आज सरदार उधमसिंह यांचा बलीदानदिन आहे. त्या निमित्ताने विनम्र अभिवादन !
१३ एप्रिल १९१९ या दिवशी पंजाबमधील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे मोठी सभा चालू होती. जालियनवाला बागमध्ये १५ सहस्रांहून अधिक माणसे जमली होती. मार्च मासात ब्रिटीश सरकारने संमत केलेल्या ‘रौलेट कायद्या’चा निषेध करणार्या सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू यांना अटक करण्यात आली, तर आंदोलकांवर गोळ्याही चालवण्यात आल्या होत्या. या वेळी इंग्रजांच्या छोट्या तुकडीचे नेतृत्व जनरल डायरने केले होते; पण या हत्याकांडाचा आदेश तत्कालीन पंजाब गव्हर्नर मायकल ओडवायर यांनी दिला होता.
१३ एप्रिल १९१९ या दिवशी उधमसिंह यांचे वय होते फक्त ४ वर्षांचे; पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांनी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली होती. त्यांनी ओडवायर यांची लंडनमध्ये हत्या करून जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेतला होता. त्याच उधमसिंह यांचा आज बलीदानदिन आहे. ३१ जुलै १९४० या दिवशी सरदार उधमसिंह यांना पेंटोनव्हीले कारागृहामध्ये फासावर चढवण्यात आले होते.
१. काय झाले होते जालियनवाला बागेमध्ये ?
‘रौलट कायद्या’चा शांतपणे निषेध करण्यासाठीच मोठा जनसमुदाय जालियनवाला बागेत जमलेला होता. अचानक आकाशातून लोकांना घरघर ऐकू आली. अनेकांनी यापूर्वी आयुष्यात कधीही विमान पाहिलेले नव्हते आणि हे विमान तर फारच खालून उडत होते.
काहींना काही तरी वेगळे घडत असल्याचा संशय आला आणि त्यांनी तिथून काढता पाय घेतला. अचानक मागून बुटांचा आवाज आला आणि जालियनवाला बागेमध्ये जाणार्या बोळासारख्या रस्त्याने ५० सैनिक मैदानात आले.
२. जनरल डायरच्या आदेशानंतर सलग १० मिनिटे चालू होता गोळीबार…!
२५ गुरखा सैनिक आणि २५ बलूच सैनिक अशी सैनिकांची एक फळी बसलेली, तर दुसरी उभी होती. सैनिकांनी पवित्रा घेतला आणि एकही सेकंद न गमावता जनरल डायरने आदेश दिला, ‘फायर’ (गोळी डागा) ! कोणतीही पूर्वसूचना न देता गोळीबार चालू झाला. चहूबाजूंनी बंदिस्त जालियनवाला बागेत अडकलेल्या लोकांवर पुढची १० मिनिटे बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव होत होता. सैनिक नेम धरून लोकांना टिपत होते.
१० मिनिटांच्या या गोळीबाराच्या वेळी डायरच्या सैनिकांनी गोळ्यांचे एकूण १ सहस्र ६५० राऊंड्स झाडले. यानंतर जनरल डायर जालियनवाला बागेतून बाहेर पडून त्याच्या गाडीत बसून निघून गेला, तर सैनिक संचलन करत परत गेले.
घटनेच्या रात्री जनरल डायरने तेव्हाचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर ओडवायर यांना पाठवलेल्या अहवालात ‘२०० लोक मारले गेले’, असे म्हटले होते. या गोळीबारात एकूण ३७९ लोक मारले गेल्याचे ‘हंटर समिती’ने म्हटले. यामध्ये ४१ लहान मुले होती; पण इथे प्रत्यक्षात १ सहस्र जण मारले गेल्याचे, तर ४ सहस्रांहून अधिक जण घायाळ झाल्याचे म्हटले जाते. अनेक घायाळ लोकांचा घरी गेल्यावर काही काळाने मृत्यू झाला.
३. जनरल डायरने केलेल्या नरसंहारानंतरचे क्रौर्य आणि ‘हंटर समिती’ने डायरला चुकीचे ठरवणे
जालियनवाला बागेत विव्हळत पडलेल्यांना त्या रात्री कोणतेही साहाय्य मिळाले नाही. जनरल डायरने संध्याकाळी संपूर्ण अमृतसर शहराचा वीज आणि पाणी पुरवठा बंद केला. लोकांना घराबाहेर पडायला मनाई करण्यात आली; म्हणून मग घायाळ झालेल्या नातेवाइकांना मैदानातून बाहेर आणणे वा मृतांना घरी आणणेही लोकांना शक्य झाले नाही. जनरल डायरने रात्री १० वाजता शहरात फेरी मारत परिस्थितीचा आढावा घेतला. ब्रिटीश राजवटीने प्रारंभीला या नरसंहाराची नोंद घेतली नाही; पण नंतर याविषयीच्या बातम्या पसरू लागल्या आणि त्यांना नोंद घ्यावी लागली. या प्रकरणाच्या अन्वेषणासाठी ब्रिटीश सरकारने ‘हंटर समिती’ची स्थापना केली.
या समितीसमोर जनरल डायरने सांगितले, ‘लोकांच्या किंकाळ्या आणि आक्रोश इतका होता की, गोळीबार थांबवण्यातही अडचणी आल्या; कारण मी देत असलेल्या सूचना सैनिकांना ऐकूच जात नव्हत्या. आपण लोकांवर गोळीबार करण्यासाठी ‘मशीन गन’चा वापर केला आणि बागेतून बाहेर पडण्याचा लहानसा रस्ता रोखला. जिथे अधिक प्रमाणात लोक असतील, तिथे गोळीबार करण्याचे आदेश दिला. गोळीबार बंद झाल्यानंतर घायाळ लोकांना रुग्णालयात नेण्याची किंवा मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय करण्यात आली नाही.’ पुढे हंटर समितीने डायरचे कृत्य चुकीचे ठरवले. यानंतर ब्रिटीश सरकारने जनरल डायरला त्यागपत्र द्यायला सांगितले.
४. जनरल डायर म्हणजे ‘ब्रिटीश साम्राज्याचा उद्धारक’ !
लंडनमधील ब्रिटीश संसदेत, म्हणजेच ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये या घटनेच्या अनुषंगाने खडाजंगी झाली. या सभागृहात ‘डायरचे कृत्य चुकीचे आहे’, असे म्हटले गेले; पण ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’ने डायरच्या बाजूने भूमिका घेतली. ब्रिटीश सरकार डायरवर अन्याय करत असल्याचे ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये म्हटले गेले. जनरल डायरकडे ‘ब्रिटीश साम्राज्याचा उद्धारक’ म्हणून पहाण्यात आले. जनरल डायरचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाल्यानंतर शासकीय पद्धतीने त्याचे दफन करण्यात आले.
(साभार : विविध संकेतस्थळे)