China ​Border Villages : चीनने भारतासह ९ देशांच्या सीमांवर वसवली १७० गावे !

चीन माजी सैनिकांना या गावांमध्ये करत आहे स्थायिक !

नवी देहली – चीनने भारतासह त्याचे शेजारी असणार्‍या ९ देशांच्या सुमारे २२ सहस्र किलोमीटर लांबीच्या सीमांवर १७० हून अधिक नवीन चिनी गावे वसवली आहेत. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग राबवत असलेल्या सुरक्षा प्रकल्पांच्या नावाखाली मागील ८ वर्षे ही गावे वसवण्याचे काम चालू आहे. चिनी सैन्य येथे रहाणार्‍या गावकर्‍यांचा ‘खबरे’ म्हणून वापर करते. हे गावकरी चिनी सैन्याला सीमेवरील असलेल्या अनेक देशांनी तैनात केलेल्या सैनिकांच्या हालचालींची गुप्त माहिती पुरवतात. चीनच्या सैन्यातून निवृत्त झालेले लोक हेच बहुतांश गावात स्थायिक होत आहेत.

१. अमेरिकेचे वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्स आणि ‘प्लॅनेट लॅब्स’ या संस्थेने ५ वर्षे चीनच्या आंतरराष्ट्रीय सीमांवरील शेकडो उपग्रह छायाचित्रांचा अभ्यास केला.

२. यामध्ये चीनच्या उत्तरेकडील मंगोलियापासून मध्य आशियापर्यंत, तसेच दक्षिणेकडील व्हिएतनामपर्यंत चीनच्या या गावांच्या वसाहती आढळून आल्या आहेत.

३. या गावांमध्ये रस्ते आणि इंटरनेट सेवाही कार्यान्वित करण्यात आली आहे. चीनमधील सीमावर्ती गावांची संख्या पुढील ५ वर्षांत ५०० वर पोचण्याचा अंदाज आहे.

४. सरासरी १० सहस्र फूट उंचीवर वसलेल्या या गावांतील लोकांना गस्तीसाठी चीन सरकार दरमहा २१ सहस्र रुपये देत आहे. येथे स्थायिक होण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला अंदाजे २ लाखांहून अधिक रुपये देण्यात येत आहेत.

भारताकडूनही सीमारेषेवरील गावांचे पुनरुज्जीवन !

भारतानेही नियंत्रणरेषेवर गावांचे पुनरुज्जीवन करण्यास आरंभ केला आहे. चीनचे तज्ञ ब्रायन हार्ट यांच्या मते, ‘या योजनेंतर्गत भारत नवीन गावे वसवत नाही, तर आधीच असलेल्या गावांचे पुनरुज्जीवन करत आहे.

संपादकीय भूमिका

भारताने अधिकाधिक युद्धसज्ज होणे का आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना !