वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांची वर्ष १९६३ मध्ये टेक्सास येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर या हत्येशी संबंधित दस्तऐवज आता जनतेसाठी पूर्णपणे उपलब्ध झाले आहेत. सरकारी पारदर्शकतेतील हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. ‘एक्स’वर याविषयीची घोषणा करतांना अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबर्ड म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अधिकाधिक पारदर्शकतेच्या नवीन युगाचा प्रारंभ करत आहेत. त्यांच्या निर्देशानुसार पूर्वी संपादित केलेल्या जॉन केनेडी यांच्या हत्येच्या ‘फाईल्स’ कोणत्याही संपादनाखेरीज जनतेसाठी प्रसिद्ध केल्या जात आहेत.
१. या निर्णयामुळे ३१ सहस्र पानांच्या १ सहस्र १०० हून अधिक ‘फाईल्स’ प्रसिद्ध झाल्या आहेत. या कागदपत्रांमध्ये अन्वेषण यंत्रणांचे अहवाल समाविष्ट आहेत.
२. २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी केनेडी यांनी डॅलस (टेक्सास) येथे भेट दिली होती. केनेडी त्यांच्या पत्नी जॅकलिन, टेक्सासचे गव्हर्नर जॉन कॉनली आणि कॉनली यांच्या पत्नी नेली यांच्यासमेवत एका उघड्या चारचाकीमधून शहरातून प्रवास करत होते. त्या वेळी त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अद्याप कुणालाही शिक्षा झालेली नाही.
३. केनेडी यांची हत्या अजूनही व्यापक चर्चेचा विषय आहे आणि त्यामुळे असंख्य कट सिद्धांत आणि पर्यायी परिस्थिती निर्माण झाल्या आहेत. बहुसंख्य अमेरिकी लोकांना आजही असे वाटते की, यात एक कट आहे.