Chandigarh KFC Fine : शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी बर्गर दिल्‍यावरून के.एफ्.सी. आस्‍थापनाला १२ सहस्र रुपयांचा दंड

चंडीगड – शहरातील ग्राहक न्‍यायालयाने के.एफ्.सी. या खाद्यपदार्थ विकणार्‍या आस्‍थापनाला १२ सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. के.एफ्.सी.ने शाकाहारी ग्राहकाला मांसाहारी बर्गर दिला होता. त्‍यानंतर ग्राहकाने तक्रार केली होती. चंडीगडच्‍या सेक्‍टर ३५ मध्‍ये असलेल्‍या के.एफ्.सी. शाखेमध्‍ये वर्ष २०२३ मध्‍ये ही घटना घडली होती.

१. येथील अनिरुद्ध गुप्‍ता यांनी सांगितले, ‘मी आणि माझी पत्नी के.एफ्.सी.चे नियमित ग्राहक आहेत. पत्नी शुद्ध शाकाहारी आहे. ३ मे २०२३ या दिवशी मी के.एफ्.सी.च्‍या ऑनलाईन अ‍ॅपवर स्‍वत:साठी ‘चिकन बकेट’ हा मांसाहारी पदार्थ आणि पत्नीसाठी ‘क्‍लासिक व्‍हेज क्रिस्‍पर’ हा शाकाहारी पदार्थ मागला होता आणि त्‍याचे पैसेही दिले होते. जेव्‍हा माझ्‍या पत्नीने आम्‍हाला वितरित केलेला बर्गरचा पहिला घास घेतला, तेव्‍हा तिला काहीतरी विचित्र वाटले. तिने लगेच मला व्‍हिडिओ कॉल करून बर्गर दाखवला. बर्गरमध्‍ये चिकन आहे, हे पाहून मला आश्‍चर्य वाटले. माझी पत्नी शुद्ध शाकाहारी असल्‍याने तिला लगेच उलट्या होऊ लागल्‍या. के.एफ्.सी. व्‍यवस्‍थापकाच्‍या निष्‍काळजीपणामुळे पत्नी मानसिकदृष्ट्या अस्‍वस्‍थ आहे आणि अत्‍यंत तणावाखाली आहे, अशी तक्रार मी आस्‍थापनाकडे नोंदवली.

२. के.एफ्.सी. व्‍यवस्‍थापकाने गुप्‍ता यांच्‍या तक्रारीवर सांगितले की, खोट्या आणि फालतू कारणांवर के.एफ्.सी.कडून पैसे उकळण्‍याच्‍या आणि आस्‍थापनाची अपकीर्ती करण्‍याच्‍या दुर्भावनापूर्ण आणि अंतस्‍थ हेतूने तक्रार करण्‍यात आली आहे. तक्रारदाराने वस्‍तूस्‍थिती लपवून ठेवली की, मागणी केलेला पदार्थ व्‍यक्‍तीने पडताळणीनंतर घेतला होता. आमच्‍या पॅकेजिंगवर शाकाहारी पदार्थासाठी हिरवा चिन्‍ह आहे, तर मांसाहारी पदार्थासाठी लाल चिन्‍ह आहे.

३. मागणीच्‍या पावत्‍यांचा अभ्‍यास केल्‍यानंतर ग्राहक न्‍यायालयाने सांगितले की,  के.एफ्.सी.ने पावत्‍यांमध्‍ये नमूद केलेल्‍या ‘व्‍हेज क्रिस्‍पर बर्गर’ऐवजी चिकनने भरलेले मांसाहारी क्रिस्‍पर बर्गर दिले होते, हे तक्रारदाराने काढलेल्‍या बर्गरच्‍या छायाचित्रांवरून स्‍पष्‍ट होते. यातून के.एफ्.सी. व्‍यवस्‍थापकाच्‍या सेवेचा अभाव आणि निष्‍काळजीपणा दिसतो. व्‍यवस्‍थापक तक्रारदाराने दिलेल्‍या पुराव्‍याचे खंडन करण्‍यात पूर्णपणे अयशस्‍वी ठरला आहे. एक गोष्‍ट स्‍पष्‍ट होते की, तक्रारदाराला सेवा देतांना के.एफ्.सी. व्‍यवस्‍थापकाने निष्‍काळजीपणा दाखवला आणि तक्रारदाराच्‍या पत्नी, जी शुद्ध शाकाहारी आहे, तिला चुकीच्‍या पद्धतीने मांसाहारी पदार्थ दिले. त्‍यामुळे तिच्‍या भावना दुखावल्‍या गेल्‍या आणि तिला मानसिक त्रास अन् तणाव यांचा सामना करावा लागला. या मानसिक त्रास आणि छळ यांची भरपाई म्‍हणून तक्रारदाराला ७ सहस्र रुपये आणि खटल्‍याच्‍या खर्चापोटी ५ सहस्र रुपये द्यावेत, असा आदेश दिला.

संपादकीय भूमिका

केवळ दंड करून अशांना सोडू नये, तर त्‍यांना कारावासाचीही शिक्षा करण्‍यात आली पाहिजे !