संत नामदेव महाराज यांचे गुरु संत विसोबा खेचर !

१. पांडुरंगाच्या आज्ञेनुसार संत नामदेव महाराज यांनी संत विसोबा खेचर यांच्याकडे गुरुपदेश घेणे

संत नामदेवांशी प्रत्यक्ष ईश्वर (पांडुरंग) बोलत असे. याचा त्यांना पुष्कळ अभिमान होता. एकदा संतांच्या सभेत संत गोरा कुंभार यांनी प्रत्येक संतांच्या डोक्यावर ‘मडक्यावर मारल्याप्रमाणे ते कच्चे कि पक्के आहे ?’ याची परीक्षा घेतली. ‘सर्व संतांमध्ये नामदेवाचे मडके (आध्यात्मिक स्थिती) कच्चे आहे’, असे संत गोरा कुंभारांनी सांगितले. त्या वेळी सर्व संत हसले. त्या वेळी पांडुरंग नामदेवांना म्हणाला, ‘‘गुरुविना तुला मुक्ती नाही मिळणार.’’ पांडुरंगाच्या आज्ञेनुसार नामदेव मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील औंढ्या नागनाथाच्या मंदिरात संत विसोबा खेचर यांच्याकडून गुरुपदेश घेण्यासाठी गेले.

२. संत विसोबा खेचर यांनी संत नामदेवांना ईश्वर सर्वत्र असल्याची दिलेली अनुभूती

नामदेव मंदिरात गेल्यावर त्यांनी संत विसोबा शिवपिंडीवर पाय ठेवून झोपले असल्याचे विचित्र दृश्य पाहिले. तेव्हा ते विसोबांना म्हणाले,  ‘‘उठी उठी प्राण्या आंधळा तूं काये । देवावरी पाय ठेवियेले ।।

– श्रीनामदेव चरित्र, अभंग ११५, ओवी ३

अर्थ : अरे, तू प्रत्यक्ष देवावर पाय ठेवला आहेस. आंधळा आहेस कि काय ? उठ, उठ आंधळा आहेस का ? देवावर पाय ठेवला आहेस. तेव्हा विसोबा म्हणाले, ‘‘देवावीण ठाव, रिता कोठे आहे ?’’

त्यावर विसोबा नामदेवांना म्हणाले, ‘‘जेथे नसे देव, तेथे ठेवी माझे पाय । अरे, देवाविना कोणती जागा आहे का ? जर असेल, तर तेथे माझे पाय ठेव.’’

त्यानंतर  संत नामदेवांना परमेश्वर सर्वत्र दिसत होता. जेथे देव नाही, अशी जागाच सापडली नाही. ते म्हणतात, ‘नामा पाहे अवघा जिकडे तिकडे देव । कोठें रिता ठाव न देखेची ।’ (श्रीनामदेव चरित्र, अभंग ११५, ओवी ७)

त्यांना हा अनुभव विलक्षण होता. आतापर्यंत ‘देव केवळ पंढरपूरमध्येच आहे’, असे नामदेवांना वाटत होते; परंतु आता ‘परमेश्वराचा वास सर्वत्र आहे’, याची त्यांना जाणीव झाली. कृतज्ञतेने त्यांचे डोळे भरून आले. नामदेव विसोबांना शरण गेले. विसोबांनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना गुरुपदेश दिला.

– ब्रह्मीभूत प.पू. मालतीदेवी

(साभार : ‘अंतर्नाद संदेश’, गुरुपौर्णिमा २००१)