सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त पुणे येथे २१ एप्रिल या दिवशी भव्य दिंडीचे आयोजन !

‘सनातन गौरव दिंडी’ची माहिती देण्यासाठी पुणे येथे पत्रकार परिषद

हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक श्री. सुनील घनवट, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, बोलतांना श्री. चैतन्य तागडे आणि अधिवक्ता मंगेश जेजुरीकर

पुणे, १९ एप्रिल (वार्ता.) – सनातन धर्माचा गौरव व्हावा, सनातन धर्माची सेवा आणि कार्य सर्वांपर्यंत पोचावे यांसाठी पुणे शहरात २१ एप्रिल या दिवशी ‘सनातन गौरव दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेच्या स्थापनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रौप्य महोत्सव साजरा करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून ही दिंडी आयोजित करण्यात आली आहे. धर्मप्रेमी, हितचिंतक आणि विविध समविचारी संघटना, तसेच समस्त हिंदु बांधवांनी जात, पक्ष, संप्रदाय विसरून मोठ्या प्रमाणात या दिंडीत सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. पुणे येथील पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट, ‘श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट जेजुरी संस्थान’चे विश्‍वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर आणि सनातन संस्थेचे श्री. चैतन्य तागडे आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची पत्रकारांना माहिती देण्यात आली.

श्री. चेतन राजहंस पुढे म्हणाले की,

१. सनातन धर्माविषयी समाजात अज्ञान आहे. सनातन धर्म हा नेहेमीच विश्‍व कल्याणकारी धर्म असतांना त्याला संपवण्याचे षड्यंत्र काही समाजविघातक शक्ती रचत आहेत. काही धर्मविरोधी शक्ती सनातन धर्माच्या विरोधात टीकाटिप्पणी करतांना आढळतात.

२. हे सर्वच थांबवण्यासाठी ही दिंडी आहे. दिंडीच्या माध्यमातून हिंदूंच्या एकजुटीचे दर्शन होणार आहे.

३. आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म आचरणात आणावे लागते. या दिंडीमध्ये सहभागी होणार्‍या सर्वांनाच आनंदाची अनुभूती घेता येईल.

दिंडी सनातन धर्माची आहे ! – श्री. चैतन्य तागडे, सनातन संस्था

श्री. चैतन्य तागडे

महाराणा प्रताप उद्यानापासून दिंडीचा प्रारंभ होऊन डेक्कन येथील विमलाबाई गरवारे प्रशालेच्या प्रांगणात दिंडीची सांगता होईल. पारंपरिक संस्कृती दर्शवणारी ५० हून अधिक पथके, २० हून अधिक आध्यात्मिक संस्था, संप्रदाय, मंडळे, मंदिरांचे प्रतिनिधी या दिंडीत सहभागी होणार.

ही दिंडी सनातन धर्माचा गौरव वाढवणारी असेल ! – श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

राष्ट्र आणि धर्म यांवर सध्या आघात होत आहेत, तसेच देवतांचे विडंबन, साधूसंतांवर वारंवार आक्रमणे होत आहेत. हे सर्व थांबवण्यासाठी हिंदु जनजागृती समिती सातत्याने कार्य करत आहे. हिंदु जनजागृती समितीचा सनातन संस्थेच्या कार्याला पाठिंबा आहे. ही दिंडी सनातन धर्माचा गौरव वाढवणारी असेल.

‘श्री खंडोबा देवता व लिंग कडेपठार ट्रस्ट जेजुरी संस्थान’चे विश्‍वस्त अधिवक्ता मंगेश जेजुरीकर यांनी सांगितले की, ‘आमचा या दिंडीला पूर्ण पाठिंबा आहे.’