पाकिस्तानी चित्रपट ‘द लीजंड ऑफ मौला जट्ट’ हा चित्रपट येत्या २ ऑक्टोबर या दिवशी भारतात प्रदर्शित होणार आहे; मात्र हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठणकावून सांगितले आहे. ‘पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट मुळात भारतात प्रदर्शित का होऊ दिले जातात ? कलेला देशांच्या सीमा नसतात, हे इतर गोष्टींत ठीक आहे; पण पाकिस्तानविषयी हे सूत्र अजिबात चालू देणार नाही. ‘हिंदुस्थानचा द्वेष’ या एकमेव सूत्रावर जो देश तग धरून आहे, अशा देशातील कलाकारांना येथे आणून नाचवणे, त्यांचे चित्रपट प्रदर्शित करणे, हा काय प्रकार चालू आहे ? महाराष्ट्र सोडाच; पण देशातील कुठल्याच राज्यात हा चित्रपट तेथील सरकारांनी प्रदर्शित होऊ देऊ नये’, असे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
बॉलिवूडच्या पाकड्यांसाठी पायघड्या !
वर्ष २०१६ मध्ये झालेल्या ‘उरी’ आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यावर बंदी घालण्यात आली होती. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशनने ‘सुरक्षा’ आणि ‘देशभक्ती’चे कारण देत नियम बनवला होता की, ते सीमापार कलाकारांना भारतात काम करण्याची अनुमती देणार नाहीत. यानंतर पाकचे फवाद खान, माहिरा खान, अली जफर, राहत फतेह अली खान यांसारख्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये बराच काळ काम केले नाही. ऑक्टोबर २०२३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पाकिस्तानी कलाकारांवरील या बंदीला ‘सांस्कृतिक समरसता, एकता आणि शांतीसाठी प्रतिकूल’ असे म्हटले, तसेच ‘परदेशातील आणि शेजारील देशांतील नागरिकांचा विरोध करणे देशभक्तीचे प्रदर्शन करत नाही’, असे म्हणत ही बंदी हटवली होती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर पाकिस्तानी कलाकारांसाठी भारतीय चित्रपटांमध्ये काम करण्याचे दरवाजे खुले झाले. त्यानंतर पाकिस्तानचा गायक आतिफ अस्लम हा बॉलिवूडमध्ये येण्याची चाहूल लागताच त्यालाही मनसेनेच विरोध केला होता. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बॉलिवूड चित्रपट ‘लव्ह स्टोरी ऑफ नाईनटीज’च्या निर्मात्यांनी त्यांच्या नव्या चित्रपटासाठी आतिफसमवेत करार केला होता. आतिफ अस्लम या पाकड्या गायकाला बॉलिवूड चित्रपटात गाण्यासाठी देशातील काही निर्माते पायघड्या घालतात. विरोध डावलण्याची भाषा बॉलिवूडचा गायक अरिजीत सिंह करतो. यावरून बॉलिवूडच्या गायकाचे देशप्रेम किती आहे ? हे लक्षात येते. अशा गायकावर भारतियांनी बहिष्कार घालायला हवा.
दुसरीकडे पाकिस्तानने आतापर्यंत बॉलिवूड आणि हॉलिवूड येथील एकूण ४३ चित्रपटांवर बंदी घातली आहे. यात ‘रांझणा’ या हिंदी चित्रपटात एका मुसलमान मुलीची एका हिंदु मुलाच्या प्रेमात पडणारी आणि त्याच्याशी प्रेमसंबंध असल्याची प्रतिमा दाखवल्यामुळे या चित्रपटावर पाकमध्ये बंदी घालण्यात आली होती, तसेच ‘भाग मिल्खा भाग’मध्ये पाकिस्तान क्रीडा प्राधिकरणाने अन्यायकारक मार्ग वापरल्याचे आणि त्यात पाकचे चुकीचे चित्रण करण्यात आले म्हणून या चित्रपटावर बंदी घालण्यात आली.
पाकचा आतंकवाद आठवा !
‘पाकिस्तानच्या छुप्या आक्रमणामुळे मागील ३० ते ३५ वर्षांत तब्बल ८० सहस्रांहून अधिक भारतियांनी प्राण गमावले आहेत. आपण आणखी किती भारतियांचे प्राण गमावणार ? पाकिस्तानने वर्ष १९९० मध्ये पंजाबमध्ये आतंकवाद पेटवला आणि केवळ पंजाबमध्ये २१ सहस्र भारतियांनी प्राण गमावले. त्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवाद पेरला. आतापर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये ४५ सहस्र भारतियांनी प्राण गमावले आहेत, तसेच वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांपासून आतापर्यंत देशभर झालेल्या अनेक आतंकवादी आक्रमणात किमान १५ सहस्र भारतीय मृत्यूमुखी पडले आहेत. आतंकवाद घडवून आणण्यासाठीच पाकिस्तानने ‘दाऊद-गँग’लाही पोसले. आतंकवादामुळेच तब्बल ४ लाख ५० सहस्र काश्मिरी पंडित विस्थापित झाले. प्रतिदिन सीमेवर मृत्यूसत्र चालू आहे. त्यामुळे पुष्कळ पूर्वीच पाकिस्तानला धडा शिकवण्याची आवश्यकता होती; परंतु आधीच्या सरकारांच्या बोटचेप्या धोरणामुळे पाकिस्तानशी युद्ध होऊ शकले नाही. पाकचा हा आतंकवाद भारतियांनी आठवावा !
बॉलिवूड कलाकारांचे राष्ट्रप्रेम कधी जागृत होणार ?
देशातील मुंबई येथील चित्रपट उद्योगात म्हणजे बॉलिवूडमध्ये गेल्या ७० वर्षांपासून अनेक कलाकार काम करत आहेत. या उद्योगामुळे अनेकांना रोजगार मिळून त्यांचे जीवन यशस्वी झाले आहे. देशातील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये चित्रपटांतून भरघोस प्रसिद्धी आणि पैसा मिळवला आहे. हे करत असतांना बॉलिवूडवाले पाकिस्तानचे कलाकार किंवा पाकिस्तानचे चित्रपट यांना कधी विरोध करत नाहीत. १-२ टक्के कलाकार पाकच्या चित्रपटांना विरोध करतील; मात्र ९८ टक्के कलाकार मूग गिळून गप्प का बसतात ? त्यांना पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे, हे ठाऊक असतांनाही ते अशा गोष्टींकडे लक्ष का देत नाहीत ? बॉलिवूडमधील कलाकारांना देशाचे काही देणेघेणे नाही. चित्रपटातून हिंदु देवतांचे विडंबन करून चित्रपटात हिंदु-मुसलमान भाईचाराचे गोडवे गाणे आणि चित्रपटातून देशावर प्रेम असल्याचे नाटक करणे, हेच या कलाकारांना जमते. खरेतर पाकिस्तान हा भारताचा शत्रू असल्याने बॉलिवूडच्या कलाकारांनी पुढे सरसावून मनसेला साथ द्यायला हवी.
पाकच्या चित्रपटांवर बहिष्कारच हवा !
आतापर्यंत मनसेने पाकिस्तानचे चित्रपट, गायक यांना विरोध करण्यासमवेत पाकिस्तानबरोबर भारतीय क्रिकेटपटूंनी क्रिकेट खेळायला विरोध केला आहे. पुरुष विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आक्षेप घेतला होता. आतंकवादी आक्रमणामागे पाकिस्तानचा हात आहे, हे अनेक वेळा पुराव्यासह सिद्ध झालेले आहे. अशा राष्ट्राचे आपण स्वागत करायचे का ? जेव्हा असे सामने होतात, तेव्हा पाकिस्तानी नागरिक पाकचे झेंडे घेऊन येतात. हे आपण सहन करावे का ? या प्रकरणाची देशभर चर्चा व्हायला हवी. जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रहित केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच चवताळला होता. त्याने भारतासमवेत व्यापारी संबंध तोडल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये धावणारी समझोता एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद केली, तसेच पाकिस्तानी चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपट प्रदर्शित करण्यावरही बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. असे आहे, तर पाकिस्तानच्या कलाकारांचे चित्रपट भारतात कशासाठी प्रदर्शित करायचे ? अशा चित्रपटांवर हिंदुत्वनिष्ठ संघटना, हिंदुत्वनिष्ठ राजकीय पक्ष, धर्मप्रेमी, राष्ट्रप्रेमी अशा देशातील सर्व स्तरांतील प्रत्येक नागरिकाने बहिष्कारच घालायला हवा !
पाकिस्तान भारतातील चित्रपटांवर बंदी घालत असतांना भारताने पाकच्या चित्रपटांना पायघड्या घालणे, ही स्वाभिमानशून्यता ! |