‘आपल्या विश्वाची निर्मिती एका विशिष्ट नियमाने झाली असली, तरी मानवाने विविध नीती, नियम सिद्ध करून संपूर्ण विश्वाला कुंपणात अडकवून ठेवले आहे. अलीकडच्या काळात आणि दुसर्या महायुद्धात जे काही घडले, त्यानंतर संपूर्ण जग विश्वशांतीची अपेक्षा करत होते; पण घडणार वेगळेच होते; कारण विश्वाची मांडणी आता वैचारिक द्वंद्वात होणार होती आणि यात मुख्य भूमिका टोकाच्या वैचारिक प्रदूषणाची असणार होती. याकडे दीर्घ दृष्टीक्षेपातून पाहिले, तर विचारसरणी ही धर्माप्रमाणे वापरली गेली आणि ती वैयक्तिक स्वरुपात कार्यरत झाली. त्यामुळे त्यावर पाहिजे तसे नियंत्रण आजतागायत शासनकर्त्यांना मिळवता आले नाही. त्यामुळे सोव्हिएत संघाच्या नेतृत्वात अधिकाधिक साम्यवादी (डावे) विचार असलेल्या देशांची फळी उभी राहिली आणि तिकडे पश्चिमेत अमेरिकेच्या नेतृत्वात भांडवलशाही (उजवे) विचारांचे देश एकत्र आले. त्यानंतर जवळपास ४० वर्षे आंतरराष्ट्रीय स्तरावर वैचारिक प्रदूषणाचे दाट काळे आकाश स्थिरावले; पण अनेक देशांनी जागतिकीकरणाचा स्वीकार केल्याने त्यांच्या विचारसरणी मागे पडत जाऊन जेथे राष्ट्रीय हित असेल, तेथे संबंध निर्माण केले गेले आणि देशाचे स्वहित जोपासले जाऊ लागले; पण जागतिक स्तरावर असलले विचारांचे युद्ध हळूहळू काही विकसनशील देशांतील राजकीय पक्षात पाझरू लागले. यात मुख्य आणि तटस्थ भूमिका साम्यवादी विचारांनी घेतली. यात भारतात काँग्रेस पक्षाने भूमिका निभावली आणि भारतातील सामान्य जनतेला सत्याकडून भ्रमाकडे नेले. त्याचा भारताची सुरक्षा आणि परराष्ट्र संबंध यांवर सर्वाेच्च परिणाम झाला. कारण या समाजवादी आवण साम्यवादाचा पगडा असलेल्या नेत्यांनी मुख्यतः जवाहरलालने भारताला भ्रमात ठेवून आप-आपल्या सोयीने राजकारण केले ज्याचा तपशील आपण समजून घेऊया..
१. जवाहरलाल नेहरू यांच्या अयशस्वी धोरणामुळे स्वातंत्र्योत्तर भारताचे भविष्य अंधकारमय
ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांच्या सरकारने मोहनदास गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या हातात सत्तेचे हस्तांतरण केले आणि जवाहरलाल नेहरू भारताचे पंतप्रधान बनले. मुळात ते स्थान सरदार वल्लभभाई पटेल यांना मिळणार होते; पण अंतर्गत राजकारणाने सरदार पटेल यांच्यावर मात केली. सत्तेच्या हस्तांतरणानंतरचे भारताचे भविष्य नेहरू यांच्यामुळे अपयशी ठरले. त्यामुळे आजही आपल्या देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यातील सर्वांत महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे काश्मीर प्रश्न आजतागायत नेहरू यांच्या चुकीमुळे सहस्रो सैनिकांच्या बलीदानानंतरही ताटकळत राहिलेला आहे. पाकिस्तानने वर्ष १९४७-४८ मध्ये काश्मीर वाद निर्माण केला. त्यानंतर नेहरूंनी हा विषय संयुक्त राष्ट्र संघटनेत नेला, जी आजपर्यंत सर्वांत मोठी राजकीय चूक ठरली. त्यांच्या याच चुकीमुळे संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून नियंत्रण रेषेची (‘एल्.ओ.सी.’ची) स्थापना केली. तेव्हापासून या क्षेत्रात सतत संघर्ष आणि अस्थिरता कायम राहिली आहे. भारताचे संसाधन आणि सैन्यबळ यांचा मोठा भाग या संकटाचे निराकरण करण्यासाठी प्रतिवर्षी वापरला जातो.
२. चीनवरील अंधविश्वासामुळे भारताची प्रचंड हानी !
नेहरूंनी केलेली दुसरी चूक, म्हणजे त्यांनी शेजारच्या साम्राज्यवादी चीनवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ‘हिंदी-चिनी भाई भाई’च्या लोभस शब्दांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. वर्ष १९६२ मध्ये चीनने भारतावर आक्रमण करून नेहरूंना झोपेतून जागवण्याचा प्रयत्न केला; पण नेहरू त्यांच्याच मस्तीत दंग राहिले. भारत-चीन युद्धात ब्रिगेडियर जे.पी. दळवी यांनी एक उत्कृष्ट भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘‘वर्ष १९६२ चे युद्ध राष्ट्रीय अपयश होते. त्याचा दोष प्रत्येक भारतियांवर आहे, हे युद्धाच्या उच्च दिशा निर्देशनांचे अपयश होते, हे विरोधी पक्षाचे अपयश होते, प्रशासनाचे अपयश होते, ते उत्तरदायी जनतेचे आणि प्रसारमाध्यमांचेही अपयश होते. भारत सरकारसाठी ती सर्व स्तरांतील पुष्कळ मोठी हिमालयासारखी चूक होती.’’
३. तत्कालीन सैन्यप्रमुख आणि संरक्षणमंत्री यांच्यातील दुफळी
यासमवेतच नेहरूंनी सैन्यातील आवडत्या व्यक्तींना नियुक्त्या देण्याची चूक केली. ७ ऑक्टोबर १९५० या दिवशी चिनी सैन्याने तिबेटवर आक्रमण केले. तेव्हाच जोरदार प्रत्युत्तराची आवश्यकता होती; पण झोपलेल्या तत्कालीन शासनकर्त्यांनी सैन्याला शांत झोपू दिले. त्यामुळे भारतीय सैन्याचे अपयश नेहमी चिंतेचा विषय राहिला आहे. आपले योद्धे शर्तीने लढतात; पण त्यांचे शौर्य केवळ विजयासाठी वापरले जाते आणि अपयश पदरात पडल्यानंतर त्यांच्या शौर्याविषयी कुठेही वाच्यता केली जात नाही; कारण त्यातून राजकीय हित यशस्वी होत नाही. हे राजकीय हित साधण्यासाठी राजकारणी किती खालच्या स्तरावर जातात, याचे उत्तम उदाहरण, म्हणजे वर्ष १९६२ मध्ये ‘थिमय्या विरुद्ध मेनन’ या दुफळीने दिसून येते. नेहरू आणि तत्कालीन संरक्षणमंत्री मेनन यांचे चीनप्रती असलेले प्रेम तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल थिमय्या यांना चिंतेत पाडायचे. जनरल थिमय्या यांना पुढील १-२ वर्षांत होणारी चीनची घुसखोरी आणि आक्रमण यांविषयी पूर्वकल्पना होती. त्यामुळे ते वेळोवेळी मेनन आणि नेहरू यांना सूचित करायचे; पण नेहरूसाहेब रात्री-अपरात्री बैठका घेऊन सैन्याधिकार्यांचा अपमानकारक शब्दांनी पाणउतारा करायचे. हा अपमान इतका खालच्या दर्जाचा असायचा की, काही सैन्याधिकार्यांनी तर विरोध म्हणून त्यागपत्र दिले होते.
त्या वेळी जनरल थिमय्या यांच्यासमोर मेनन यांनी चीनसमोर टाकलेली नांगी भारताचे सार्वभौमत्व संकटात आणणारी होती. ‘चीन विरोधात बोलायचे नाही’ आणि ‘त्यांच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलायचे नाही’, असा अप्रत्यक्ष आदेशच तत्कालीन अधिकार्यांना नेहरूंचे मित्र मेनन यांचा होता. त्यामुळे जनरल थिमय्या यांना कोणतीही कारवाई करतांना सावधगिरी बाळगावी लागत होती.
जनरल थिमय्या यांनी वर्ष १९५५ ते १९६० या काळात सिडनी विंगर यांच्या नेतृत्वाखाली गुप्त पर्वतारोहण अभियान चालू केले होते. त्यामध्ये अक्साई चीन आणि झिझियांग यांमध्ये चीनच्या सर्व हालचाली नोंदवल्या गेल्या; पण चुकून तिबेट सीमा क्षेत्रात प्रवेश केल्याने चिनी गस्ती पथकाने ३ भारतीय सैनिकांना पकडले आणि सर्व माहिती काढून घेतली. ही सर्व घडामोड नेहरूंपर्यंत पोचली. त्यानंतर त्या भारतीय अधिकार्यांची खरडपट्टी काढण्यात आली. या अभियानामुळे जी मोडकी तोडकी माहिती सैन्यापर्यंत आली, त्यामुळे वर्ष १९६२ च्या युद्धात भारताची मानहानी बर्यापैकी राखली गेली. मेनन यांना शेवटपर्यंत हे गुप्त अभियान सहन झाले नाही आणि त्यांनी जनरल थिमय्या यांना अवमानित करून त्यागपत्र द्यायला भाग पाडले. शेवटी ७ मे १९५७ या दिवशी त्यांनी त्यागपत्र दिले. भारत येणार्या चीनच्या झंझावातात दृष्टी हरवून बसला.
४. चीनच्या विरोधातील नेहरूंची अयशस्वी नीती
तिकडे नेहरू यांना चीनविषयीच्या मवाळ धोरणाविषयी बराच दोष दिला जातो; पण पडद्यामागे तिबेटला जागतिक स्तरावर ‘स्वतंत्र देश’ म्हणून मान्यता मिळावी, यासाठी भारतीय नेतृत्व या अनेक प्रकारच्या हालचाली करत होते. वास्तविक याची मुळीच आवश्यकता नव्हती; कारण नेहरू अंतर्गत प्रश्नाऐवजी बाह्य प्रश्नांना प्राधान्य देऊ लागले होते. नेहरू त्यांच्या कुटनीतीच्या अंतर्गत कधी तिबेटसमवेत गुप्त बैठका घ्यायचे, तर कधी ‘आशियायी संबंध परिषदे’त तिबेटशी स्वतंत्र ओळख व्हावी; म्हणून त्यांना अमेरिका आणि युरोपीय देशांशी विशेष आमंत्रणाचा खेळ करायचे. त्यामुळे साहजिकच चीन डिवचला जाऊ लागला. नेहरूंनी उघड उघड तिबेटला पाठिंबा दिला नाही; पण राजकीय खेळीतून त्यांनी त्यांच्या स्तरावर शक्य होईल तेवढे कार्य केले; पण शेवटी के. माधव पणिक्कर आणि कृष्ण मेनन यांच्या चीनविषयी आंधळ्या प्रेमाने नेहरू नीती खोल दरीत कोसळली आणि ‘हिंदी-चिनी भाई भाई’चा दोष आपल्या सर्वांच्या माथी मारला गेला.
५. राष्ट्रवादी विचारसरणीचे नेते आणि अधिकारी यांच्याकडून अण्वस्त्र कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न
‘नेहरू वरवर जरी शांततेच्या गोष्टी करत असले, तरी आतून ते आक्रमक होते’, ही जी अफवा पसरवली जाते, ती मुळात खोटी आहे; कारण नेहरूंच्या नेतृत्वात असे काही राष्ट्र्रवादी विचारांचे राजकारणी आणि अधिकारी होते, ज्यांनी नेहरूंना अल्प माहिती देऊन अण्वस्त्र कार्यक्रम अंतिम टप्प्यात आणला होता. वर्ष १९६२ च्या अपयशानंतर हेच राष्ट्र्रवादी विचारांचे अधिकारी काही करून वर्ष १९६५ च्या आत अणुचाचणी घेणार होते; पण शेवटी नेहरूंची (मृत्यू १९६४) राजकीय इच्छाशक्ती, जी शेवटपर्यंत असावी लागते, ती कुठेतरी अल्प पडली आणि अण्वस्त्र कार्यक्रम शांत निद्रेत गेला. पुढे इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७४ मध्ये पुन्हा सक्रीय होऊन पोखरणमध्ये एक गुप्त चाचणी घेतली; पण हेन्री किंसींजर यांच्या धमकीने या अणु कार्यक्रमाला पुन्हा निद्रावस्था येते, जी पुढे गाढ निद्रिस्त होते. अशा प्रकारे अलिप्ततावादाचे पुरस्कर्ते माजी पंतप्रधान नेहरू यांच्या गंभीर चुकांमुळे भारताचा वर्ष १९४७ पासून ते १९९८ पर्यंतचा इतिहास सीमायुद्धात आणि शेजारील गुंता सोडवण्यात व्यय झाला. त्याची किंमत आजही भारत चुकवत आहे. यासमवेतच इंदिरा गांधी यांच्यामुळे देशांतर्गत राजकीय व्यवस्था फार कोलमडून पडलीच; पण भारताचे भविष्य अराजकाकडे जाऊ लागले.
६. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी नेहरू घराण्याने केलेल्या खेळीची माहिती लोकांपर्यंत पोचणे आवश्यक !
वरील माहिती ही वैचारिक प्रदूषणाचा एक भाग आहे; कारण नेहरूंचे समाजवादी विचार आणि साम्यवादी नेत्यांच्या कुबड्या यांचा आधार घेऊन बनलेल्या सरकारांनी भूमी स्तरावरील माहिती आपल्या सर्वांपासून लपवून ठेवली आणि आपल्या हाती भ्रमाचा भोपळा ठेवला. त्यामुळे तथाकथित इतिहासकारांनी लिहिलेला एकांगी इतिहास आजही आपल्या सर्वांवर एक वलय निर्माण करून आहे. हा इतिहास आपण आजही खोडू शकत नाही आणि त्यावर जोरदार प्रहारही करू शकत नाही; कारण या साम्यवादी विचारांच्या पिल्लांनी आपल्याला या संधीपासून लांब केले आहे. तरीही आपण नेहरू घराण्याने भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेविषयी जी खेळी केली आहे, त्याची सर्व माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू.’
– प्रा. विलास एन्. कुमावत, साहाय्यक प्राध्यापक, संरक्षणशास्त्र विभाग, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (८.८.२०२४)
(क्रमश:)
या लेखाचा पुढील भाग वाचण्याकरिता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/825262.html