छत्रपती संभाजीनगर येथे मद्यधुंद पोलीस अधिकार्‍याने सुरक्षारक्षकासह २ पर्यटकांना उडवले !

पोलिसांनी मद्यधुंद होऊन घातक प्रकार करणे पोलीस विभागासाठी लज्जास्पद !

छत्रपती संभाजीनगर – नाशिक येथे सीआयडी अधीक्षक असलेले आणि पूर्वी शहरात उपायुक्त राहिलेले पोलीस अधिकारी दीपक गिर्‍हे यांनी मद्यधुंद अवस्थेत तिघांना चारचाकीने उडवले. यात एका कुलगुरूंच्या बंगल्याचा रक्षक, तर बुलढाणा येथून आलेल्या २ पर्यटक यांचा समावेश आहे. ही घटना १९ जानेवारी या दिवशी दुपारी पहाडसिंगपुरा येथील लेणी रस्त्यावर घडली. तरुणांनी पाठलाग करत चारचाकीवर दगडफेक केल्याने गिर्‍हे यांनी चारचाकी खड्ड्यात घातली. तरुणांनी दीपक गिर्‍हे यांना घेरले. या वेळी त्यांनी तरुणांची क्षमा मागितली. मोठ्या पदावरील अधिकार्‍याच्या विनंतीला मान देत तरुणांनी माघार घेतली. छत्रपती संभाजीनगर पोलिसात कार्यरत असलेले उपायुक्त दीपक गिर्‍हे यांचे मुदतपूर्व स्थानांतर करून नाशिक येथे पाठवण्यात आले होते.