महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप, उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद !

सर्वाधिक २० रुग्ण धुळ्यातील, नाशिकचे तापमानही उच्चांकावर !

पुणे – महाराष्ट्रात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २ महिन्यांत उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातील आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलढाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग १० अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. पुणे आणि परिसरात २८ एप्रिलला कमाल ४२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. २ मेपर्यंत उष्णतेची लाट कायम रहाण्याची चेतावणी पुणे वेधशाळेने दिली आहे.

नाशिकनेही गाठली तापमानाची उच्चांकी नोंद !

उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण मानल्या जाणार्‍या नाशिकमध्ये २८ एप्रिलला ४१.२ इतकी कमाल तापमानाची उच्चांकी नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यात ४ दिवस नाशिकमध्ये ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान होते.