हस्तरेषाशास्त्राची प्राथमिक ओळख

१. हस्तरेषाशास्त्राची काही मूलतत्त्वे

१ अ. व्यक्तीच्या तळहातांवरील रेषा म्हणजे व्यक्तीच्या मेंदूचा आलेख : ‘व्यक्तीच्या तळहातांवरील रेषा, म्हणजे तिच्या मेंदूचा आलेख असतो. व्यक्तीच्या मनात ६ मास सातत्याने एकच विचार येत असेल, तर तळहाताच्या विशिष्ट भागात त्याची रेषा सिद्ध होते. या रेषा तात्कालिक किंवा तळहातावर असलेल्या मुख्य रेषांचा विस्तार असतात. जिवाच्या जन्मानंतर ३ ते ४ मासांनंतर त्याच्या तळहातावर प्रारब्ध-कर्मानुसार मुख्य रेषा विकसित होतात. जिवाच्या वर्तमान कर्मानुसार या रेषांचा विकास होतो आणि त्या प्रबळ होत जातात.

१ आ. व्यक्तीच्या डाव्या हातावरून तिचे पूर्वजन्मांतील संस्कार, गुण-दोष, कौशल्य, साधनाप्रवास, आध्यात्मिक स्थिती आदींविषयी समजणे : व्यक्तीचा डावा हात म्हणजे तिच्या अंतर्मनाचे प्रतिबिंब आहे. व्यक्तीच्या डाव्या हातावरील रेषांवरून तिचा पूर्वजन्म, संचित कर्म, देवाण-घेवाण हिशोब, पूर्वजन्मांतील संस्कार, स्मृती, मनोवृत्ती, गुण-दोष, क्षमता, कौशल्य, साधनाप्रवास, मृत्यू इत्यादींविषयी कळते, तसेच व्यक्तीच्या डाव्या हातावरून ‘गतजन्मी तिला ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींपैकी कोणत्या देवाकडून मार्गदर्शन मिळत होते ?, गतजन्मी त्रिमूर्तींपैकी कोणत्या देवाचे गुण तिच्यात होते ?, तिचा साधनामार्ग कोणता होता ?, तिची आध्यात्मिक स्थिती कशी होती ?, तिचा साधनाप्रवास षट्चक्रांपैकी कोणत्या चक्रापर्यंत झाला होता ?’, इत्यादी समजू शकते.

१ इ. व्यक्तीच्या उजव्या हातावरून ती ‘वर्तमान जन्मात तिचे मन, बुद्धी, कौशल्य आणि क्षमता यांचा वापर कसा करते ?’, हे समजणे : व्यक्तीचा उजवा हात हा बाह्यमनाशी संबंधित आहे. या हातावरून ‘व्यक्ती वर्तमान जन्मात तिचे मन, बुद्धी, कौशल्य आणि क्षमता यांचा वापर कसा करते ?, तिच्या विचारांची दिशा कशी आहे ?, ती स्वतःमधील दुर्बलतेवर कशी मात करते ?, ती गतजन्मापेक्षा वर्तमान जन्मात चांगले कार्य करत आहे का ?, तिची प्रगती योग्य दिशेने होत आहे का ?’, आदींविषयी समजू शकते.

१ ई. व्यक्तीच्या क्रियमाण-कर्मानुसार तिच्या तळहातांवरील रेषांमध्ये पालट होणे : व्यक्तीने योग्य मार्गाने साधना केल्यास तिचे प्रारब्ध सुसह्य होऊ शकते. व्यक्तीला योग्य साधनामार्ग आणि मार्गदर्शन मिळाल्यास, तसेच तिने साधनेचे प्रयत्न तळमळीने केल्यास तिला मोक्षप्राप्ती होऊ शकते. प्रत्येक जिवाला स्वतःचे क्रियमाण वापरता येऊ शकते. जिवाचे प्रयत्न अन् विचार यांनुसार त्याच्या तळहातांवरील रेषा पालटू लागतात. व्यक्तीच्या वर्तमानकाळातील चांगल्या किंवा वाईट कर्मांनुसार तळहातांवरील रेषा प्रबळ किंवा कमकुवत होतात.

१ उ. ईश्वराची कृपा झाल्यास व्यक्तीच्या तळहातांवरील रेषांमध्ये ६ मास ते २ वर्षांच्या कालावधीत चांगले पालट होतात.

२. तळहातांवरील महत्त्वाच्या रेषा आणि त्यांची वैशिष्ट्ये

हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला

२ अ. हृदय रेषा : या रेषेवरून व्यक्तीचा स्वभाव, मनोवृत्ती, संवेदनशीलता, भावनाशीलता, इच्छा, आकांक्षा, आसक्ती आदींचा बोध होतो. ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींमधील कोणत्या देवाची कृपा व्यक्तीवर आहे ?’, हे लक्षात येते. व्यक्तीचे जीवन ‘धर्म’, ‘कर्म’ किंवा ‘मोक्ष’ यांपैकी कशासाठी व्यतित होणार आहे ?’, हे समजते. व्यक्तीच्या जोडीदाराचे बाह्यरूप आणि त्यांच्यातील प्रेमसंबंध यांविषयी माहिती होते. या रेषेचा आरंभ आणि अंत यांवरून ‘व्यक्ती बुद्धीमत्ता, न्याय, प्रसिद्धी, अर्थार्जन, इच्छा, संघर्ष किंवा महत्त्वाकांक्षा यांपैकी कोणत्या गोष्टीकडे झुकलेली आहे ?’, हे समजते. व्यक्तीचे हृदयासंबंधीचे विकार किंवा तिचा मृत्यू हृदयविकाराने होणार का ?, याविषयी कळते.

टीप : या रेषेची गुणवत्ता पुष्कळ घटकांवर अवलंबून असते. गुणवत्ता अधिक असल्यास लाभ होतो; मात्र रेषेत त्रुटी असल्यास असंतोष, त्रास आणि आजार वाढतात.

२ आ. मस्तक रेषा : मस्तक रेषेवरून व्यक्तीमधील सकारात्मक आणि नकारात्मक विचार करण्याची क्षमता लक्षात येते.

२ आ १. मस्तक रेषा चांगली असणे : व्यक्तीच्या तळहातावर मस्तक रेषा चांगली असल्यास (म्हणजे अखंड आणि उठावदार असल्यास) तिच्यावरून व्यक्तीची बौद्धिक क्षमता, विचारप्रक्रिया, सृजनशीलता (creativity), कौशल्य, विद्या, ज्ञान, कृतीतील परिपूर्णता, अर्थार्जनाचा स्रोत आदींविषयी बोध होतो.

२ आ २. मस्तक रेषा चांगली नसणे : व्यक्तीच्या तळहातावर मस्तक रेषा चांगली नसल्यास (म्हणजे तुटलेली आणि अस्पष्ट असल्यास) व्यक्तीच्या जीवनात भावनिक चढ-उतार, मानसिक आघात, मानसिक आजार, त्रास, निराशा, चिंता, उद्वेग, क्रोध इत्यादी असतात.

२ इ. जीवन रेषा (आयुष्य रेषा)

२ इ १. जीवन रेषा चांगली असणे : व्यक्तीच्या तळहातावर जीवन रेषा चांगली असल्यास ती व्यक्तीचे आरोग्य, आयुष्यमान, जीवनातील मोठे सकारात्मक किंवा नकारात्मक प्रसंग, जिवाला धोका पोचवणारे प्रसंग किंवा अपघात, व्यावहारिक अथवा आध्यात्मिक दृष्टीने जीवनाला कलाटणी देणारे प्रसंग इत्यादी दर्शवते.

२ इ २. जीवन रेषा चांगली नसणे : व्यक्तीच्या तळहातावर जीवन रेषा चांगली नसल्यास ती अपघात, गंभीर आजार, आत्महत्येचे प्रयत्न, आयुष्यातील नकारात्मक प्रसंगांचा प्रभाव, पूर्वजांचे त्रास, अपघाती मृत्यू, जीवनातील चढ-उतार इत्यादी दर्शवते.

२ ई. भाग्य रेषा (अध्यात्म रेषा) : ही रेषा व्यक्तीची पूर्वजन्मातील सत्कर्मे आणि दैवी कृपा यांचा तिच्या वर्तमान जन्मावर होत असलेला परिणाम दर्शवते. या रेषेवरून पुढील गोष्टींची माहिती कळते.

अ. व्यक्तीचा जन्म चांगल्या कुटुंबात झाला आहे का ? ती पालकांसाठी भाग्यवान आहे का ?

आ. व्यक्तीवर देवाची कृपा आहे का ? तिच्यावर असलेली देवाची कृपा ही वर्तमान जन्मातील चांगल्या कर्मांमुळे आहे कि गतजन्मांतील सत्कर्मांमुळे आहे ?

इ. व्यक्तीच्या जीवनाचे ध्येय काय ? तिला या जन्मात ते साध्य होईल का ? तिला अध्यात्माची आवड आहे का ? तिला गुरूंचे मार्गदर्शन मिळेल का ? इत्यादी

ई. भाग्य रेषेवरून व्यक्तीच्या षट्चक्रांची जागृती, ज्ञानाची सखोलता, विवेकशक्ती, मानवजातीच्या कल्याणासाठी तिचे असणारे योगदान आदींविषयी कळते.

या जन्मात आध्यात्मिक उन्नती साध्य करण्यासाठी केलेले प्रयत्न हे भाग्य रेषेवर परिणाम करतात अन् ती रेषा सुधारण्यास साहाय्यभूत ठरतात. याचा अर्थ, या जन्मातील साधना आणि सत्कर्मे यांमुळे भाग्य रेषा पालटते अन् पूर्वजन्मांतील चुकीच्या कर्मांचे परिमार्जन होते.

२ उ. सूर्य रेषा

अ. या रेषेवरून व्यक्तीला मिळणारी प्रसिद्धी, यश, इच्छापूर्ती, नेतृत्वगुण, शासकीय योजनांचे लाभ, प्रशासकीय अधिकार, राजकीय कारकीर्द, शासकीय क्षेत्रातील व्यवसाय आणि प्रशासकीय संस्थांकडून मिळणारा लाभ यांची माहिती मिळते.

आ. सूर्य रेषेवरून व्यक्तीची कुप्रसिद्धी आणि अहंकार यांविषयीही समजते.

२ ऊ. बुध रेषा (आरोग्य रेषा)

अ. ही रेषा प्रामुख्याने संभाषण-कौशल्य, आर्थिक व्यवहार, संपत्ती, व्यवसाय, व्यवस्थापन, एखादी गोष्ट कृतीत आणणे, कठोर श्रम करण्याची सिद्धता आणि अंतर्ज्ञानाची क्षमता यांच्याशी संबंधित आहे.

आ. ही रेषा अखंड आणि सरळ असल्यास व्यक्ती स्वतःच्या आरोग्याविषयी जागरूक असते अन् तिला आरोग्यपूर्ण जीवन जगण्याची इच्छा असते.

२ ए. विवाह रेषा

अ. या रेषेवरून साहचर्य, तात्पुरते आकर्षण, प्रेम, मानसिक संबंध आणि विवाह यांविषयी समजते.

आ. ‘व्यक्तीला किती संतती होतील ?’, हे या रेषेवरून समजू शकते.

२ ऐ. संस्कार रेषा

तळहातावरील शुक्राच्या उंचवट्याला समांतर असणार्‍या रेषांना ‘संस्कार रेषा’ म्हणतात. यांवरून ‘व्यक्तीवर असणारे संस्कार किती दृढ आहेत ?’, हे लक्षात येते. या रेषांवरून व्यक्तीचा देवाण-घेवाण हिशोब समजतो.

३. हाताच्या बोटांच्या पेरांचा अर्थ आणि त्यांचे महत्त्व

पेर म्हणजे कांड किंवा भाग. हाताच्या प्रत्येक बोटाची ३ पेरे म्हणजे ३ भाग असतात. हस्तरेषशास्त्राच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व पुढे दिले आहे.

३ अ. बोटांची सर्वांत वरची पेरे : ही व्यक्तीमधील व्यवस्थापन-कौशल्य, नेतृत्वगुण, महत्वाकांक्षा आणि आक्रमकता दर्शवतात.

३ आ. बोटांच्या मध्यभागी असलेली पेरे : ही एखादा विचार प्रत्यक्षात आणण्याची क्षमता दर्शवतात.

३ इ. बोटांची खालची पेरे : ही व्यक्तीची कठोर श्रम करण्याची क्षमता दर्शवतात.

४. ‘तळहातावरील मुख्य आणि लहान रेषा वाढणे, अस्पष्ट होणे किंवा नाहीशा होणे’ याचा अर्थ

४ अ. तळहातावरील रेषांमध्ये वाढ होणे : हे व्यक्तीच्या गुणवैशिष्ट्यांत योग्य दिशेने वाढ होत असल्याचे निदर्शक आहे.

४ आ. काही रेषा अस्पष्ट किंवा नाहीशा होणे : असे होणे अशुभ घटना दर्शवतात किंवा जीवनाच्या त्या कालावधीतील देवाण-घेवाण हिशोब संपल्याचे दर्शवतात. हे समजणे इतके सहज नाही. यात बरेच पैलू आहेत आणि त्यासाठी इतर रेषांचाही अभ्यास करावा लागतो.

४ इ. तळहातावर लहान रेषा उमटणे किंवा त्या नाहीशा होणे : व्यक्तीच्या मनात एखाद्या विषयासंबंधी विचार निर्माण झाल्यास तशा लहान रेषा हातावर उमटतात किंवा त्या नाहीशा होतात. त्या रेषा सकारात्मक किंवा नकारात्मक असू शकतात, तसेच त्या जीवनातील चढ-उतारांवर परिणाम करतात. लहान रेषा नाहीशा होणे, म्हणजे एखादे कार्य किंवा विचार पूर्ण झाल्याचे किंवा त्याच्याशी संबंधित प्रारब्ध संपल्याचे दर्शक असते.

– हस्तरेषातज्ञ सुनीता शुक्ला, ऋषिकेश, उत्तराखंड.

(१७.४.२०२४)