हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्‍यांवर खटले प्रविष्ट (दाखल) करण्याविषयी प्रयत्नांची दिशा !

हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍यांविरुद्ध वैध मार्गाने विरोध करणे आणि हिंदूंमध्ये जागृती करून प्रभावी संघटन करणे क्रमप्राप्त !

उदयनिधी स्टॅलिन याने केली सनातन हिंदु धर्मावर अश्लाघ्य टीका

आज असे चित्र आहे की, हिंदूंची हिंदु धर्माविषयी असणारी श्रद्धा, जिव्हाळा यांत दिवसेंदिवस जागृती होतांना दिसत आहे आणि दुसर्‍या बाजूला काही मंडळी हेतूपुरस्सर हिंदु धर्म, देवीदेवता, धर्माचरण, साधू-संत यांना अपकीर्त करत आहेत अथवा त्यांच्यावर चिखलफेक करणारी वक्तव्ये करत हिंदूंमध्ये भेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. हिंदुविरोधी वक्तव्ये करण्याची वारंवारता न्यून होण्याऐवजी वाढतांना दिसत आहे. त्यामुळे त्याला प्रतिबंध लावण्यासाठी उपाययोजना काढण्याची आवश्यकता आहे.

१. ‘हेट स्पीच’ (द्वेषयुक्त भाषण) म्हणजे काय ? 

हा शब्द गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. ऑक्सफर्ड शब्दकोशात द्वेषयुक्त भाषणाचा अर्थ दिला आहे – ‘वंश, धर्म, लिंग यांसारख्या कोणत्याही भेदभावामुळे एखाद्या विशिष्ट गटाविरुद्ध पूर्वग्रह व्यक्त करणारे कोणतेही निंदनीय वा आक्षेपार्ह विधान म्हणजे हेट स्पीच !’ हरिद्वार (उत्तराखंड) आणि रायपूर (झारखंड) येथे अशाच घटनांद्वारे सामाजिक शांती बिघडवण्याचा प्रयत्न झाला होता, तसेच देहलीत २ वर्षांपूर्वी पूर्वेकडील भागात उसळलेल्या हिंसाचारात द्वेषयुक्त भाषणाचीही मोठी भूमिका असल्याचे सांगण्यात आले. यावर न्यायालयात खटलेही चालू आहेत. हा विषय काही उदाहरणांसह जाणून घेऊया.

पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी

अ. भारतात तबलिगींनी ‘कोरोना’ हा दुर्धर रोग आणला आणि त्याविषयी जेव्हा जागृती करण्यात आली, त्यानंतर धर्मांधांनी एक नवीन खेळी खेळत आरोळी ठोकली की, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड येथे जो कुंभमेळा झाला, त्यामुळे कोरोना हा रोग भारतात सर्वत्र पसरला. वस्तूत: खरी परिस्थिती वेगळी होती. उत्तरेत किंवा उत्तराखंडमध्ये कुंभमेळा जिथे भरतो तेथील गंगेच्या परिसरात कुणीही रुग्ण आढळून आले नाहीत. याउलट तबलिगी जिथे जिथे होते, त्या सर्वत्रच्या ठिकाणी कोरोना रोग मोठ्या प्रमाणात पसरला होता. आता रोग आणि कुंभमेळा यांचा कुठेही मेळ नाही; परंतु कुभांड रचण्यासाठी हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे कृत्य करण्यात आले.

आ. दुसरे उदाहरण पाहूया. तमिळनाडू येथील द्रमुक पक्षाचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन याने एका कार्यक्रमात सनातन हिंदु धर्मावर अश्लाघ्य टीका केली. ‘सनातन धर्माला केवळ विरोध करून चालणार नाही, तर डास, मलेरिया, डेंग्यू या रोगांना संपवतो, तसे रोग समजून त्याला नष्ट केले पाहिजे’, या भाषेत गरळओक केली. या दोन्ही उदाहरणांत हिंदु धर्माला लक्ष्य करून त्याची अपकीर्ती करण्याचे उघड उघड धाडस केले गेले. त्यामध्ये चित्रपट निर्माते, सिने-कलाकार, राजकारणी, हिंदु धर्मद्वेष्टे यांचाही पुढाकार होता; परंतु त्यांच्यावर कारवाई होतांना दिसत नाही.

२. हिंदु जागृती थांबवण्याचा प्रयत्न 

आपल्या देशात हिंदूंविरोधात अनेक राजकीय नेते आणि हिंदुविरोधी लोक नियमितपणे ‘हेट स्पीच’ करत आहेत, त्याविषयी कोणत्याही न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला जात नाही; उलट हिंदूंच्या विरोधात गुन्हे नोंदवले जातात. ‘भारताचे तुकडे होऊ नयेत, याविषयी हिंदूंनी जनजागृती करणे, हे ‘हेट स्पीच’ आहे का ?’, जर हिंदु ‘आपला देश आणि धर्म वाचवण्याविषयी बोलत असेल, तर ते ‘हेट स्पीच’ आहे का ?’ अमेरिकेमध्ये ‘इस्लामोफोबिया’विषयी (इस्लामविषयी तिरस्कार) कायदा करण्यात आला आहे. भारतात असा कायदा करता येणार नाही; म्हणून ‘हेट स्पीच’ ही पुढील आवृत्ती आणली आहे. हिंदूंच्या विविध सभांमधून हिंदूंमध्ये जागृती केली जात आहे. त्यामुळे जिहादी अस्थिर झाले आहेत. हिंदूंच्या सभांत बोलणारे वक्ते, आयोजक यांच्या विरोधात तक्रारी प्रविष्ट करून त्यांच्यामध्ये भीती निर्माण केली जात आहे. जळगाव येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’त डॉ. सुरेश चव्हाणके यांनी केलेल्या भाषणाला ‘हेट स्पीच’चा संदर्भ देत त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट झाली. हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, राष्ट्रप्रेमी काजल हिंदुस्तानी यांना ‘हेट स्पीच’च्या नावाखाली अटक केली होती. यातून आपण सर्वांनी किती जागरूक असले पाहिजे, हे लक्षात घेतले पाहिजे.

३. हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्‍यांविरोधी कायदेशीर कारवाई करण्याकरता उपाययोजना 

हिंदु धर्माविरुद्ध द्वेषमूलक वक्तव्य झाली, तर आपण न्याय मागू शकत नाही का किंवा त्यावर काही उपाययोजना नाहीत का ? तर उपाययोजना नक्कीच आहेत. आपण द्वेषमूलक वक्तव्याच्या विरोधात पुढील गोष्टी करू शकतो.

३ अ. द्वेषमूलक वक्तव्याने धार्मिक, जातीय भावना दुखावतात. तो भारतीय दंड विधान आणि प्रचलित कायद्याप्रमाणे गुन्हा आहे. त्यामुळे आपण पोलिसात आणि अन्य ठिकाणी तक्रार देऊ शकतो. त्यासाठी द्वेषमूलक वक्तव्ये कुणी केली ? कोणत्या पद्धतीने केली ? (उदाहरणार्थ लिखाण, वक्तव्य, छायाचित्र (कार्टून) किंवा सामाजिक माध्यम, इलेक्ट्रॉनिक मिडिया) हे पहावे. थोडक्यात मूळ स्रोताचा शोध घ्यावा. ते आपल्या संग्रही पुरावा म्हणून जपून ठेवावे. पेन ड्राईव्ह, इंटरनेट कॅफेकडील पावती आदी, तसेच भ्रमणसंचाद्वारे भाषण ऐकले अथवा भाषणाचा व्हिडिओ पाहिला असल्यास ते ‘डाऊनलोड’ करून ‘सीडी’मध्ये जपून ठेवावेत.

३ आ. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे अशी कोणतीही घटना घडल्याचे लक्षात येताच त्याचे पुरावे गोळा करून सुरक्षित ठेवावेत. त्याविषयी हिंदूंमध्ये जागृती करणारा, तसेच कायदेशीर कार्यवाही करणारा कार्यान्वित गट सिद्ध ठेवावा. या कार्यान्वित गटात पत्रकार, अन्य हिंदु संघटनांचे मोजके आवश्यक पदाधिकारी, अधिवक्ता, समाजमाध्यमांवर काम करणारे आदी असावेत. हिंदु धर्मविरोधी कोणतेही ‘हेट स्पीच’ केल्याचे निर्दशनास येताच या संदर्भात पोलीस ठाण्यापासून समाजमाध्यमांपर्यंत हा विषय पोचवून त्या विरोधात कृती करण्यासाठी उद्युक्त करावे. प्रथम विषयाची जागृती करणे, ‘स्पीच’विरोधी कायदेशीर तक्रारीविषयी मार्गदर्शन घेऊन तक्रार प्रविष्ट करणे, पत्रकार आणि समाजमाध्यमांच्या माध्यमातून हिंदुविरोधी वक्तव्य करणार्‍याविषयीच्या ‘पोस्ट’ पाठवून जागृती करणे, पत्रकारांच्या माध्यमातून तक्रार प्रविष्ट होऊन कारवाई होईपर्यंत सर्व स्तरांवरून प्रयत्न करणे, तसेच निरनिराळ्या ठिकाणी स्पीच करणार्‍या व्यक्तीविरुद्ध, त्यास प्रसिद्धी देणारे वृत्तपत्र, वाहिनी अथवा समाजमाध्यमांच्या अधिकृत व्यक्ती या सर्वांच्या विरोधात कारवाई करण्याकरता प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३ इ. तक्रार देत असतांना लेखी तक्रार द्यावी. पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे नोंदवण्यासाठी आग्रही रहावे. ‘माहिती व तंत्रज्ञान कायदा’, ‘भारतीय दंड विधाना’च्या विविध कलमांखाली गुन्हा प्रविष्ट (दाखल) होऊ शकतो.

३ ई. वक्तव्ये जर शासनकर्त्यांनी केली असतील, तर त्यांच्याविरुद्ध ‘रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट’ (लोकप्रतिनिधीत्व अधिनियम) १९५१, कलम ८ मधून आपण गुन्हे नोंदवण्यासाठी आग्रही राहू शकतो. जर हा गुन्हा १५३ अ, १५३ ब, १५३ (२) त्यासह ५०५ (१) (२) भारतीय दंड विधानाप्रमाणे आणि ‘धार्मिक संस्था (दुरुपयोगास प्रतिबंध) कायदा’ कलम ३ ते ६ प्रमाणे सिद्ध झाला, शिक्षा झाल्यास तो शासनकर्ता ६ वर्षे निवडणूक लढवू शकत नाही.

३ उ. दोषी व्यक्तींविरुद्ध आपण वर्तमानपत्रात लेख, तसेच सामाजिक माध्यमांतून विषयाचे खंडण मांडून हिंदूंना जागृत करू शकतो. त्यासह मोठ्या प्रमाणात जागृती आणि विरोध करण्याकरता असा राजकीय नेता/ ‘हेट स्पीच’ करणार्‍या व्यक्ती यांच्या जिथे सभा अथवा अन्य कार्यक्रम असतील, तिथे लोकशाही मार्गाने विरोध दर्शवणे, असेही प्रयत्न करू शकतो. कार्यक्रम रहित करण्याकरता प्रयत्न करतांना ‘हेट स्पीच’ केल्याविषयीचे जुने संदर्भ सादर करून कार्यक्रम रहित होईपर्यंत कायदेशीर मार्गाने प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे. अशा रितीने प्रयत्न झाल्यास कायद्याचा धाक निर्माण होऊन असे वक्तव्य करणार्‍यांच्या कायदेशीररित्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात.

४. कार्यान्वित गटाद्वारे प्रयत्न केल्यास झालेले लाभ

काही वर्षांपूर्वी हिंदु धर्मद्वेष्टे चित्रकार एम्.एफ्. हुसेन याने हिंदूंच्या देवता, तसेच भारतमाता यांची अश्लाघ्य चित्रे काढली होती. त्याच्या विरुद्ध भारतभरात १२०० हून अधिक तक्रारी झाल्या. त्यामुळे त्याला भारत सोडून पलायन करावे लागले. तो भारतात जिवंत असतांना येऊ शकला नाही आणि मेल्यानंतरही त्याचे दफन भारतभूमीत होऊ शकले नाही, तसेच त्याचे हिंदु देवीदेवतांच्या नग्न चित्रांचे प्रदर्शन कुठेही भरले नाही अथवा भरू देण्यास विरोध होऊन प्रदर्शन रहित करण्यास आयोजकांना कायदेशीर मार्गाने भाग पाडण्यात आले. ‘इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन’चा डॉ. झाकीर नाईक याच्याविरोधातही अनेक निवेदने, तक्रारी करण्यात आल्या. अनेक फौजदारी याचिका करण्यात आल्या आणि त्या सर्वांचा परिपाक म्हणून त्याच्या संघटनेवरही शासनाद्वारे बंदी घालण्यात आली. हे यश अगदी छोटेसे आहे.

हिंदूंच्या विरुद्ध वक्तव्य होत असतांना पोलीस जर तुमच्या फौजदारी तक्रारीवर पुढे कारवाई करत नसतील, तर आपण तालुकास्तरावरील अधिवक्त्यांच्या माध्यमातून ‘फौजदारी प्रक्रिया संहिता’ कलम १५६ (३) अन्वये न्यायालयात याचिका प्रविष्ट करू शकतो, गुन्हा नोंदवू शकतो आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई होऊ शकते. आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय येथे द्वेषमूलक वक्तव्य आणि त्यानुसार झालेल्या कृतीविरुद्ध पीडितांसाठी दाद मागू शकतो, तसेच हानीभरपाई मागू शकतो. यासह पीडितांना संरक्षण मिळावे यासाठी आग्रही राहू शकतो. ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे’, (कलियुगात संघटितपणातच सामर्थ्य असते.) ही उक्ती लक्षात ठेवून सर्वांनी एकत्रित येऊन हिंदुविरोधी वक्तव्ये करणार्‍यांविरुद्ध सनदशीर प्रयत्न करूया.

श्रीकृष्णार्पणमस्तु |

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय.