Temple Attack : बांगलादेशात पूर यायला भारत कारणीभूत असल्यामुळे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड !

बांगलादेशातील मदरशात शिकणार्‍या एका १८ वर्षीय विद्यार्थ्याचे कृत्य !

ढाका (बांगलादेश) – येथील एका मदरशाच्या विद्यार्थ्याला ३ हिंदु मंदिरांची तोडफोड केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. या वेळी त्याने सांगितले की, बांगलादेशात आलेला पूर भारताने सोडलेल्या पाण्यामुळे आल्याचे कळाल्याने मी मंदिरांना लक्ष्य केले. २ मंदिरांतील मूर्ती आणि इतर वस्तू यांची तोडफोड केल्यानंतर तिसर्‍या मंदिराची तोडफोड करतांना १८ वर्षीय रब्बी होसेन याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी मंदिर समितीचे अध्यक्ष अरुण सरकार यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार प्रविष्ट केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.

१. ही घटना राजशाही बाघा उपजिल्हातील पकुरिया आणि कालीग्राम भागातील मंदिरांमध्ये २३ ऑगस्टच्या सकाळी घडली. कालीग्राम सर्वजनीन दुर्गा मंदिर, पणिकामारा मंदिर आणि पकुरिया मंदिर अशी आक्रमण केलेल्या मंदिरांची नावे आहेत. विशेष म्हणजे हा उपजिल्हा पूर आलेल्या ठिकाणापासून पुष्कळ दूर आहे.

२. उपजिल्हा पूजा उत्सव समितीचे अध्यक्ष सुजित कुमार पांडे यांनी सांगितले की, रब्बीने सांगितले की, त्याने त्याच्या बहिणीच्या भ्रमणभाषवर पाहिले की, भारतातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बांगलादेशातील लोक पुराच्या पाण्यात बुडत आहेत. हा व्हिडिओ पाहून त्याला रात्रभर झोप लागली नाही. त्यातून त्याने हे कृत्य केले.

३. बांगलादेशातील भारतद्वेष्ट्यांनी अशी अफवा पसरवली होती की, भारताने त्रिपुरातील गुमती नदीवरील डुंबूर जलविद्युत् प्रकल्पातून पाणी सोडल्याने बांगलादेशातील फेनी, कुमिल्ला आणि नोआखली या जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या अफवेवरून विद्यार्थ्यांनी भारताच्या विरोधात निदर्शनेही केली. भारत सरकारने मात्र हा दावा फेटाळून लावला.

हिंदूंवर अन्यत्रही आक्रमण !

बांगलादेशातील ठाकूरगाव आणि पंचमढ येथे हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. येथील राधाकृष्ण मंदिरात धर्मांध मुसलमानांनी चोरी करून मौल्यवान वस्तू, तसेच दानपेटी चोरून नेली. ठाकूरगाव येथे हिंदूंच्या घरांची जाळपोळ करण्यात आली.

संपादकीय भूमिका

ऊठसूठ कुठल्याही गोष्टीला भारताला उत्तरदायी ठरवणे आणि त्याचा सूड म्हणून हिंदू अन् त्यांची मंदिरे यांवर आक्रमण करणे, हा पराकोटीचा हिंदुद्वेष आहे ! एरव्ही हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे आता याविषयी काही बोलत का नाहीत ?