Prachanda Government Collapses : नेपाळमध्ये चीन समर्थक सरकार कोसळले : पंतप्रधान प्रचंड यांना झटका !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळचे माओवादी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड हे संसदेत विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले. प्रचंड यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागले आहे. १२ जुलै २०२४ या दिवशी संसदेत विश्‍वासदर्शक ठरावावर झालेल्या मतदानात पंतप्रधान प्रचंड यांना केवळ ६३ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधात १९४ मते पडली.

प्रचंड यांना सत्तेवरून खाली खेचण्यात नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची मोठी भूमिका होती. आतापर्यंत ओली यांच्या ‘नेपाळ कम्युनिस्ट पार्टी’ (‘एमाले’ने) प्रचंड यांच्या ‘नेपाळ कम्युनिस्ट पार्टी-माओवादी’ पक्षाला पाठिंबा दिला होता. नेपाळमध्ये २०२२ मध्ये निवडणुका झाला होत्या, ज्यामध्ये कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पुरेशा जागा मिळाल्या नव्हत्या. या निवडणुकीत नेपाळी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला, त्याला ८९ जागा मिळाल्या होत्या, तर ओली यांच्या पक्षाला ७९ जागा मिळाल्या. प्रचंड यांच्या पक्षाला केवळ ३० जागा मिळाल्या होत्या, तरी ओली यांच्या पाठिंब्याने प्रचंड यांनी आघाडी सरकार बनवले होते. हे सरकार १९ माहिने सत्तेवर होते.

नेपाळमध्ये पुन्हा एकदा घटनादुरुस्तीची चर्चा !

वर्ष २००८ मध्ये राजेशाही पूर्णपणे संपुष्टात आल्यापासून नेपाळचे अंतर्गत राजकारण अस्थिर झाले आहे. वर्ष २००८ ते २०२४ या कालावधीत नेपाळमध्ये १३ वेळा पंतप्रधान पालटले आहेत. या कालावधीत नेपाळच्या राज्यघटनेतही पालट करण्यात आले होते. प्रचंड यांचे सरकार पाडल्यानंतर पुन्हा एकदा नेपाळमध्ये घटनादुरुस्तीची चर्चा चालू झाली आहे.