चुकांविषयी चिंतन करायला शिकवून साधिकेला घडवणार्‍या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘वर्ष २०२२ मधील दिवाळीच्या कालावधीत मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची सेवा करण्याची संधी मिळाली. सेवा करत असतांना माझ्याकडून बर्‍याच चुका झाल्या. त्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला ‘चुका झाल्यावर योग्य दृष्टीकोन आणि योग्य विचारप्रक्रिया कशी असायला हवी ? ‘चुका होऊ नयेत’, यासाठी उपाययोजना कशी काढायला हवी ?’, हे शिकवले. याविषयीची काही सूत्रे पुढे दिली आहेत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी अनेक साधक शिकवून तयार केले आहेत. ‘ते त्यांनी कसे काय केले’, याबद्दल मला कुतूहल होते; म्हणून मी काही साधिकांना तो प्रश्‍न विचारला होता. तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिले नाही. आज या लेखातील अनेक उदाहरणांतून मला तुझ्याकडून उत्तर मिळाले. याबद्दल तुझे कौतुक करावे तेवढे थोडे ! अशाच जलद प्रगतीबद्दल शुभेच्छा !

– परात्पर गुरु डॉ. आठवले

१. इतरांचा विचार करणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या महाप्रसादाची वेळ झाल्यावर मी त्यांच्यासाठी महाप्रसाद घेऊन त्यांच्या खोलीत गेले. त्या महाप्रसाद ग्रहण करत असतांना मी बाजूला उभी असलेली पाहून त्या मला म्हणाल्या, ‘‘तू उभी का आहेस ? बाजूला आसंदीत बस. उभे राहून तुझे पाय दुखतील. मला काही लागल्यास मी तुला सांगीन.’’ त्यांचा महाप्रसाद झाल्यानंतर मला सर्व भांडी एका वेळी घेऊन जाणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी दुसर्‍या साधिकेला माझ्या साहाय्यासाठी बोलावले.

एका सत्संगात डावीकडून कु. गुलाबी धुरी, कु. एकता नखाते, कु. रोहिणी गुरव (आताची सौ. रोहिणी भुकन), कु. वैष्णवी जाधव (आताची सौ. अनन्या पाटील), श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, कु. कीर्ती पुजारी (आताची सौ. कीर्ती जाधव) आणि कु. स्वाती गायकवाड (आताची सौ. स्वाती शिंदे) (वर्ष २०१७)

२. मनमोकळेपणाने बोलायला शिकवून साहाय्य करणे

दिवाळीच्या कालावधीत साधकसंख्या अल्प असल्याने मला अर्धवेळ पाहुण्यांची सेवा आणि अर्धवेळ श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची सेवा मिळाली. तेव्हा माझी फार धावपळ व्हायची. एक दिवस पाहुण्यांची सेवा करत असतांना मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या एका सेवेसाठी जायला विलंब झाला. त्यांनी ‘तू कुठे होतीस ?’, असे विचारल्यावर मला काहीच बोलता आले नाही आणि मी रडू लागले. त्या वेळी त्यांनी मला मनमोकळेपणाने बोलायला सांगितले. त्यांनी माझी स्थिती लक्षात घेऊन माझ्याकडील काही सेवा अन्य साधकांना दिल्या.

कु. गुलाबी धुरी

३. चुकांमधून शिकून त्यांतील आनंद घेण्यास सांगणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची सेवा करतांना मला सहजपणे रहाता येत नव्हते. एकदा त्यांनी माझी चूक सांगितल्यानंतर ‘त्यांच्याकडे कसे जायचे ?’, या विचाराने मला ताण आला. त्या वेळी त्यांनी मला एका सेवेसाठी बोलावले आणि माझी विचारपूस करून त्या मला म्हणाल्या, ‘‘माझ्या बोलण्याचा तुला ताण येत नाही ना ? तू शिकायला पाहिजेस. समष्टीच्या दृष्टीने तू विचार केला पाहिजेस. संकुचित वृत्ती सोडून तुझी साधना विकसित व्हायला पाहिजे; म्हणून मी तुझ्याकडून झालेल्या चुका त्या त्या वेळी तुझ्या लक्षात आणून देते. तू ताण घेऊ नकोस. शिकण्यातील आनंद घे.’’ त्यांच्या अशा बोलण्यामुळे माझ्या मनावर आलेला ताण क्षणात नष्ट झाला.

४. साधिकेला तिची संकुचित वृत्ती लक्षात आणून देणे

मी बर्‍याच वेळा श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या खोलीत जाते आणि माझी नियोजित सेवा करून परत येते. एकदा त्यांनी माळलेली फुले पटलावर ठेवली होती. ‘त्या फुलांचे काय करायचे ?’, याविषयी मी त्यांना विचारले नाही. दुसर्‍या दिवशी त्यांनी माझी ही चूक सांगून माझी संकुचित वृत्ती माझ्या लक्षात आणून दिली.

देवद, पनवेल येथील आश्रमातील पू. (सौ.) अश्विनी पवार यांच्याशी चर्चा करतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेच्या प्रारंभी अनेक दायित्वाच्या सेवा समर्थपणे आणि सहजतेने केल्या आहेत. आता त्या सर्वत्रच्या साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. अत्यंत संयमाने, वात्सल्यभावाने, तत्त्वनिष्ठतेने आणि आध्यात्मिक स्तरावर त्या साधकांना घडवत आहेत.

५. सेवा करतांना सर्वांगीण विचार करण्यास शिकवणे

दोन दिवसांनंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ सेवा करत असलेल्या खोलीच्या शेजारील खोलीत फुलांचा एक गजरा ठेवला होता. तो गजरा मी त्यांना न दाखवताच ‘पलीकडच्या खोलीत गजरा आहे. त्याचे काय करू’, असे विचारले. तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘त्या गजर्‍याची स्थिती मला इथे बसून कशी कळेल ? त्यासाठी तो गजरा येथे आणून दाखवायला हवा.’’ यातून ‘केवळ सांगकाम्या किंवा पाट्याटाकू वृत्तीने सेवा केली, तर तिची फलनिष्पत्ती अल्प होते. त्यामुळे आपण विचार करून सेवा करायला पाहिजे’, हे मला शिकता आले.

६. स्वतःची साधना विकसित होण्यासाठी सेवा करतांना अंतर्मुख राहून चिंतन करण्यास सांगणे

एका धर्मप्रेमींनी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना एक ग्रंथ भेट म्हणून दिला होता. त्या ग्रंथात एका साधिकेचा लेख होता. मी तो ग्रंथ त्यांच्या हातात देऊन म्हणाले, ‘‘या ग्रंथात एका साधिकेचा लेख आहे.’’ तेव्हा त्या मला म्हणाल्या, ‘‘तू ग्रंथातील तो लेख पाहिला आहेस, तर तो लेख असणार्‍या पानाच्या ठिकाणी एक लहान कागद ठेवून खूण केली असतीस, तर तो लेख शोधण्यातील माझा वेळ वाचला असता. ‘ही तुझी चूक आहे’, असे नाही; परंतु असे केल्यामुळे तुझी साधना विकसित होणार. त्यासाठी अंतर्मुख राहून स्वतःचे चिंतन करता आले पाहिजे.’’

७. चूक झाल्यावर केवळ क्षमा मागण्याऐवजी त्याविषयी चिंतन करायला शिकवणे

माझी काही चूक झाल्यास मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना केवळ ‘ताई क्षमा करा’, असे म्हणायचे. एकदा त्या मला म्हणाल्या, ‘‘केवळ ‘क्षमा करा’, असे म्हणून चालत नाही. ‘ही चूक माझ्याकडून का झाली ? मी कोणत्या विचारांत होते ?’, याचे चिंतन प्रत्येक क्षणाला व्हायला पाहिजे. याचा अर्थ ‘क्षमा मागू नये’, असे नाही; परंतु नुसते ‘क्षमा करा’, असे म्हटल्याने आपण शिकत नाही. चुकांचे चिंतन झाले की, आपल्या लक्षात येते आणि आपण त्यातून शिकतो.’’

‘हे श्रीसत्‌शक्ति बिंदाई, तू साधकांना साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी अविरत कार्यरत असतेस; परंतु आम्ही न्यून पडतो. हे आई, ‘तूच आमच्याकडून सेवा आणि साधना करून घे’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे.’

– कु. गुलाबी धुरी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा