पणजी, १ जानेवारी (वार्ता.) : राज्यात ठिकठिकाणी झालेल्या भीषण अपघातांमध्ये एकूण ५ जण ठार झाले आहेत. ३१ डिसेंबरच्या रात्री उशिरा झालेला अपघात आणि १ जानेवारी या दिवशी झालेले विविध अपघात यांमध्ये एकूण ५ जणांचा बळी गेला आहे. पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या खड्ड्याने माजी नगरसेवकाच्या मुलाचा बळी घेतला आहे, तर ताळगाव आणि भोम येथे झालेल्या स्वयंअपघातात, तर वाळपई येथे वाहनांमध्ये झालेल्या टक्करीत चालकांचा मृत्यू झाला आहे. वर्ष २०२३ मध्ये रस्ता अपघातांचे प्रमाण पूर्वीच्या वर्षापेक्षा अल्प असले, तरी मृतांची एकूण संख्या सुमारे ३०० पर्यंत पोचली आहे.
पणजी येथे ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत चालू असलेल्या रस्त्यांच्या कामांच्या दायित्वशून्यतेमुळे मळा येथील रूपेश हळर्णकर याला जीव गमवावा लागला आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अंतर्गत झालेल्या कामांच्या वेळी झालेल्या अपघातांतील हा तिसरा बळी आहे. अपघाताचे खापर लोकांनी संबंधित कंत्राटदारावर फोडले असले, तरी कंत्राटदाराने हा आरोप फेटाळला आहे. अपघाताच्या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील वीजपुरवठा बंद होता आणि त्यामुळे वाहनचालकांना तेथून जातांना जीव मुठीत घेऊन जावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ताळगाव येथे दुसर्या अपघातात जिप्पी भगत या २२ वर्षीय तरुणाचा स्वयंअपघातात मृत्यू झाला. ताळगाव येथे झालेल्या अन्य एका अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. घायाळ अवस्थेत त्याला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नेण्यात येत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मुस्लिमवाडा, भोम येथे रात्री दुचाकीची वीजखांबाला धडक बसल्याने झालेल्या अपघातात प्रतिम रोमन बोरा (वय ३१ वर्षे, रहाणारा मुस्लिमवाडा, मूळचा आसाम) याचा त्याच्या वाढदिनाच्या दिवशीच मृत्यू झाला. वाळपई येथे श्री हनुमान मंदिराजवळ चारचाकी आणि दुचाकी यांच्यामध्ये झालेल्या अपघातात पोलीस हवालदार उल्हास गावकर (वय ३२ वर्षे, रहाणारा डोंगुर्ली, ठाणे) हा गंभीररित्या घायाळ झाला. गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार चालू असतांना त्याचे निधन झाले. तो फोंडा पोलीस ठाण्यात कार्यरत होता.