गोवा : दंगल घडवल्याच्या प्रकरणी २० जणांच्या विरोधात गुन्हा नोंद

गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांनी आक्रमण केल्याचे प्रकरण

पणजी, २० फेब्रुवारी (वार्ता.) : दक्षिण गोव्यात सां जुझे दी आरियल (नेसाई) येथील एका खासगी जागेत १९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी शिवजयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करून निघतांना राज्याचे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर धर्मांध ख्रिस्त्यांनी मातीचे गोळे फेकून आक्रमण केले होते. दक्षिण गोवा पोलिसांनी या प्रकरणी २० अज्ञातांच्या विरोधात अधिकृतपणे जमाव जमवून दंगल घडवणे, दगड फेकणे, मंत्री सुभाष फळदेसाई यांना अडवणे आदी आरोपांवरून प्रथम दर्शनी अहवाल (एफ्.आय.आर्.) नोंदवला आहे.

या घटनेच्या वेळी मंत्री फळदेसाई यांना किरकोळ दुखापत झाली होती आणि कायदा अन् सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला होता. मंत्री सुभाष फळदेसाई यांनी ‘राज्यात धार्मिक सलोखा टिकून रहावा यासाठी आपण घटनेला अनुसरून तक्रार प्रविष्ट (दाखल) करणार नाही’, असे यापूर्वी म्हटले आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर रेघ जरी ओढण्याचा प्रयत्न झाल्यास शिवप्रेमी गप्प बसणार नाही ! – बजरंग दल

सां जुझे दी आरियल येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर रेघ जरी ओढण्याचा प्रयत्न झाल्यास शिवप्रेमी गप्प बसणार नाहीत, अशी चेतावणी बजरंग दलाचे नेते विराज देसाई यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पुतळ्याला संरक्षण दिल्याचे वृत्त आहे.


सविस्तर वृत्त वाचा → Goa Shivjayanti Christian Attack : गोव्यात शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी गेलेले मंत्री फळदेसाई यांच्यावर ख्रिस्त्यांचे आक्रमण !


सां जुझे दी आरियल पंचायत मंडळाने पुढील कृती योजना निश्चित करण्यासाठी घेतली बैठक

१९ फेब्रुवारी या दिवशी सकाळी घडलेल्या घटनेनंतर सायंकाळी सां जुझे दी आरियल पंचायत मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कृती योजना निश्चित करण्यासाठी बैठक घेतली आहे. या बैठकीला पंचायत मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ यांनी उपस्थिती लावली. सां जुझे दी आरियल पंचायतीने पुतळ्याशी संबंधित पुढील काम थांबवण्याची नोटीस १९ फेब्रुवारी या दिवशीच काढली आहे.

स्थानिक आमदार क्रुझ सिल्वा यांचे सां जुझे दी अरियालच्या पंचांसह जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

 (म्हणे) ‘अनुचित प्रकार घडल्यास ग्रामस्थ किंवा आमदार यांचे उत्तरदायित्व नाही !’

आमदार क्रुझ सिल्वा यांनी सां जुझे दी अरियालच्या पंच आणि काही स्थानिकांसह जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू ए. यांना निवेदन दिले. त्या निवेदनात म्हटले आहे की, बेनाभाटमध्ये पुतळा बसवण्याला ग्रामस्थांचा विरोध नाही; पण पंचायतीच्या अनुमतीविना, योग्य कागदपत्रांविना हा प्रकार घडल्याने नागरिकांकडून विरोध झाला. (असे आहे, तर हा प्रश्न सामोपचाराने सोडवता आला असता, त्यासाठी मंत्र्यांवर आक्रमण करण्यापर्यंत कृती का केली गेली ? – संपादक) शिवरायांचा पुतळा बसवलेली जागा निर्जन असून त्या ठिकाणी वीज किंवा वसाहत नाही. पुतळा बसवण्याची अनुमती उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांच्याकडून देण्यात आल्याने त्याच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व घ्यावे. काही अनुचित घडल्यास ग्रामस्थांवर किंवा आमदारांवर आरोप केले जाऊ नयेत. (शिवराय हे सर्व भारताचे दैवत आहे, मग त्यांच्या पुतळ्याचे उत्तरदायित्व आमदार का घेत नाहीत ? यावरून कुणी आमदारांच्या मनातील शिवरायांप्रतीच्या आदराविषयी शंका व्यक्त केल्यास चूक ते काय ? – संपादक)

(म्हणे)‘ग्रामस्थांचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न !’ – पंच जॉयसी डायस

सां जुझे दि आरियलच्या पंचायत सदस्य जॉयसी डायस यांच्यासह ग्रामस्थांनी माती आणि दगड फेकीच्या वेळी घायाळ झालेल्या फ्रेडी त्राव्हासो यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देतांना जॉयसी डायस म्हणाल्या, ‘‘शिवरायांच्या पुतळ्याला कुणाचाही विरोध नाही; पण पोलीस बंदोबस्तात ही बेकायदेशीर उभारणी झाली, त्याला विरोध आहे. (असे आहे, तर मंत्र्यांवर आक्रमण करण्याचे कारण काय ? – संपादक) पंचायतीकडे ‘काँक्रिट’ करण्यासाठी अर्ज केला होता. पुतळा बसवण्यासाठी नाही.

संपादकीय भूमिका

राज्याच्या मंत्र्यांवर आक्रमण झाले असतांना दुसर्‍या दिवशी गुन्हा नोंद करणारे पोलीस सामान्यांच्या संदर्भात कशी कारवाई करत असतील ?