पू. भिडेगुरुजी यांच्यावर केलेल्या टीकेचे भोर (पुणे) येथील हिंदु जनआक्रोश मोर्चात शरद पवारांना प्रत्युत्तर !
पुणे – पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची पात्रता, त्यांची श्रेष्ठताही महान आहे. पू. भिडेगुरुजी यांची उंची हिमालयासारखी आहे, तर शरद पवार म्हणजे फर्ग्युसनची टेकडी आहेत. पुण्यातील भोर येथे हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी मिलिंद एकबोटे यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.
पू. संभाजी भिडेगुरुजी यांनी मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता नसल्याचे विधान काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या विधानाविषयी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले होते, ‘संभाजी भिडे हे काय कमेंट (मत व्यक्त) करण्याच्या लायकीचे आहेत का ? काहीही प्रश्न विचारतात’, असे म्हणत थेट पू. भिडेगुरुजी यांच्यावर निशाणा साधला होता. याच पार्श्वभूमीवर हिंदु आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘महिलांच्या सुरक्षेसाठी सरकारने ‘लाडकी बहीण’सारखी ‘सुरक्षित बहीण’ योजना काढावी’, असेही मिलिंद एकबोटे या वेळी सांगितले. ‘बांगलादेशमध्ये सैन्य घुसवून तेथील हिंदूंना संरक्षण दिले पाहिजे’, अशी मागणीही मिलिंद एकबोटे यांनी केली आहे.
या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या कु. प्राची शिंत्रे, आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प. राहुल महाराज पारठे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. राहुल शिंदे, श्री. सुनील खळदकर, ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे श्री. नितीन भागवत यांनी मोर्चाच्या समारोप प्रसंगी मनोगत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सकल हिंदु समाजाच्या वतीने भोर येथे शेकडोंच्या संख्येत पार पडला मोर्चा !
बांगलादेशात झालेल्या हिंदूंच्या हत्या, हिंदूंवर केलेले अत्याचार, तसेच देशभरात होणार्या लव्ह जिहादच्या घटना यांविरोधात भोर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चामध्ये बांगलादेशातील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने संयुक्त राष्ट्र संघात आवाज उठवावा, तसेच लवकरात लवकर लव्ह जिहादविरोधी आणि धर्मांतरविरोधी कायदा करावा, अशा मागण्या या वेळी करण्यात आल्या. या विषयाचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने भोर तहसीलदार यांना देण्यात आले.