Shankaracharya on Bangladeshi Hindus : भारत सरकारने हिंदूंसाठी भूमी आणि सुरक्षा द्यावी, आम्‍ही जेवणाची व्‍यवस्‍था करू ! – ज्‍योतिष पीठेचे शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

  • बांगलादेशातील हिंदूंसाठी शंकराचार्यांनी उठवला आवाज !

  • ‘सहस्रो बांगलादेशी भारतात रहातात हे बांगलादेश सरकारने विसरू नये’, अशी चेतावणी बांगलादेशाला दिली !

शंकराचार्य स्‍वामी अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती

नवी देहली – शेख हसीना यांना सत्तेतून पायउतार होण्‍यास आणि देशातून पलायन करण्‍यास भाग पाडल्‍यापासून बांगलादेशातील हिंदूंवर जिहादी मुसलमानांकडून सातत्‍याने आक्रमणे होत आहेत. याला भारतातील हिंदू आणि त्‍यांच्‍या संघटना यांच्‍याकडून विरोध केला जात आहे. तसेच शंकराचार्यांनीही याला विरोध केला आहे. ‘बांगलादेशामध्‍ये जिहाद्यांकडून आक्रमणे होत असलेल्‍या हिंदूंना वाचवण्‍यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत’, असे आवाहन ज्‍योतिष पीठाचे शंकराचार्य अविमुक्‍तेश्‍वरानंद सरस्‍वती यांनी केले. ते म्‍हणाले, ‘‘बांगलादेशात हिंदूंचे रक्षण झाले पाहिजे. सहस्रो बांगलादेशी भारतात रहातात हे बांगलादेश सरकारने विसरू नये. आम्‍ही बांगलादेशातील हिंदूंना भारतात भूमी आणि सुरक्षा प्रदान करण्‍याची सरकारला विनंती करतो. आम्‍ही त्‍यांच्‍या अन्‍नाची आणि इतर गरजांची काळजी घेऊ आणि सरकारवर भार टाकणार नाही.’’

चीन भारताला अस्‍थिर करण्‍यासाठी बांगलादेशाचा वापर करत आहे ! – पुरीच्‍या पुर्वाम्‍नाय पीठाचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती

शंकराचार्य स्वामी निश्‍चलानंद सरस्वती

पुरीच्‍या पुर्वाम्‍नाय पीठाचे शंकराचार्य स्‍वामी निश्‍चलानंद सरस्‍वती यांनी म्‍हटले की, बांगलादेशात शांतता प्रस्‍थापित करूनच सर्व काही सोडवले जाऊ शकते. हिंदू शांतताप्रिय आहेत आणि जेव्‍हा हिंदू सुरक्षित असतील, तेव्‍हा देश सुरक्षित राहील.

बांगलादेशात अशा प्रकारचा हिंसाचार घडवून आणणे, हा चीनचा कट आहे. आता चीन भारताला अस्‍थिर करण्‍यासाठी बांगलादेशाचा वापर करत आहे. बांगलादेशाला हे समजले नाही, तर येत्‍या काही दिवसांत त्‍याचे अस्‍तित्‍व संपुष्‍टात येईल.

बांगलादेशात हिंदूंच्‍या हत्‍या कोण करत आहेत?, याचा भारतीय मुसलमानांनी विचार करावा  ! – द्वारका पीठाचे शंकराचार्य स्‍वामी सदानंद सरस्‍वती

शंकराचार्य स्‍वामी सदानंद सरस्‍वती

द्वारका पीठाचे शंकराचार्य स्‍वामी सदानंद सरस्‍वती म्‍हणाले की, भारत आणि बांगलादेश यांच्‍या सरकारांनी एकत्र येऊन हिंदूंच्‍या दुर्दशेवर चर्चा करावी. पाकिस्‍तान आणि बांगलादेश येथील हिंदूंची स्‍थिती चांगली नाही. गेल्‍या ५० वर्षांपासून जे काही (हिंदूंवर अत्‍याचार) होत आहे ते योग्‍य नाही. त्‍यांचा काय दोष ? त्‍यांना वेचून का मारले जात आहे ? मंदिरे का पाडली जात आहेत ? या समस्‍येवर लवकरात लवकर तोडगा निघायला हवा.

असे झाले नाही, तर असा दिवस येईल की, जगाच्‍या कोणत्‍याही भागात हिंदूंचा छळ होईल आणि त्‍यांना साहाय्‍य करायला कुणीही नसेल. भारतीय मुसलमानांना बांगलादेशात हिंदूंची हत्‍या आणि त्‍यांच्‍यावर लक्ष्यित आक्रमणे कोण करत आहेत, याचा विचार करायला हवा. बांगलादेशात अजूनही १ कोटी २५ लाख हिंदू आहेत. एवढी मोठी संख्‍या असूनही त्‍यांना अशा कठीण परिस्‍थितीचा सामना करावा लागत आहे. भारतातील मुसलमानांनीही याचा विचार केला पाहिजे की, तिथे त्‍यांची कोण हत्‍या करत आहे ?

कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्‍वती यांच्‍याकडून स्‍थिती पूर्ववत् होण्‍यासाठी प्रार्थना

शंकराचार्य विजयेंद्र सरस्‍वती

कांची पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्‍वती यांनी अशांतताग्रस्‍त बांगलादेशात शांतता पूर्ववत् होण्‍यासाठी विशेष प्रार्थना केली आहे. त्‍यांनी बांगलादेशामध्‍ये शांतता, सुरक्षा आणि स्‍थैर्य राखण्‍याचे आवाहन केले.