प्रभु श्रीरामाची जन्मभूमी असणार्‍या अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने होणारे सूक्ष्मातील परिणाम !

१. पृथ्वीवर देवतेचे मंदिर स्थापन होण्यामागील सूक्ष्मातील प्रक्रिया आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व

राम मंदिर

‘जेव्हा पृथ्वीवर एखाद्या देवतेच्या मंदिराची निर्मिती होते, तेव्हा संबंधित देवतेच्या तत्त्वलहरी ब्रह्मांडातील देवलोकातून पृथ्वीच्या दिशेने आकृष्ट होतात. त्या मंदिराच्या कळसाच्या माध्यमातून मंदिरात प्रविष्ट होतात. त्यानंतर या तत्त्वलहरी मंदिराच्या कळसातून थेट मंदिरातील देवतेच्या मूर्तीत आकृष्ट होऊन मंदिराच्या गाभार्‍यातील देवतेच्या मूर्तीमध्ये कार्यरत होतात आणि देवतेच्या मूर्तीतून त्या सभोवतालच्या वायूमंडलात प्रक्षेपित होतात. अशा प्रकारे एखाद्या देवतेचे मंदिर पृथ्वीवर स्थापन झाल्यामुळे ‘मंदिरात येणारे भाविक, मंदिराच्या भोवतालचा परिसर आणि पृथ्वीचे वायूमंडल’, या तिन्ही घटकांची शुद्धी होऊन ते सात्त्विक बनतात. त्यामुळे पृथ्वीवरील मानवांच्या मनात धर्माचरण आणि साधना करण्याच्या संदर्भातील सात्त्विक विचार येऊन त्यांच्याकडून धर्माचरण अन् व्यष्टी आणि समष्टी स्तरांवरील साधना होऊ लागते. पृथ्वीवर हिंदु धर्मातील देवतेचे मंदिर स्थापन झाल्यामुळे मनुष्याची भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही स्तरांवरील उन्नती होणार आहे.

२. श्रीरामाच्या मंदिराच्या निर्मितीमुळे भारतात सुप्तावस्थेत असणारी दैवी शक्ती जागृत होऊन भारत आध्यात्मिकदृष्ट्या शक्तीशाली होणार असणे

ज्याप्रमाणे मनुष्यामध्ये इडा, पिंगळा आणि सुषुम्ना या तीन नाड्या असतात, त्याप्रमाणे विराट पुरुषाच्या चंद्रनाडी, सूर्यनाडी अन् सुषुम्नानाडी, अशा ३ प्रमुख नाड्या असतात. विराट पुरुषाला परमेश्वरी तत्त्वाशी जोडणारी दिव्यतम अशी ‘ब्रह्मनाडी’ असते. भारतातील अयोध्येत प्रभु श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्यामुळे भारतदेश ब्रह्मनाडीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे वैश्विक स्तरावरील सकारात्मक ऊर्जा, चैतन्य, धर्मतत्त्व आणि ब्रह्मज्ञान यांचा प्रवाह पृथ्वीकडे चालू होणार असून तो भारतात कार्यरत होणार आहे. त्यामुळे भारतात नवचैतन्याचा संचार होणार आहे. भारतातील ५१ शक्तीपिठे, १२ ज्योतिर्लिंगे, अष्टविनायक, दत्तपिठे, ज्ञानपिठे, धर्मपिठे इत्यादी धार्मिक शक्तीस्थळांत सुप्तावस्थेत असणारी दैवी शक्ती जागृत होऊन भारत आध्यात्मिकदृष्ट्या शक्तीशाली होणार आहे. अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या मंदिराच्या रूपाने भूगर्भात खोलवर सुप्तावस्थेत असणारे धर्मबीज आणि ज्ञानबीज अंकुरित होणार आहे. त्यामुळे मानवजातीच्या कल्याणार्थ आवश्यक असणार्‍या अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यामध्ये भारतदेश संपूर्ण विश्वासाठी ‘विश्वगुरु’ म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

३. श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंमध्ये श्री दुर्गादेवी आणि हनुमान यांचे तत्त्व जागृत होऊन त्यांच्याकडून राष्ट्ररक्षण अन् धर्मजागृती यांचे कार्य होणार असणे

प्रभु श्रीरामाच्या कृपेने कर्महिंदूंमध्ये श्री दुर्गादेवीचे तत्त्व कार्यरत होऊन राष्ट्राचा उत्कर्ष होणार आहे, तसेच हनुमानाचे तत्त्व समस्त हिंदु भाविकांमध्ये जागृत होणार आहे. त्यामुळे त्यांचा राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान जागृत होऊन त्यांच्याकडून भारताच्या रक्षणाचे कार्य होणार आहे. श्रीरामाच्या कृपेमुळे कर्महिंदूंच्या मनात व्यष्टी स्तरावर हनुमानाप्रमाणे दास्यभाव आणि श्रीरामाप्रती भक्ती जागृत होऊन त्यांची व्यष्टी स्तरावरील साधना होणार आहे, तसेच त्यांच्यामध्ये समष्टी स्तरावर शौर्य जागृत होऊन त्यांच्याकडून हिंदु धर्माच्या रक्षणाचे पुनीत कार्य होणार आहे.

४. हिंदूंना विविध प्रकारचे बळ प्राप्त होऊन भारत बलसंपन्न हिंदु राष्ट्र होणार असणे

श्रीराम हा श्रीविष्णूचा सातवा अवतार आहे. श्रीविष्णूचे अवतार हे पृथ्वीवर धर्मसंस्थापना करण्यासाठी अवतरित होत असतात. त्यामुळे ते सर्व दृष्टींनी बलसंपन्न असतात. त्यामुळे श्रीरामाची उपासना करणार्‍या जन्महिंदूंतील रज-तमाचे प्रमाण न्यून होऊन त्यांच्यातील सात्त्विकता वाढल्यामुळे त्यांची आध्यात्मिक वाटचाल जन्महिंदूंकडून कर्महिंदूंकडे होणार आहे. अशा कर्महिंदूंना प्रभु श्रीरामाच्या अवतारी बळाची विविध रूपे असणारे बाहुबळ, मनोबळ, बुद्धीबळ, प्रज्ञाबळ किंवा ज्ञानबळ, धर्मबळ आणि आत्मबळ प्राप्त होऊन त्यांच्याकडून पुढीलप्रमाणे भारतामध्ये स्थुलातून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे अवतारी कार्य होणार आहे.

५. श्रीरामाच्या कृपेने अखिल विश्वातील सर्व कर्महिंदू चारही ऋणांतून मुक्त होणार असणे

प्रत्येक मनुष्यावर ‘देवऋण, ऋषिऋण, पितरऋण आणि समाजऋण’, ही ४ प्रकारची ऋणे असतात. श्रीरामाच्या मंदिराच्या स्थापनेनंतर संपूर्ण पृथ्वीवर श्रीरामाची अवतारी शक्ती आणि चैतन्य कार्यरत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण विश्वातील हिंदूंच्या मनात स्थुलातून हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची दैवी प्रेरणा जागृत होणार आहे. श्रीरामाच्या कृपेने धर्मसंस्थापनेच्या अवतारी कार्यात हिंदू सहभागी होणार असून हे दैवी कार्य पूर्णत्वास नेणार आहेत. श्रीराम हा श्रीविष्णूचा ७ वा अवतार असल्याने त्याच्या मंदिराची स्थापना केल्याने कर्महिंदू देवऋणातून मुक्त होणार आहेत. श्रीरामाच्या कृपेमुळे समस्त हिंदूंना हिंदूंचे धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचे दैवी ज्ञान मिळून त्यांच्याकडून ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम अन् संन्यासाश्रम या चारही आश्रमांप्रमाणे धर्माचरण आणि साधना होणार आहे. त्यामुळे हिंदूंच्या अतृप्त पितरांना गती मिळून हिंदूंवरील पितृऋण फिटणार आहे. हिंदूंनी धर्माचरण आणि साधना केल्यामुळे गोत्रप्रवर्तक, सत्यधर्मप्रवर्तक अन् धर्मरक्षक ऋषींची कृपा झाल्यामुळे कर्महिंदूंचे ऋषिऋण फिटणार आहे. त्याचप्रमाणे जागृत झालेले कर्महिंदू हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यामध्ये प्रत्यक्षरित्या सहभागी झाल्यामुळे समस्त हिंदु समाजाचा उद्धार होणार असल्याने कर्महिंदूंचे समाजऋणही फिटणार आहे. अशा प्रकारे समस्त हिंदूंवर श्रीरामाची कृपा झाल्यामुळे सर्व कर्महिंदू चारही ऋणांतून मुक्त होणार आहेत.

६. कर्महिंदूंमधील क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज जागृत होऊन त्यांचा ऐहिक अन् पारमार्थिक उत्कर्ष होणार असणे

अज्ञानी हिंदूंना हिंदु धर्माचे धर्मशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांचे ज्ञान प्राप्त झाल्याने त्यांच्यामध्ये ब्राह्मतेज जागृत होणार आहे अन् त्यांनी व्यष्टी स्तरावरील साधना केल्यामुळे त्यांना मोक्षप्राप्ती होणार आहे, तसेच कर्महिंदूंनी समष्टी स्तरावर संपूर्ण पृथ्वीवर रामराज्यरूपी अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यामुळे त्यांना पृथ्वीवरील राज्य उपभोगण्याचे सात्त्विक सुख प्राप्त होणार आहे. अशा प्रकारे प्रभु श्रीरामाच्या कृपेमुळे कर्महिंदूंचा ऐहिक आणि पारमार्थिक उत्कर्ष होणार आहे.

७. श्रीरामाची ‘राजाराम’ या रूपाची शक्ती कार्यरत झाल्यामुळे आदर्श आणि दैवी गुणसंपन्न राजा उदयास येणार असणे

अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिर स्थापन झाल्यामुळे श्रीरामाच्या अनेक आदर्श रूपांपैकी त्याचे ‘आदर्श राजा’ हे रूप कार्यरत होणार आहे. त्यामुळे संपूर्ण पृथ्वीवर ‘अखंड हिंदु राष्ट्र’रूपी राजारामाचे ‘रामराज्य’ स्थापन होणार आहे. श्रीरामाची ‘राजाराम’ या रूपाची शक्ती कार्यरत झाल्यामुळे राजारामाप्रमाणे आदर्श राजा उदयास येणार आहे.

७ अ. आदर्श राजामध्ये असणारी दैवी लक्षणे : या राजामध्ये प्रभु राजारामाप्रमाणे ‘बुद्धीमान, कुलीन, इंद्रियनिग्रह असणारा, विद्यासंपन्न, पराक्रमी, मितभाषी, यथाशक्ती दान करणारा आणि कृतज्ञ असणारा’, हे तेजस्वी राजाचे अष्टगुण विद्यमान असणार आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये हनुमंताप्रमाणे ‘बुद्धी, बळ, कीर्ती, धैर्य, निर्भयता, निरोगीपणा, चपळता आणि वाक्पटूत्व’ हे दैवी अष्टगुणही असणार आहेत.

८. मंदिरात श्रीरामपंचायतनाची स्थापना झाल्यामुळे सूक्ष्म स्तरावर होणारे परिणाम

अयोध्येतील श्रीरामाच्या मंदिरात श्रीरामपंचायतनाची स्थापना झाल्यामुळे अयोध्येच्या भूमीमध्ये सुप्तावस्थेत असणारे श्रीरामतत्त्व जागृत होऊन प्रगट अवस्थेत श्रीरामपंचायतनातील घटकांच्या रूपाने कार्यरत होणार आहे. पृथ्वीवरील समस्त कर्महिंदूंना श्रीराम आणि सीता (जोडी), लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न अन् हनुमान या श्रीरामपंचायतनातून प्रक्षेपित झालेली दैवी शक्ती अन् चैतन्य यांमुळे पुढीलप्रमाणे लाभ होणार आहेत.

९. पंचमहाभूते आणि महाकाळ प्रसन्न झाल्यामुळे अनुक्रमे निसर्गचक्र अन् कालचक्र अनुकूल होणार असणे; परिणामस्वरूप धर्माधिष्ठित साम्राज्ये प्रदीर्घकाळ टिकून रहाणार असणे

राजा आणि प्रजा दोन्ही धर्माचरण अन् साधना करणारे असल्यावर धर्माचे मूर्तीमंत स्वरूप असणार्‍या विविध देवता आणि ऋषिगण त्यांच्यावर अत्यंत प्रसन्न होतात अन् संपूर्ण राज्यावर भरभरून कृपावर्षाव करतात. त्यामुळे पंचमहाभूततत्त्वे शांत होऊन तारक स्थितीत कार्यरत होतात. परिणामस्वरूप निसर्गचक्र मानवाला अनुकूल होते. धर्माचरण आणि साधना यांमुळे महाकाळ, म्हणजे शिवाचे परम रूप प्रसन्न होते. त्याचा परिणाम काळावर होऊन कालचक्र धर्मचक्राला अनुरूप होते. त्यामुळे धर्माधिष्ठित साम्राज्ये उदयास आल्यावर ती प्रदीर्घकाळ टिकून रहातात; परिणामस्वरूप अशा राज्यांतील राजा आणि प्रजा हे मुक्ती अन् मोक्ष यांचे मानकरी होतात.

१०. अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने भारतात हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली जाणार असणे

कु. मधुरा भिकाजी भोसले

अशा प्रकारे ‘सर्व दृष्टींनी आदर्श असणार्‍या रामराज्याची स्थापना होण्यासाठी अयोध्येत प्रभु श्रीरामाचे मंदिराची निर्मिती होणे’, हे अत्यंत आवश्यक आहे. या मंदिराच्या स्थापनेमुळे राजारामाप्रमाणे सर्वार्थांनी आदर्श असणार्‍या आणि दैवी गुणांनी संपन्न असणार्‍या आदर्श हिंदु राजाचा उदय होणार आहे. त्यामुळे श्रीरामाच्या जन्मभूमीत, म्हणजे अयोध्येत श्रीरामाच्या मंदिराची निर्मिती झाल्याने भारतात हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे आणि येणार्‍या काळात हे दैवी कार्य पूर्णत्वास जाणार असून अखिल धरणी, म्हणजे ‘एकछत्र हिंदु राष्ट्र’ होणार आहे.

११. प्रार्थना

‘हे श्रीरामा, ‘आम्हा हिंदूंवर तुझी कृपा होऊन आदर्श राजा आणि आदर्श प्रजा यांची निर्मिती लवकरात लवकर होऊ दे अन् संपूर्ण सृष्टीचे कल्याण करणार्‍या अखंड हिंदु राष्ट्राची स्थापना या धरणीवर लवकरात लवकर होऊ दे’, हीच तुझ्या चरणी आम्हा कर्महिंदूंची आर्त प्रार्थना आहे.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.११.२०२३)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.