पुणे – ससून रुग्णालयात येणारे रुग्ण प्रामुख्याने गरीब असतात. अशा रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये. रुग्णालयात उपलब्ध असलेली औषधे डॉक्टरांनी लिहून द्यावीत, अशी सूचना बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, तसेच ससून सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली. डॉ. पवार यांच्याकडे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाविद्यालय परिषदेची बैठकही घेतली. रुग्णांना रुग्णालयातच विनामूल्य औषधे देण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे; मात्र ससूनमधील डॉक्टरांनी रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगितल्याच्या घटना घडल्या होत्या याची गंभीर नोंद घेऊन, असे प्रकार टाळण्याचे निर्देश डॉ. पवार यांनी दिले.
डॉ. एकनाथ पवार पुढे म्हणाले की, मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळे मला या संस्थेबद्दल आत्मीयता आहे. मागील काळात घडलेल्या घटनांमुळे संस्थेच्या लौकिकाला धक्का बसला आहे. संस्थेला पूर्वीचा लौकिक मिळवून देण्याचे माझे प्रयत्न असतील, तसेच ससून रुग्णालयातील रुग्ण सेवा सुधारण्यास प्राधान्य दिले जाईल. रुग्णांना योग्य आणि वेळेत उपचार मिळावेत या दृष्टीने पावले उचलली जातील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
संपादकीय भूमिकाससून रुग्णालयाची डागाळलेली प्रतिमा पुसण्यासमवेत अयोग्य कामे करणार्यांवर वचक निर्माण करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक ! |