Western Nations Favouring Pakistan : पाश्‍चात्त्य देशांनी भारताऐवजी पाकिस्तानला दीर्घकाळ शस्त्रपुरवठा केला ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी सुनावले !

म्यूनिक (जर्मनी) – अनेक पाश्‍चात्त्य देशांनी आतापर्यंत भारताऐवजी पाकिस्तानला शस्त्रपुरवठा करण्यास प्राधान्य दिले; मात्र गेल्या १० ते १५ वर्षांत अमेरिकेसमवेतच्या संबंधांमध्ये पालट झाले. नवीन शस्त्रपुरवठादारांच्या रूपात अमेरिकेसह रशिया, फ्रान्स आणि इस्रायल अशा प्रकारे वैविध्यता निर्माण झाली, असे विधान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी येथे एका मुलाखतीत केले. ते येथील सुरक्षा परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत.

सौजन्य : हिंदुस्थान टाइम्स 

जयशंकर म्हणाले की,

१. जगाने एक आर्थिक प्रारूप सिद्ध केले आहे. ते अन्यायकारक आहे. जागतिकीकरणाच्या नावाखाली अनेक देशांच्या अर्थव्यवस्था पोकळ झाल्या आहेत. अनेक देश मूलभूत गोष्टींसाठीही इतरांवर अवलंबून आहेत.

२. जागतिक व्यवस्था सध्या अनेक समस्यांना तोंड देत आहे. कोरोना महामारी, युक्रेनमधील युद्ध, गाझामधील युद्ध, अफगाणिस्तानातून नाटोची माघार आणि पालटते हवामान यांसारख्या घटना घडत आहेत. हे सर्व आमच्यासाठी आव्हान आहे; मात्र केवळ आंतरराष्ट्रीय व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठीच नाही, तर ही व्यवस्था पालटण्याचेच आव्हान आमच्या समोर आहे. (प्रस्थापित व्यवस्थाच उत्तम समजून त्यास पालटण्याचा विचार सर्वसाधारणपणे होत नसतो. भारत जागतिक स्तरावर या व्यवस्थेत पालट घडवून आणण्यासाठी नेतृत्व करत आहे. भारत सशक्त होत चालल्याचेच हे द्योतक होय. मग शत्रू राष्ट्रांशी एकाच वेळी भारताचे चांगले व्यापारी संबंध असोत अथवा ‘ग्लोबल साऊथ’ला सशक्त करण्याचे भारताचे प्रयत्न, हे सर्व वाखाणण्याजोगेच आहे. स्वार्थलोलुपता आणि कुरघोडी करण्याची वृत्ती असलेल्या जगात नि:स्वार्थपणा अन् व्यापकता हे हिंदु धर्माचे मूलभूत गुणच भारताच्या या प्रयत्नांमागे दडलेले आहेत, हे विसरता कामा नये !  – संपादक)