|
कणकवली – नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या मुलांना आर्थिकदृष्ट्या मागासांसाठीच्या (ई.डब्ल्यू.एस्.च्या) आरक्षणाचा लाभ मिळालेला नाही. बीड जिल्ह्यात ई.डब्ल्यू.एस्. या कोट्यातून सगळे उमेदवार मुसलमान समाजाचे भरती झाले. त्यात एकाही मराठा उमेदवाराला भरती होता आले नाही. मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन मराठा समाजातील मुलांसाठी हवे, ते राजकारणासाठी नको. तुमच्या आंदोलनाचा लाभ मराठा समाजाला होत नसेल, तर त्याचा उपयोग काय ? इतर मागास प्रवर्ग (ओ.बी.सी.) आणि मराठा समाज यांच्यात भांडणे लावून तिसर्याच समाजाला लाभ देण्याचा प्रयत्न कोण करत असेल, तर आपण गप्प बसणार नाही, अशी चेतावणी भाजपचे प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत आमदार राणे पुढे म्हणाले…,
१. पोलीस भरतीत इ.डब्ल्यू.एस्.चा लाभ मुसलमान समाजाच्या लोकांनी घेतला; मात्र मराठा समाजाच्या लोकांना तो झाला नाही. बीड जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक तथा निवड मंडळाचे सचिव उमाशंकर कस्तुरे यांनी सार्वजनिक केलेल्या पोलीस भरती उमेदवारांच्या सूचीवरून हे सिद्ध होते.
२. या सूचीत ई.डब्ल्यू.एस्. अंतर्गत जे उमेदवार भरती झाले, ते सर्व मुसलमान समाजाचेच कसे आहेत ? मराठा समाजाला लाभ होत नसेल, तर चालू असलेले आंदोलन कुणासाठी आहे ?
३. मनोज जरांगे पाटील जेव्हा मराठा समाजाविषयी आणि मराठा आरक्षणाविषयी बोलतील, तेव्हा आमचा त्यांना पाठिंबा असेल. मराठा समाजाचे दुःख आणि आरक्षणाची आवश्यकता यांविषयी आम्हाला जाणीव आहे.
४. जर जरांगे पाटील यांची भाषा राजकीय असेल आणि ते केवळ भाजप अन् उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असतील, तर मात्र त्यांना तशाच पद्धतीने राजकीय उत्तर मिळेल.
५. जरांगे पाटील फडणवीस आणि भाजप यांच्यावर ज्या खालच्या भाषेत बोलतात, ती भाषा महाविकास आघाडीतील नेत्यांविषयी किंवा पक्षांविषयी ते वापरतांना दिसत नाहीत.