पितरांना किंवा लिंगदेहांना गती देणारा !
पितृपक्षात दत्ताचा नामजप केल्याने पितरांना लवकर गती मिळते; म्हणून त्या काळात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ६ घंटे (७२ माळा) नामजप करावा. दत्ताच्या नामजपाच्या व्यतिरिक्त अन्य वेळी प्रारब्धामुळे त्रास होऊ नये, तसेच आध्यात्मिक उन्नती व्हावी; म्हणून सर्वसामान्य मनुष्याने किंवा प्राथमिक अवस्थेतील साधकाने आपल्या कुलदेवतेचा नामजप जास्तीतजास्त करावा.
पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण करणारा !
दत्ताच्या नामाने अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण कसे होते ?
दत्ताच्या नामजपातून निर्माण होणार्या शक्तीने नामजप करणार्याच्या भोवती संरक्षक-कवच निर्माण होते. बहुतेक जण साधना करत नसल्यामुळे ते मायेत सर्वाधिक गुरफटलेले असतात. यामुळे मृत्यूनंतर अशांचा लिंगदेह अतृप्त रहातो. असे अतृप्त लिंगदेह मर्त्यलोकात अडकतात. (मर्त्यलोक हा भूलोक आणि भुवलोक यांच्या मध्ये आहे.) दत्ताच्या नामजपामुळे मर्त्यलोकात अडकलेल्या अतृप्त पूर्वजांना गती मिळते. त्यामुळे पुढे ते त्यांच्या कर्मानुसार पुढच्या पुढच्या लोकात गेल्याने साहजिकच त्यांच्यापासून व्यक्तीला होणार्या त्रासाचे प्रमाण घटते. त्यासाठी त्रासाच्या प्रमाणानुसार ३, ९ किंवा त्यापेक्षा अधिक माळा दत्ताचा नामजप करावा लागतो.
पितरांना गती देणे आणि जिवाला पितृऋणातून मुक्त होण्याची संधी देणे
‘मानवाच्या पूर्वजांना गती देऊन आणि मानवाला होणारा पूर्वजांचा त्रास न्यून करून दत्तात्रेय मानवावर कृपा करत आहे. पूर्वजांना गती देण्यासाठी केलेल्या विधींमुळे आणि दत्तात्रेयाच्या नामजपामुळे मानवाला पितृऋणातून मुक्त होण्याची संधी ईश्वर देत असतो. स्वबळाने, पितरांची आठवण काढून, घरात पितरांची छायाचित्रे लावून किंवा वर्तमानपत्रात पितरांची छायाचित्रे छापून पितरांच्या ऋणातून मुक्त होता येत नसते. दत्तात्रेयाचा नामजप केल्यावर खर्या अर्थाने पितरांना गती मिळते
आणि आपण पितृऋणातून काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. यावरून असे लक्षात येते की, पितृऋणातून मुक्त होण्यासाठी देवतांची उपासना करणे अनिवार्य आहे. त्यामुळे आपल्यावर असलेले देवऋणही न्यून होण्यास साहाय्य होते.’
– एक दत्तभक्त (कु. मधुरा भोसले यांच्या माध्यमातून)
जिवांना मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी ब्रह्मदेवाने दत्ताची निर्मिती करणे !
१. ‘दत्ताची निर्मिती
निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये जन्म घेणार्या जिवांना मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी ब्रह्मदेवाने श्रीविष्णु आणि शिव यांच्या साहाय्याने दत्ताची निर्मिती केली.
२. दत्ताचे कार्य
अ. सत्ययुग : दत्ताचे प्रमुख कार्य म्हणजे जिवांना मोक्षप्राप्तीसाठी मार्ग सोपा करणे, उदा. सत्ययुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता जास्त असायची; तरीही दत्ततत्त्व कार्यरत होते.
त्रेतायुगापूर्वी दत्ताचे कार्य आणि त्रेतायुगानंतर संतपरंपरेला प्रारंभ होणे
‘दत्त ही वैराग्यमूर्ती असल्याने ती धर्म-अधर्माच्या युद्धात अप्रत्यक्षपणे सहभागी होते; म्हणून सत्ययुगावर असणारा त्रैमूर्तीचा प्रभाव कुणाच्या लक्षात आला नाही, म्हणजेच ‘स्थुलातून युद्ध घडले आहे’, असे कुणी अनुभवले नाही. दत्तात्रेयाच्या प्रभावामुळे सत्ययुगातील आणि त्रेतायुगाच्या प्रारंभीचे जीव निर्गुण स्तरावरून ‘मुक्ती’ या संकल्पनेकडे गेल्याने ते जीवन-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले. त्रेतायुगानंतरच्या काळात रज-तमाचा धरणीला होणारा भार वाढू लागल्याने अनेक लोकांत अडकणार्यांची संख्या वाढली आणि त्यानंतर विविध संतपरंपरांना प्रारंभ झाला.’
– एक विद्वान (श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ या ‘एक विद्वान’ या टोपण नावानेही भाष्य करतात.)
आ. त्रेतायुग : त्रेतायुगामध्ये जिवाची शब्दातीत ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता न्यून झाल्यामुळे शब्दांच्या माध्यमातून जिवाला ज्ञान प्राप्त होऊन मोक्षप्राप्ती सुलभतेने व्हावी, यासाठी दत्ताने संस्कृत भाषेची निर्मिती केली.
इ. कलियुग – कलियुगात दत्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ चालू करणे !
कलियुगामध्ये जिवाला स्वतःतील स्वभावदोष आणि अंह न्यून करून मोक्षप्राप्ती सुलभतेने करता येण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या माध्यमातून निर्गुण दत्ततत्त्वाने कार्यरत होऊन ब्रह्मांडात चक्रवार (या लहरी चक्राप्रमाणे फिरतात; म्हणून त्यांना ‘चक्रवार’ असे संबोधिले जाते.) फिरणार्या लहरींना इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती यांच्या सगुण-निर्गुण रूपामध्ये घनीभूत केल्यामुळे ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ उत्पन्न झाली. साक्षात निर्गुण दत्ततत्त्वाने निर्माण केल्यामुळे या प्रक्रियेमध्ये प्रारंभी ३० टक्के सात्त्विकता होती. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या अव्यक्त संकल्पामुळे सध्या या प्रक्रियेमध्ये ६५ टक्के सात्त्विकता आहे. याच कारणामुळे या प्रक्रियेच्या अंतर्गत स्वयंसूचना देतांना साधकांना त्रास देणार्या वाईट शक्तींना त्रास होणे, स्वतःला पुष्कळ चांगले वाटणे इत्यादी अनुभूती साधकांना येतात.’
– श्री गुरुतत्त्व (श्री. निषाद देशमुख यांच्या माध्यमातून)
(स्वतःत साधकत्व लवकर निर्माण व्हावे, यासाठी सनातनचे साधक ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’ नियमितपणे राबवतात. या विषयावरची सनातनची ग्रंथमालिकाही उपलब्ध आहे. – संकलक)
वाईट पूर्वजांना शिक्षा करणे
सांगूनही साधना न करणार्या आणि साधकांना त्रास देणार्या वाईट पूर्वजांना दत्तात्रेय कठोर शासन करतो !
मारक रूपाचे कार्य !
अधर्मी सहस्रार्जुनाचा नाश करण्यासाठी धर्माने लढणार्या परशुरामाला आशीर्वाद आणि स्वतःची शक्ती देणे
त्रेतायुगात सहस्रार्जुन नावाचा एक राजा होता. त्याने दत्तात्रेयाची अनेक वर्षे उपासना आणि तप करून दत्तात्रेयाला प्रसन्न करून घेतले होते. त्यामुळे त्याला दत्तात्रेयाकडून सहस्र बाहूंचे बळ असण्याचे वरदान मिळाले होते. त्याला युद्धात कोणीही पराभूत करू शकत नव्हते. परिणामस्वरूप तो उन्मत्त झाला आणि ऋषिमुनी अन् प्रजाजन यांच्यावर अत्याचार करू लागला. त्याने जमदग्नीऋषींच्या आश्रमात असलेल्या कामधेनूंपैकी ‘सुशीला’ ही गाय पळवली आणि तिला स्वतःच्या राजवाड्यात आणले. त्या वेळी परशुरामाने सहस्रार्जुनाशी युद्ध केले. युद्धाच्या वेळी सहस्रार्जुनाने दत्तात्रेयाचे स्मरण केले; पण त्या वेळी त्याच्या सहस्रभुजा प्रकट झाल्या नाहीत. तेव्हा दत्तात्रेय अवतरला आणि त्याने सांगितले, ‘तू अधर्माने वागत आहेस. त्यामुळे तुझी सिद्धी खर्च झालेली आहे. आता मी तुला कोणतेही साहाय्य करणार नाही.’ त्यानंतर सहस्रार्जुनाचे बळ न्यून झाले आणि परशुरामाने त्याचा वध केला. परशुराम हा दत्तात्रेयाचा शिष्य होता. याचाच अर्थ दत्तात्रेयाने अधर्मी सहस्रार्जुनाचा नाश करण्यासाठी धर्माने लढणार्या परशुरामाला आशीर्वाद आणि स्वतःची शक्ती दिली.
(संदर्भ : सनातनचा ग्रंथ – दत्त)
गुरूंची रूपे आणि त्यांचे (दत्ताचे) कार्य
१. ‘ब्रह्मा : शिष्यात गुणांची निर्मिती करणे
२. विष्णु : शिष्यात भक्तीभाव टिकवून ठेवणे
३. महेश : शिष्यात असलेल्या अवगुणांचा नाश करणे
साधकांच्या आयुष्यात जे घडते, ते गुरुच घडवून आणत असतात. त्यात तो जीव काहीच करत नसतो. गुरूंमुळे शिष्यात असलेले गुण वाढतात, त्याचा भक्तीभाव सातत्याने टिकून रहातो आणि त्याच्यात असलेल्या अवगुणांचा लय होतो. शिष्याला या गोष्टींची जाणीव व्हावी; म्हणून ईश्वर निरनिराळ्या प्रसंगांतून गुरूंचे महत्त्व लक्षात आणून देत असतो. जीवनात घडणार्या प्रत्येक घडामोडीचा नायक दुसरा कुणीतरी असल्याने कर्तेपणाचा भाव स्वतःकडे घेतल्यास अहंचा डोंगर वाढतो. गुरूंना शरण जाऊन त्यांच्या तीन रूपांकडे लक्ष केंद्रित केल्यास शरणागतभाव वाढून कर्तेपणाचा भाव लोप पावू लागतो. भक्तीभावामुळे अंतःकरण निर्मळ होऊन पुढच्या गतीस पात्र ठरून, ईश्वरी कार्याचे किंवा गुरुकार्याचे उत्तम सेवेकरी म्हणून पोचपावती मिळते. यासाठी साधकाने गुरूंची तीनही रूपे सातत्याने मनात ठेवून साधनेत मार्गक्रमण करावे.’
– श्रीकृष्ण (एका साधिकेच्या माध्यमातून)
गुरु साधकासाठी दत्ततत्त्व कार्यरत करतात !
‘ज्ञान, ध्यान, कर्म इत्यादी सर्व मार्गांतील सर्व अंगांनी साधना करणे ज्या जिवांना अवगत आहे, अशा जिवांचे ईश्वर गुरुकृपायोगानुसार साधनेसाठी, म्हणजेच ईश्वरी राज्याची स्थापना करण्यासाठीच्या साधनेसाठी नियोजन करतो. साधना करतांना एखादा जीव चुकीच्या मार्गदर्शनामुळे मार्ग चुकतो. त्यामुळे अनंत पीडांनी तो ग्रासून जातो. अशा जिवाला काय करावे ? काही कळत नाही, कुठेच मार्ग दिसत नाही. मार्ग शोधू लागल्यास अनंत अडचणी सामोर्या ठाकतात. अशा वेळी कोणत्या देवतेची उपासना करावयास हवी, हे समजण्यासाठी दत्ताची उपासना केल्यास साधनेसंदर्भात सूक्ष्मातून अथवा स्थुलातून अचूक मार्गदर्शन होते.
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या ईश्वरी नियोजनातील जिवाला काही कारणास्तव मार्ग मिळत नसल्यास परात्पर गुरु त्या जिवाला आवश्यक साधनेसंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात् दत्ततत्त्वाला कार्यरत करतात. दत्ततत्त्व गुरुकृपायोगात अखंड कार्यरत झाले आहे. त्यामुळे साधकांच्या साधनामार्गातील आध्यात्मिक अडचणी दूर होतात.’ – ब्रह्मतत्त्व (एका साधिकेच्या माध्यमातून)
सर्व जण मोक्षाला जाईपर्यंत श्री दत्तांचे कार्य चालूच रहाते !
अवतारही उदंड होती । सवेंचि मागुती विलया जाती ।
तैशी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ती । नाश कल्पांती असेना ॥
– श्रीधरस्वामीकृत रामविजय, अध्याय १३, ओवी २१
भावार्थ : दत्त गुरुतत्त्वाचे कार्य करत असल्याने सर्व जण मोक्षाला जाईपर्यंत दत्ताचे कार्य चालूच रहाते.