लोकसभा निकाल : इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे…!

लोकसभा २०२४ निवडणुकांचे निकाल लागून सत्ता स्थापन झाली आहे, तरीही या निकालाला देशातील बहुतांश राष्ट्रप्रेमी आणि समाजप्रेमी यांना अद्यापही स्वीकारता आलेले नाही. या विषयावर अद्यापही चर्चासत्रे, विश्लेषणे, विचारमंथनाचे कार्यक्रम होतात. वाहिन्यांवर या कारणांचा शोध घेतला जातो. सत्ताधारी पक्षासह अनेक हिंदुत्वनिष्ठांनाही धक्का बसल्यासारखे झाले. राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांनाही अनपेक्षित निकाल लागले, असे वाटले. या निकालाविषयीच्या काही कारणांचा घेतलेला शोध !

१. ‘एक्झिट पोल’ (मतदानोत्तर निकालाचा अंदाज) फसले !

या निवडणुकांच्या निकालामध्ये ५ ते ६ ‘एक्झिट पोल’ घेणारी आस्थापने आणि संयुक्तपणे कार्यरत असलेल्या वृत्तवाहिन्या यांनी भाजप पूर्ण बहुमत मिळवेल अन् ३०० चा पल्ला सहज गाठेल, असा अंदाज वर्तवला. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ‘एक्झिट पोल’ अचूक देणार्‍या एका आस्थापनाचे ‘एक्झिट पोल’चे आकडे या लोकसभा निवडणुकीच्या निकाल देतांना मात्र चुकले. इतर सर्वांचेही चुकलेच होते. ‘एक्झिट पोल’चे आकडे मोठ्या संख्येत चुकणे, म्हणजे काहीतरी गडबड आहे, हे लक्षात येतेच. म्हणजे या निकालांमध्ये असे काही वेगळेच निकाल लागतील ? याचा अंदाज बांधता आला नाही.

२. उत्तरप्रदेशमधील समीकरणे !

निवडणूक निकालांमध्ये सर्वाधिक चर्चा झाली, ती म्हणजे उत्तरप्रदेशची आणि त्या खालोखाल महाराष्ट्राची ! उत्तरप्रदेशमध्ये अयोध्येत श्रीराममंदिराचे उद्घाटन झाल्यामुळे भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून येतील, असे बहुतांश हिंदूंना वाटत  होते; मात्र उलटेच झाले. समाजवादी पक्षाचे उमदेवार अधिक संख्येने निवडून आले. रामभक्तांवर गोळ्या झाडणारा समाजवादी पक्ष देशात क्रमांक ३ चा पक्ष म्हणून उदयास आला. श्रीराममंदिरांमुळे हिंदूंमध्ये एक उत्साहाचे वातावरण होते; मात्र त्याच बाजूला श्रीराममंदिराविषयी मुसलमानांमध्ये अप्रसन्नतेचा सूर पहाण्यास मिळाला. श्रीराममंदिराच्या उद्घाटनाला निमंत्रित प्रमुख मौलानांना (इस्लामचे धार्मिक नेते) जिवे मारण्याच्या, बहिष्कृत करण्याच्या धमक्या मिळाल्या, म्हणजे श्रीराममंदिरामुळे जेवढे हिंदू एकत्र आले, असे वाटले, त्याहून या सूत्रामुळे मुसलमान विशिष्ट हेतूने एकत्र आले, असे सांगितले जाते. या मुसलमानांच्या एकीचा परिणाम मतांमध्ये रूपांतरीत झालेला अनेक ठिकाणी दिसला.

श्री. यज्ञेश सावंत

भाजपला उत्तरप्रदेशात वर्ष २०१९ मध्ये ६१ जागांवर विजय मिळाला होता, तो या वर्षी केवळ ३३ जागांवर सीमित झाला. मतांचा टक्काही ४९.६ टक्क्यांवरून ४१.४ टक्क्यांवर घसरला आहे. यामध्ये प्रस्थापित खासदारांच्या ऐवजी नवीन चेहर्‍यांना संधी देणे यांसारख्या महत्त्वाच्या चुकांचाही समावेश होऊ शकतो. अशा ३५ खासदारांचे तिकीट या वेळी कापण्यात आले होते. उत्तरप्रदेशमध्ये विकासापेक्षा जातीवर आधारित मतदान होण्याची परंपरा आहे. मुसलमान धर्मासाठी, तर हिंदु जातीसाठी मतदान करतात, हे येथे लागू होते.

उदाहरणार्थ ज्या रामपूर या गावात भाजपने ‘पंतप्रधान आवास योजने’अंतर्गत ५३२ घरे मुसलमानांना बांधून दिली; मात्र एकही मत भाजपला मिळाले नाही. विशेष म्हणजे गावात सर्व मुसलमान आहेत. २ सहस्र ३२२ एवढ्या लोकांनी मतदान केले आहे. याउलट उत्तरप्रदेशमध्ये समाजवादी पक्षाने उभे केलेले चारही मुसलमान उमेदवार खासदार म्हणून निवडून आले.

‘ज्याने उत्तरप्रदेश जिंकला, त्याने देश जिंकला’, असे उत्तरप्रदेशविषयी सांगितले जाते. हिंदुविरोधी समाजवादी पक्षासारखा अस्तित्वहीन झालेला पक्ष मोठ्या मताधिक्याने पुष्ट झाला, काँग्रेसचेही अधिक उमेदवार निवडून आले, ही हिंदूंसाठी धोक्याची घंटाच आहे. लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे निकालानंतर लगोलग मुसलमान महिलांनी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने आश्वासन दिलेली रक्कम घेण्यास रांगा लावल्या.

३. महाराष्ट्रातील राजकारण

महाराष्ट्रातही उत्तरप्रदेशप्रमाणे ‘एम् फॅक्टर’ (मुसलमान) चालला. बीड येथे भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून जिंकलेले शरदचंद्र पवार गटाचे (राष्ट्रवादी) उमेदवार बजरंग सोनावणे यांनी जिंकल्यानंतर मुसलमान समाजाचे आभार मानले. ‘तुमच्या साहाय्यामुळेच जिंकून आलो’, असे त्यांनी सांगितले.

धुळ्याचे माजी खासदार डॉ. सुभाष भामरे यांना यंदा पराभवाचा धक्का बसला. येथे नियमित निवडून येणारे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना ६ पैकी ५ विधानसभा मतदारसंघांमध्ये त्यांच्या प्रतिस्पर्धी काँग्रेसच्या डॉ. (सौ.) बच्छाव यांच्यापेक्षा एकूण आघाडी १ लाख ८९ सहस्र २१० मतांची मिळाली. काँग्रेसच्या डॉ. (सौ.) बच्छाव यांना केवळ मालेगावमध्ये १ लाख ९४ सहस्र ३२७ मतांची आघाडी मिळाली. परिणामी त्यामुळे सर्व फासे फिरले आणि त्या विजयी झाल्या. केवळ एका मतदारसंघातील मुसलमानांच्या मतांनी डॉ. भामरे यांच्या उर्वरित ५ मतदारसंघांतील मतांच्या आघाडीवर पाणी फेरले आणि काँग्रेसच्या डॉ. (सौ.) बच्छाव जिंकल्या.

अमरावतीमध्ये मुसलमानबहुल मतदानकेंद्रांचे जे सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित होणारे आकडे पाहिले, तर भाजपच्या नवनीत राणा यांना केवळ १ अंकी मते दिसतात, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना तेथे ३ अंकी मते दिसतात. या मुसलमानबहुल भागातील फरकामुळे केवळ २० सहस्र मतांच्या फरकाने त्या पराभूत झाल्या.

भाजपचे किरीट सोमय्या यांनी गोवंडीसारख्या मुसलमानबहुल भागांतून महाविकास आघाडीला मते मिळाल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मशिदीतून काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे फतवे जारी करण्यात आले. हा फतवा म्हणजेच मुसलमानांना धर्मादेश असल्याने सर्वदूरच्या मुसलमान मतदारांनी इमानइतबारे त्याचे पालन केलेच असण्याची शक्यता अधिक आहे.

मुसलमानांची मते काँग्रेसला मिळाली, म्हणजे त्यांची ‘व्होट बँक’ (मतपेढी) मिळाली आणि हिंदुत्ववादी पक्षांमध्येही फूट पडल्यामुळे हिंदूंची मतेही काँग्रेसला मिळाली, म्हणजे काँग्रेसचा अधिक लाभ झाला आहे, हे काँग्रेसने वर्ष २०१९ मध्ये जिंकलेल्या एका जागेवरून या निवडणुकांत १३ जागांवर झेप घेतल्यावरून लक्षात येते.

४. बंगालमध्येही पिछेहाट !

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता(बानो) यांच्या राजवटीत तेथील मुसलमानांकडून हिंदूंवर, हिंदु मतदार आणि उमेदवार यांच्यावर कशा प्रकारे अत्याचार होतात ? याच्या बातम्या आपण वाचलेल्या आहेत. केरळनंतर हिंदूंची नृशंस हत्याकांडे होणारे ते एक कुप्रसिद्ध राज्य बनले आहे. आधी तेथील साम्यवादी हिंदूंच्या हत्या करायचे, आता तृणमूलचे गुंड हत्या करतात, एवढाच काय तो भेद !

ममत बॅनर्जी यांनी साम्यवाद्यांचा गड समजला जाणारा बंगाल कसा भेदला ? मुसलमानांच्या एकगठ्ठा मतांवरच हा करिष्मा त्यांनी साकार केला आहे. त्यात ममता यांचे कर्तृत्व ते काय ? या धर्मांधांच्या जिवावरच त्या सत्तेत आल्या आणि विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांनी यश मिळवले आहे. परिणामी त्यांच्या मर्जीनुसार वागणे हे आलेच, त्यामुळे बंगालची वाटचाल वेगाने बांगलादेशाकडे होत आहे.

बंगालमध्ये सातत्याने निवडून येणारे काँग्रेसचे संसदेतील माजी गटनेते आणि माजी खासदार अधीर रंजन चौधरी यांचा या वेळी बंगाल येथे युसूफ पठाण या मुसलमान उमेदवाराने पराभव केला. यातूनही ही गोष्ट स्पष्ट होते की, मुसलमानांनी धर्माच्या आधारावर या वेळी मतदान केले आहे आणि संघटित होत ठरवून केले आहे. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सर्वांत जवळच्या पक्षाला एका मोठ्या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मतदान केले आहे. त्यामुळेच बंगालमध्ये काँग्रेसच्या हिंदु खासदाराऐवजी तृणमूलच्या मुसलमान खासदार त्यांना जवळचा वाटला.

५. सत्ताधार्‍यांचे विश्लेषण

न्यून जागा जिंकता आलेल्या, मतांची टक्केवारी घटलेल्या सत्ताधारी पक्षांचे म्हणणे आहे, ‘आम्ही जिंकून आलो, तर राज्यघटनेत पालट करू’, ‘राज्यघटनाच रहित करू’, ‘आरक्षण रहित करू’, अशी खोटी कथानके (नॅरेटिव्ह) विरोधकांनी, त्यातही काँग्रेसने पसरवली आणि त्याचे प्रत्त्युत्तर आम्ही योग्य प्रकारे न दिल्याने आम्ही हरलो.’ त्यांचा हा निष्कर्ष योग्य असला, तरी तो सर्वसामान्य जनतेला योग्य वाटतो का ? अशी कितीतरी खोटी कथानके काँग्रेसने या पूर्वीच्या निवडणुकांमध्ये पसरवली आहेत, निर्माण केली आहेत. जवळपास प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचे राहुल गांधी अतिशय अतर्क्य विधाने करतात, म्हणून प्रत्येक वेळी सत्ताधारी पक्षाचा पराभव झाला, त्यांना न्यून जागांवर विजय मिळाला, असे कुठे झाले आहे. किती जणांना ‘राज्यघटना पालटली जाणार’, हे पटेल ? सर्वसाधारण सुशिक्षित वर्गाला तर पटणारच नाही.

सत्ताधार्‍यांनी त्यांच्या मूळ मातृसंस्थेकडे दुर्लक्ष केल्याचेही एक कारण पराभवासाठी काही अंशी सांगितले जाते, ते योग्य असेलही; मात्र तो येथे चर्चेचा विषय नाही.

६. बहुतांश हिंदूंमध्ये गाफीलपणा !

पंतप्रधान मोदी यांच्या विकासकामांमुळे ते आणि अन्य उमेदवार सहजच निवडून येऊ शकतात, असेच जनतेला वाटले. परिणामी उन्हाळ्याच्या कालावधीत बहुसंख्य हिंदु मतदारांनी बाहेर पडणे टाळले, असे सांगितले जाते; कारण मतदानाची टक्केवारीच ४५ टक्के ते ६५ टक्के एवढी होती. त्याच्या उलट उत्तरप्रदेश, महाराष्ट्र येथे मुसलमान  मोठ्या संख्येत मतदानासाठी बाहेर पडल्याचे दूरचित्रवाणीवर दिसले. मागील वर्षीच्या तुलनेत सत्ताधारी पक्षाच्या ६३ जागा या वेळी घटल्या.

७. इतिहासातून शिकणार का ?

इतिहासात अनेक पराक्रमी राजे, राजपरंपरा झाली आहे. त्यांची राज्ये अजिंक्य होती; मात्र काही विपरित घटना, शत्रूची मानसिकता यांचे भान त्यांना न आल्याने त्यांचा पराभव झाला आहे. ७ व्या शतकात महंमद बिन कासीम याने सिंधवर स्वारी केली होती, म्हणजे भारतवर्षावरील ते पहिले इस्लामी आक्रमण होते. या वेळी मुसलमान शासक हज्जाज याच्यासमवेत भारतातील काही जण मिळाले, यामुळे अनेक गड मुसलमानांना कह्यात घेणे सोपे झाले. या वेळी काश्मीरचा राजा, कन्नौजचे प्रतिहार आणि दख्खन येथील राष्ट्रकूट येथील राजे तेव्हा एकत्र येऊन महंमद बिन कासिमला हरवू शकले असते; मात्र ते निष्क्रीय राहिले. यामुळे हिंदूंचे तेव्हाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मूलस्थान किंवा मुलतान मुसलमानांच्या कह्यात गेले. राजा दाहिर याला विश्वासघाताने पकडले, ठार केले आणि तेव्हा इस्लामी महाभयानक क्रौर्याचा पहिला अनुभव भारतवर्षातील जनतेला आला.

अल्लाऊद्दीन खिलजी याने यादव राजा रामचंद्राचा दारूण पराभव केला. रामचंद्र एकदम गाफील होता, त्याने त्याच्या गडाला, ना नगराला कुठेच सुरक्षा पुरवली नव्हती, उलट त्याने त्याचे बहुतांश सैन्य कर्नाटकातील होयसाळ शासकांच्या पारिपत्यासाठी पाठवले होते. राष्ट्रकूटच्या राजाने मुसलमानांवर भलताच विश्वास दाखवला आणि ते गाफील राहिल्यावर मुसलमानांनी राज्यात विध्वंस मांडला, कापाकापी केली, हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले आणि मंदिरे तोडली. वर्ष १५६५ मध्ये तालीकोठ येथील युद्धात राजा विजयनगरच्या रामरायाचे इस्लामी आक्रमकांशी युद्ध झाले, तेव्हा गिलानी बंधूंनी रामरायाच्या सैन्यातील मुसलमान सैनिकांना चिथवले आणि परिणामस्वरूप रामरायाचे मुसलमान सैनिक रामरायाविरुद्धच लढले. हा रामरायासाठी मोठा धक्का होता.

इतिहासातील ही उदाहरणे येथे मांडण्याचे कारण म्हणजे इतिहास हा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करण्यासाठी अभ्यासायचा असतो. जो स्वत:च्या संस्कृती, धर्म आणि देशाचा इतिहास विसरतो, तो इतिहासजमा होतो. भारतात सध्या लोकशाही व्यवस्था आहे. या लोकशाही व्यवस्थेचाच उपयोग करून एक मोठा धक्का मतांच्या माध्यमातून मुसलमानांनी दिला आहे. सत्ताधारी थोडक्यात या वेळी बचावले, अन्यथा हातातून सगळेच गेले असते आणि एका भयाण भविष्यकाळाला प्रारंभ झाला असता, अशा राष्ट्रप्रेमींच्या भावना आहे. शत्रू आहे त्या व्यवस्थेचाच अपलाभ घेऊन राज्य जिंकतो आणि नंतर मात्र पूर्ण व्यवस्थाच मोडूनतोडून टाकतो, हे वरील काही उदाहरणांतून लक्षात आले. तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी सावध होण्यातच त्यांचे भविष्य आहे, हे लक्षात घ्यावे.

श्री गुरुचरणार्पणमस्तु।

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन संकुल, देवद, पनवेल.