सप्तर्षी हे सृष्टीतील प्रत्येक जिवाच्या एकेका क्षणाचे साक्षीदार आहेत. ‘परमेश्वराने जे नियम घालून दिलेले आहेत, त्याचे पालन मनुष्य करतो कि नाही ?’ हे पहाणारे सप्तर्षी आहेत; जणू साक्षात् भगवंताचे नेत्रच ! भगवंताने ध्रुवबाळाप्रमाणे सप्तर्षींना तारकासमुहात स्थान दिले. त्यामुळे सप्तर्षींचे दर्शन आपल्याला रात्री घेता येते. रात्री आपल्याला ७ तार्यांचा एक समूहही दिसतो. याचा आकार आकाशात पतंग उडत असावा, तसा दिसतो. या तारकासमुहास ‘सप्तर्षी तारकासमूह’ असेही म्हटले जाते. यातील सर्वांत पुढचे जे दोन तारे आहेत, त्या तार्यांना जोडणारी सरळ रेषा जर उत्तरेकडे खेचत नेली, तर ती ध्रुवतार्याला जाऊन मिळते. ध्रुवतारा हा नेहमी उत्तरेला असतो. रात्रीच्या अंधारात वाट चुकलेल्या वाटसरूला जर आपण कोणत्या दिशेला निघालो आहोत ?, हे शोधायचे असेल, तर सप्तर्षी तारकासमूह ध्रुवतारा दाखवतो. त्यावरून आपल्याला उत्तर दिशा लगेच कळते. म्हणजे येथेही सप्तर्षी दिशादर्शन करतात. सप्तर्षींप्रती कृतज्ञता !