सकल धनगर समाजाच्या पुणे येथील अधिवेशनात आमरण उपोषणाची चेतावणी !

धनगरांना ‘एस्.टी.’ कोट्यातून आरक्षण द्या !

पुणे – राज्यघटनेने धनगर समाजाला दिलेल्या अनुसूचित जमाती (एस्.टी.) आरक्षणाची राज्य सरकारने त्वरित कार्यवाही करावी, अन्यथा छत्रपती संभाजीनगर येथे जगातील सर्वात मोठे आमरण उपोषण करण्यात येईल. एस्.टी. आरक्षणाच्या संदर्भातील आपली भूमिका कशी असेल, हे राज्यातील प्रमुख पक्षांनी स्पष्ट करावे. पक्षांनी एस्.टी. आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही, तर धनगर समाज येत्या निवडणुकीत एकाही पक्षाला मतदान करणार नाही. सकल धनगर समाजाच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात भूमिका मांडण्यात आली.

सकल आरक्षसमाजाच्या वतीने पुणे येथील गंज पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होऊन काही ठरावही पारित करण्यात आले. या वेळी संपूर्ण राज्यातून कार्यकर्ते आले होते.

पारित झालेले ठराव पुढीलप्रमाणे आहेत. धनगड ऐवजी धनगर हीच जमात अधिकृत असल्याची दुरुस्ती करावी. कलम ३४२ (१) नुसार राज्यपालांनी दुरुस्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठवावी. डॉ. सुधाकर शिंदे समितीचा अहवाल तातडीने सरकारने सादर करावा. एस्.टी. आरक्षणाची कार्यवाही ८ दिवसांत करावी. छत्रपती संभाजीनगर येथे ५०० युवक आमरण उपोषण करणार. राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय समन्वय समिती स्थापन करणार.