुर्दैवाने वर्ष १८९६ मधील ‘ब्युबॉनिक प्लेग’च्या साथीमध्ये दोघा क्रांतीविरांसह ८ डावरे कुटुंबियांचा मृत्यू झाला.

२. विश्वासरावांचा विविध क्रांतीयुद्धात सहभाग आणि त्यांना झालेल्या शिक्षा

विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त)

क्रांतीयुद्धात भाग घेण्याची प्रेरणा विश्वासरावांना मातोश्री गीताबाई आणि लोकमान्य टिळक यांच्याकडून मिळाली. नाशिकचा अत्याचारी इंग्रज कलेक्टर (जिल्हाधिकारी) जॅक्सनचा वध क्रांतीवीर अनंत कान्हेरे यांनी डिसेंबर १९०९ मध्ये गोळी मारून केला. त्याला इंग्रज सरकारने ‘नाशिक कट’, असे नाव देऊन अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे आणि विनायक देशपांडे या ३ क्रांतीविरांना फाशी अन् ३७ क्रांतीकारकांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या. त्यामध्ये

२० वर्षांच्या विश्वासरावांना ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली; परंतु विश्वासरावांच्या कार्यकौशल्यामुळे त्यांचे अनेक सहकारी इंग्रज सरकारला सापडले नाहीत. म्हणून सुटकेनंतरही वर्ष १९३५ पर्यंत विश्वासरावांच्या मागे गुप्तहेर कायम असे. वर्ष १९२६ ते १९२८ तळेगावमध्ये वाद्यबंदीच्या विरोधात झालेल्या चळवळीचे नेतृत्व विश्वासरावांचे होते. मशिदीवरून वाद्ये वाजवत जाण्याचा हिंदूंचा अधिकार न्यायालयाने वर्ष १९२८ मध्ये मान्य केला.

वर्ष १९४७ पर्यंत विश्वासरावांना वेगवेगळ्या खटल्यांमध्ये गोवून इंग्रज सरकारने एकूण २२ वर्षे खडतर कारावासात काढावयास लावली. त्यांपैकी काही गाजलेले अभियोग, म्हणजे ‘लाहोर कॉन्स्पिरसी केस’, ‘काकोरी प्रकरण’, ‘मेरठ कॉन्स्पिरसी केस’, ‘बनारस केस.’

३. हैद्राबाद संस्थान भारतात विलीनकरणाच्या संदर्भात विश्वासराव यांचा सक्रीय सहभाग आणि त्यांच्यावर झालेले जीवघेणे आक्रमण

हैद्राबाद संस्थान भारतात विलीन न करता स्वतंत्र ठेवण्याचा निजाम मीर उस्मान अली खान याचा इरादा होता. रझाकार नेता कासिम रझवीचे निजामावर दडपण होते. रझाकारांनी तेलंगाणा आणि मराठवाडा येथील ८ जिल्ह्यांमध्ये दहशत निर्माण केली होती. निजामाची ६० सहस्र मुसलमानबहुल सेना होती. मुसलमानधार्जिण्या राज्यव्यवस्थेमुळे रझाकार खेड्यापाड्यातून हिंदूंच्या कत्तली, हिंदु स्त्रियांचे अपहरण-बलात्कार, हिंदूंच्या मालमत्ता वा पीक यांची लूट करून मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करत होते. विश्वासराव ‘वर्णाश्रम स्वराज्य संघा’चे अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यातील नागरिकांना संघटित करून त्यांनी रझाकार दहशतीचा यशस्वीरीत्या प्रतिकार केला.

स्वामी रामानंदतीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हिंदु महासभेने देशभरातून निधी जमवला. हिंदु महासभेचे मराठवाड्यातील नेते विश्वासराव होते. त्यांनी अतोनात परिश्रमाने रझाकारांच्या अत्याचारांखाली भरडल्या गेलेल्या नागरिकांचे पुनर्वसन केले. रझाकारांनी पळवून नेलेल्या हिंदु स्त्रियांचा शोध घेऊन त्यांचे कुटुंबियांशी पुनर्मिलन करून दिले. रझाकारांविरुध्द लढ्याच्या वेळी विश्वासरावांच्या जीवाला धोका असल्यामुळे त्यांचे मायनाक महार आणि दुसरा सुधारलेला माजी रझाकार रमझान हे २ शरीररक्षक (अंगरक्षक) होते. काही रझाकारांनी बीडमध्ये विश्वासरावांवर गोळीबार केला, तेव्हा रमझानने विश्वासरावांच्या पुढे स्वतःला झोकून देऊन स्वतःवर ६ गोळ्या झेलल्या आणि मायनाकने त्या त्वरेने गोळ्या झाडून गोळीबार करणार्‍यांना ठार मारले. डॉक्टरांनी घायाळ झालेल्या रमझानला शल्यकर्म करून शर्थीने वाचवले. विश्वासरावांनी तो पूर्ण बरा होईपर्यंत त्याची अपार काळजी घेतली. तळहातावर शीर घेऊन जे देशभक्त मातृभूमीच्या रक्षणासाठी रणांगणात उतरतात, त्यांच्या मनाची महानता खुर्चीधारी राजकारण्यांना कशी समजणार ?

स्वातंत्र्यानंतर ‘वर्णाश्रम स्वराज्य संघा’चे उमेदवार पुणे महानगरपालिका आणि विधानसभेच्या निवडणुकांत निवडून आणून विश्वासरावांनी दोन्ही क्षेत्रांत कार्य केले. ५ एप्रिल १९५७ या दिवशी विश्वासरावांचा पुणे येथे मृत्यू झाला.

– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त), पुणे. (५.११.२०२४)


विश्वासराव यांचे कार्यक्षेत्र आणि ‘धर्मवीर’ पदवीने सन्मान

डावरे तालीम आणि गोकुळ वस्ताद तालीम यांचे व्यवस्थापन विश्वासराव करत. तालमींमध्ये अठरा पगड तरुणांना देशसेवेचेही धडेही देत. इंग्रजी शिक्षण घेऊनही इंग्रज सरकारची चाकरी न करता स्वतंत्र व्यवसाय करण्याचे पूर्वापारचे धोरण विश्वासरावांनी चालवले. विश्वासरावांनी शिक्षणानंतर ठकार यांच्याबरोबर आडतीचा व्यवसाय (दलाली घेऊन व्यापार) करू लागले. विश्वासरावांचे कार्यक्षेत्र विस्तृत होते. लाहोर, कानपूर, मेरठ, हैद्राबाद, बंगाल आणि नेपाळ येथील क्रांतीकारकांसह ते काम करत. संघटन कौशल्यामुळे त्यांच्या अनुयायांची विश्वासरावांवर अपार निष्ठा होती. प्रत्येक अनुयायाची त्यांच्या कुटुंबियांसह ते काळजी घेत. मुळशी सत्याग्रहामध्ये सेनापती बापटांसह विश्वासरावांनी कारावास भोगला. स्वतःच्या प्राणाची पर्वा न बाळगता हिंदु धर्माच्या निस्सीम सेवेकरता समाजाच्या उत्स्फूर्त शिफारसीवरून शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांनी ‘धर्मवीर’ पदवी देऊन विश्वासरावांचा सन्मान केला.

– विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)