श्रीराममंदिराकडून रामराज्याकडे !

५ ऑगस्ट २०२० या दिवशी एका महान कार्याला प्रारंभ झाला. अयोध्येमध्ये मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराममंदिर पुनर्उभारणीचे महान कार्य चालू झाले. असंख्य रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा श्रीराममंदिरासाठी भूमीपूजनाचा सोहळा अयोध्येत पार पडला. हा दिवस श्रीराममंदिराचा लढा उभारणार्‍या हिंदूंसाठी अतिशय महत्त्वाचा आणि तितकाच आनंददायी होता.

पूर्वी श्रीरामजन्मभूमीवर उभारलेला बाबरी ढाचा आणि आता पुन्हा राममंदिर हा जवळजवळ ५०० वर्षांचा काळ हिंदूंसाठी संघर्षाचा होता. बाबरी ढाचा वर्ष १५२९ मध्ये रामजन्मभूमीवर बांधण्यात आला. वर्ष १९९२ मध्ये हिंदु कारसेवकांनी तो तेथून हटवून हिंदूंच्या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली; मात्र हा लढा पूर्ण व्हायला वर्ष २०२० उजाडावे लागले. आज प्रभु श्रीरामाच्या कृपेने पुन्हा एकदा मंदिर उभे रहात आहे. हा आनंद साजरा करत असतांना आपण कारसेवकांचे योगदान आणि त्यानंतर झालेल्या दंगलीमध्ये सहस्रो हिंदूंचा मृत्यू विसरता कामा नये.

रामराज्याची निर्मिती करण्यासाठी काय करायचे ?

यासाठी आणखी एक गोष्ट करावी लागेल आणि ती म्हणजे ही संकल्पना आधी लोकांपर्यंत पोचवावी लागेल. याविषयी असणारे गैरसमज दूर करावे लागतील. अगदी लहान मुलांनाही हे रामराज्याचे स्वप्न पहायला शिकवावे लागेल. त्यांच्यावर शाळेतून संस्कार करावे लागतील की, आपल्याला रामराज्याची निर्मिती करायची आहे. याचा प्रारंभ आपण श्रीराममंदिरापासून करू शकतो. त्यापासून आपण प्रेरणा घेऊन आपल्याला रामराज्याकडे जाण्याचा प्रवास चालू करायचा आहे. हा प्रवास मोठा आणि संघर्षमय असेल; परंतु यात आपण नक्कीच यशस्वी होऊ; कारण रामराज्याची निर्मिती यापूर्वीही आपल्या राष्ट्रात झाली आहे. जशी श्रीराममंदिराची उभारणी झाली, तशीच रामराज्याची स्थापना आपल्याला करायची आहे. त्यासाठी आपल्या विचारांवर निष्ठा आणि संयम ठेवावा लागेल.

– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.


१. प्रभु श्रीरामाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ का म्हणतात ?

मर्यादापुरुषोत्तम प्रभु श्रीराम, म्हणजे मानवतेला पडलेले महान स्वप्न नव्हे, तर तो आहे खराखुरा इतिहास ! प्रत्यक्ष परमेश्वराने या भूमीवर जन्म घेऊन सर्व मर्यादा पाळून महान कसे व्हावे ? याचा घालून दिलेला वस्तूपाठ म्हणजे प्रभु श्रीराम ! मर्यादांचे पालन, म्हणजे कुठलीही चुकीची बंधने स्वतःवर घालून घेणे नव्हे, तर या विश्वाविषयी, परमेश्वराविषयी कृतज्ञ असणे आणि कोणतेही संकट आले, तरीही त्याला न डगमगता सामोरे जाऊन यशस्वी होणे. रामायणामध्ये महर्षि विश्वामित्र दशरथाला सांगतात, ‘तारुण्य, धन, सामर्थ्य आणि पितृसंपत्ती या ४ गोष्टींपैकी एखादी जरी गोष्ट हातात आली, तरी माणूस स्वतःला महान समजायला लागतो; मात्र तुझ्या पुत्राकडे या चारही गोष्टी असूनही तो उन्मत्त नाही.’ म्हणून श्रीरामाला ‘मर्यादापुरुषोत्तम’ म्हणतात. सगळी संकटे झेलून त्यांनी मानवाला सांगितले, ‘कितीही संकटे आली, तरी स्वतःच्या सामर्थ्यावरचा विश्वास आणि परमेश्वराविषयीची श्रद्धा ढळू द्यायची नाही. असे झाले, तर आपण यशस्वी होतोच.’

२. राममंदिर म्हणजे जगाला योग्य मार्ग दाखवणार्‍या महान वास्तूची निर्मिती !

अशा या श्रीरामाचे मंदिर आज उभे रहात आहे. हे मंदिर म्हणजे प्रत्येक हिंदूसाठी नव्हे, तर प्रत्येक मनुष्यासाठी महत्त्वाचे आहे. श्रीरामाने केलेला संघर्ष, त्याने पाळलेल्या मर्यादा, स्वतःच्या आयुष्यात केलेला त्याग आणि त्यानंतर निर्माण केलेले महान राष्ट्र या सगळ्याचे प्रतीक, म्हणजे हे मंदिर आहे. श्रीराममंदिर हे विश्वनिर्मितीच्या कार्याचे ऊर्जास्रोत आहे. स्वतःच्या धर्माविषयीची निष्ठा आणि समाजाविषयी कृतज्ञ रहाण्याच्या विचारांचे प्रतीक हे श्रीराममंदिर असेल, तसेच अशुभ, धर्मद्रोही, अधर्म अन् चुकीच्या गोष्टी यांच्याशी कसे लढावे ?, हेही श्रीराममंदिर शिकवेल. हे मंदिर पुनर्उभारणीचे कार्य, म्हणजे पैशाचा अपव्यय नव्हे, तर ती जगाला योग्य मार्ग दाखवणार्‍या महान वास्तूची निर्मिती आहे.

३. रामराज्य एक उत्तम राज्याची मानवतापूर्ण संकल्पना !

कु. अन्नदा मराठे

प्रभु श्रीराम हे एक महान राजे आहेत. ‘महान राज्य, म्हणजे रामराज्य’, असे म्हटले जाते; पण हे राज्य नक्की काय ते आपण आधी समजून घेतले पाहिजे. रामराज्य म्हणजे केवळ कोणती धार्मिक संकल्पना नाही, तर ती एक मानवतापूर्ण संकल्पना आहे. ज्यात परस्पर प्रेम, आदर आणि सुख-शांती आहे. संत गोस्वामी तुलसीदास ‘रामचरितमानस’मध्ये म्हणतात, ‘अल्पमृत्यु नहिं कवनिउ पीरा । सब सुंदर सब बिरुज सरीरा ।। नहिं दरिद्र कोउ दुखी न दीना । नहिं कोउ अबुध न लच्छन हीना ।।’, म्हणजे रामराज्यात कुणीही लहानपणी मृत्यू पावत नाही, कुणालाही कसलाही त्रास नाही, सगळ्यांचे शरीर सुंदर आणि निरोगी आहे, कुणीही हीन-दीन अथवा दुःखी नाही. कुणीही मूर्ख आणि अशुभ लक्षणांनी हीन नाही. आज समाजात असलेल्या संकटांविषयी या ठिकाणी सांगितले गेले आहे. बालमृत्यू, आरोग्याची समस्या, मानसिक स्वास्थ्य यांपैकी कोणतीही समस्या नसलेले राज्य म्हणजे रामराज्य !

आणखी एका श्लोकात संत तुलसीदास म्हणतात, ‘दैहिक, दैविक, भौतिक तापा, रामराज काहु नहीं व्यापा । सब नर करहिं परस्पर प्रीती । चलहिं स्वधर्म निरत श्रुति नीती ।’ म्हणजे रामराज्यामध्ये दैहिक, दैविक आणि भौतिक ताप नाहीत. सगळे मनुष्य परस्परांवर प्रेम करतात आणि धर्माचे पालन करतात. रामराज्य, म्हणजे तेथील लोकांचे परस्परांवर असलेले प्रेम आणि त्यांचे त्यांचा धर्म आणि कर्तव्य यांवर असलेले प्रेम ! प्रत्येकाने  आपापल्या कर्त्यव्याचे पालन केले, तर प्रत्येक जण सुखी होऊ शकेल. अशा या महान रामराज्याची आकांक्षा प्रत्येकाला असते.

४. रामराज्य आणण्यासाठीची आव्हाने

अशा या रामराज्याचा विचार करत असतांना आपण त्यासमोरील आव्हानांचाही विचार करायला हवा.

अ. श्रद्धेचे आव्हान : सगळ्यात महत्त्वाचे आव्हान, म्हणजे आज आपण आपल्या श्रद्धेपासून दूर गेलो आहोत. ही श्रद्धा, म्हणजे स्वतःचा धर्म, ईश्वर आणि काम (कार्य) यांवर असलेली श्रद्धा ! आपली आपल्या हिंदु धर्मावर श्रद्धा नाही. त्याची आपल्याला लाज वाटते. देवावर आपला विश्वास राहिला नाही. जरा स्वतःच्या मनाविरुद्ध गोष्ट घडली की, आपला देवावरचा विश्वास उडतो. स्वतःचे स्वतःच्या कामावरही प्रेम नाही. ते काम आपण मनापासून नाही, तर केवळ पैसे मिळतात म्हणून करतो.

आ. कर्तव्याविषयीची उदासीनता : रामराज्यासाठीचे आणखी एक आव्हान, म्हणजे कर्तव्याविषयीची उदासीनता ! आपण आपले कुटुंब, समाज आणि देश यांच्याप्रति असलेल्या कर्तव्याची जाणीव ठेवली पाहिजे. त्यात समन्वय ठेवला पाहिजे. कुटुंबाच्या सुखासाठी एखादी गोष्ट करत असतांना समाजाची हानी होणार नाही ना, हे पाहिले पाहिजे. कुटुंबाची नीट काळजी घेऊन आपण स्वतःचा थोडा वेळ समाज आणि देश यांसाठी काही चांगले कार्य करण्यास देऊ शकतो.

इ. नीतीमत्तेचे पालन : रामराज्यासाठी आणखी एक महत्त्वाचे, म्हणजे नीतीमत्तेचे पालन. आपण स्वतःच्या आयुष्यात नीतीमत्ता नक्कीच पाळू शकतो. स्वतःच्या सुखाचा विचार करत असतांना दुसरा आपल्यामुळे दुःखी होत नाही ना ? हे आपण पाहू शकतो. स्वतःची  इच्छा पूर्ण होत असतांना आपण इतका जरी विचार केला, तरी रामराज्य दूर नाही. ज्या हिंदु राष्ट्राची इच्छा सहस्रो हिंदू बाळगून आहेत, ते राष्ट्र रामराज्यापेक्षा वेगळे नाही. अगदी तसेच आहे. ज्यात धर्माविषयी श्रद्धा, देशाप्रती कर्तव्य आणि परस्पर नीतीमत्तेचे पालन महत्त्वाचे असेल.

– कु. अन्नदा विनायक मराठे, चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.