नागपूर येथे लाचप्रकरणी २ अधिकार्‍यांच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड जप्त !

‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’च्या अधिकार्‍यांसह दोघांना अटक !

नागपूर – केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) लाचप्रकरणी येथील हजारीपहाड भागातील ‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’चे मुख्य स्फोटक नियंत्रक पी. कुमार आणि विवेक कुमार या अधिकार्‍यांच्या निवासस्थानाची झडती घेतली. या झडतीत मालमत्तेच्या कागदपत्रांसह २ कोटी २० लाख ८६ सहस्र रुपयांची रोख रक्कम जप्त केली, तसेच ‘सीबीआय’च्या कार्यालयात नेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणी ‘सीबीआय’ने २ दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली अशोक कुमार दलेला आणि विवेक कुमार या अधिकार्‍यांसह दोघांना अटक केली होती.

श्रीपुरा येथील ‘मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ या आस्थापनाला मार्च २०२४ पर्यंत ७५ टक्क्यांपर्यंत इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर उत्पादन क्षमता वापरायची होती. त्यासाठी मागितलेल्या परवान्याची अनुमती मिळवून देण्यासाठी प्रियदर्शन देशपांडे यांच्या वतीने लाच देऊन काम करण्याचे ठरले होते. सेमिनरी हिल्स येथील ‘पेट्रोलियम अँड एक्सप्लोझिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशन’च्या (पेसो) कार्यालयाजवळ एका दुकानात ‘सीबीआय’ने सापळा रचून १० लाख रुपयांची लाच घेतांना ४ जणांना रंगेहात अटक केली होती. नागपूर येथील प्रियदर्शन देशपांडे आणि राजस्थानमधील मेसर्स सुपर शिवशक्ती केमिकलचे संचालक देवी सिंग कछवाह अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

संपादकीय भूमिका :

भरघोस वेतन आणि शासनाच्या सर्व सुविधा असतांनाही लाच मागणारे अधिकारी अन् कर्मचारी यांना बडतर्फ करून त्यांची मालमत्ता जप्त करण्याची, तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे. तसे केल्यासच धास्ती वाटून भ्रष्टाचार न्यून होईल !