‘१६.६.२०२३ या दिवशी एका संप्रदायाच्या संतांना रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम दाखवतांना आलेला अनुभव पुढे दिला आहे.
१. रामनाथी येथील सनातनचा आश्रम पहाण्याची जिज्ञासा नसणे
संत आश्रमात आल्यावर त्यांना आश्रम पहाण्याविषयी विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘मला अजिबात वेळ नाही. केवळ एका साधकाने सांगितल्यामुळे मी इथे आलो आहे.’’ तरीही आम्ही त्यांना ‘२० – ३० मिनिटे वेळ आहे का ?’, असे विचारल्यावर ते म्हणाले, ‘‘ठीक आहे.’’ यावरून मला त्यांच्यात जिज्ञासा जाणवली नाही.
२. सनातन संस्था निर्मित देवतांच्या चित्रांविषयीचे वैशिष्ट्य न पटणे
आम्ही त्या संतांना ध्यानमंदिरातील सनातन संस्था निर्मित देवतांच्या चित्रांविषयी माहिती सांगितली. मी म्हणालो, ‘‘ही देवतांची चित्रे साधकांनी गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या) मार्गदर्शनानुसार साधना म्हणून सिद्ध केलेली आहेत. त्यामुळे या चित्रांत बाहेर बनवलेल्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात देवतेचे तत्त्व आहे आणि अशा चित्रांच्या पूजनाने व्यक्तीला अधिक लाभ होतो.’’ तेव्हा संत म्हणाले, ‘‘या चित्रांची प्रतिदिन पूजा करत असाल ना ? त्यामुळे देवतेचे तत्त्व येतेच.’’ यावरून त्यांना ‘सनातनने सिद्ध केलेली देवतांची चित्रे वैशिष्टपूर्ण आहेत, असे पटले नाही’, असे मला जाणवले (‘समाजातील लोकांनाही सनातन संस्था निर्मित चित्रांचे वैशिष्ट्य लक्षात येऊन ते त्यांच्याकडे आकर्षित होतात.’ – संकलक)
३. साधकांनी फलकावर चुका लिहिण्याचे महत्त्व न पटणे
मी संतांना सांगितले, ‘‘साधक फलकावर स्वतःच्या चुका लिहितात. त्यामुळे साधकांकडून पुन्हा त्या चुका टाळल्या जातात.’’ त्या वेळी संत म्हणाले, ‘‘फलकावर चुका लिहाव्या लागू नये; म्हणून साधक चुका करण्याचे टाळत असतील.’’ त्यांच्या या उत्तरावरून त्यांना ‘फलकावर चुका लिहिण्याचे महत्त्वही फारसे पटले नाही’, असे मला जाणवले.
४. संप्रदायातील प्रमुखांना संत कुणाला म्हणावे ? याविषयी ठाऊक नसणे
शेवटी आश्रमातून निघतांना संतांनी मला विचारले, ‘‘तुमचे संत कसे ओळखायचे ? त्यांना काही ड्रेस कोड (विशिष्ट वेशभूषा) नाही का ?’’ त्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘आत्मिक (आध्यात्मिक) उन्नती झाली की, ते संत झाल्याची अनुभूती इतरांना येते.’’ यावर ते मला म्हणाले, ‘‘तसे नाही. समाजातील व्यक्ती तुमच्या संतांना कसे ओळखतील ?’’ तेव्हा दुसरी एक साधिका त्यांना म्हणाली, ‘‘संतांची ओळख पटण्यासाठी अधिवेशन स्थळी ज्यांच्या गळ्यात भगव्या रंगाचे दोरे असलेले बिल्ले (बॅच) आहेत, ते संत आहेत.’’ त्यावरही त्यांचे समाधान झाले नाही. नंतर आम्ही त्यांना सांगितले, ‘‘आम्ही समाजाला ओळख पटावी; म्हणून संतांचा परिचय करून देतो.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘तुमच्या गुरूंची भेट झाली असती, तर मी त्यांना हे नक्कीच विचारले असते.’’ यावरून त्यांना ‘संत कुणाला म्हणावे किंवा संत कसे असतात ?’, याचीही माहिती नाही, तसेच ‘अन्य संप्रदायांत केवळ वरवर केलेल्या पेहरावावरूनच संत असल्याचे निकष ठरवतात’, असे लक्षात आले.
५. जिज्ञासा नसल्याने शिकण्याच्या स्थितीत नसणे आणि स्वतःचा संप्रदाय श्रेष्ठ वाटणे
‘त्या संतांचे हावभाव आणि प्रश्न विचारण्याची पद्धत यावरून त्यांना त्यांचे कार्य अन् संप्रदायच श्रेष्ठ वाटतो. त्यामुळे ‘ते त्यांच्या संप्रदायाच्या विचारधारेपुरतेच मर्यादित असल्याने त्यांना माहिती जाणून घेण्याची फारशी जिज्ञासा नव्हती’, असे मला वाटले.’
– श्री. प्रसाद देव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.६.२०२३)