भारतमातेचा विस्कटलेला संसार शक्तीनिशी उभा करण्याचा हिंदूंनी संकल्प करावा !

सांगली येथे दुर्गामाता दौडीच्या प्रारंभी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शक उद्गार !

श्री दुर्गादौडीत भगवा ध्वज घेऊन जात असतांना धारकरी

सांगली, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणे आपल्याला देश निर्माण करायचा आहे. यासाठी आई जगदंबे, तू आम्हाला आशीर्वाद दे. अर्थकारण, राजकारण, सत्ताकारण हे महत्त्वाचे विषय राहिले नाहीत. भारतमातेचा विस्कटलेला संसार पूर्ण शक्तीने उभे करण्याचा आपण संकल्प केला पाहिजे, असे मार्गदर्शन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी येथे केले.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी

३ ऑक्टोबरपासून श्री दुर्गामाता दौडीस मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. त्या वेळी माधवनगर रस्त्यावर असलेल्या श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

पू. संभाजीराव भिडेगुरुजी पुढे म्हणाले की, गणेशोत्सवाचा प्राण हरपत चालला आहे. नवरात्रोत्सवातील ‘दांडिया’ हा प्रकार अयोग्य मार्गाकडे घेऊन जात आहे. काही माता-भगिनी यांना दुर्गामाता दौडीत यावेसे वाटते, महिलांनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी. सर्व सामाजिक कार्यक्रम करमणूक, मिरवणूक आणि मिळवणूक यांसाठी राबवले जात आहेत.

३७ वर्षांहून अधिक काळ ही दौड चालू आहे. प्रथम येथील मारुति मंदिरासमोर असलेल्या शिवतीर्थावर सगळे धारकरी एकत्र आले. येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. या प्रसंगी धारकरी सर्वश्री हणमंतराव पवार, हरिदास कालिदास, मिलिंद तानवडे, राहुल आनंदे, जगदीश जुमनाळ, राहुल बोळाज, अंकुश जाधव, सचिन पवार यांसह मोठ्या संख्येने अन्य धारकरी उपस्थित होते.

ध्वजपूजेनंतर सर्व धारकरी दौड करत माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गादेवीच्या मंदिराकडे गेले. येथे पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचे मार्गदर्शन झाले. यानंतर शहरातील विविध मार्गांवरून जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीजवळ दौडीचा समारोप झाला.

चीनने भारतावर आक्रमण करून भारतीय सैनिकांना ठार मारले, तरी ‘हिंदी-चिनी भाई भाई, हिंदु-मुसलमान भाई भाई’ घोषणा देणारा पंतप्रधान देशाला मिळाला, यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट कोणती नाही. जे शत्रू, वैरी आहेत, त्यांना ‘भाऊ’ मानले आणि जे ‘भाऊ’ आहेत, त्यांना वैरी, शत्रू मानले. आपला कोण ? परका कोण ? कैवारी कोण ? मित्र कोण ? योग्य काय ? अयोग्य काय ? हे हिंदूंना अजूनही कळत नाही. – पू. संभाजीराव भिडेगुरुजी