साधकाला इतरांसमोर बोलण्याची वाटणारी भीती घालवून त्याला आईच्या मायेने प्रत्येक गोष्ट शिकवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘प.पू. गुरुदेव, ‘जीवनात श्री गुरु लाभणे’, ही देवाची कृपाच आहे आणि त्या श्री गुरूंच्या आश्रमात सेवा करायला मिळणे’, ही सर्वात मोठी गुरुकृपा आहे. तुमच्या कृपेने मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्‍यावर जाऊन सेवा करण्याची संधी मिळाली. त्यामुळे ‘गुरु आपल्या शिष्यांना लहान-मोठ्या सर्व गोष्टी शिकवून परिपूर्ण करण्याचा कसा प्रयत्न करतात ?’, हे मला शिकता येत आहे. ‘एक आई आपल्या मुलांना कशा प्रकारे प्रेमाने घडवते’, हे मी अनुभवत आहे. माझे हे अनुभव मी आपल्या श्री चरणी अर्पण करण्याचा प्रयत्न करत आहे.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

१. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘नवीन ठिकाणी कसे रहायचे आणि बोलायचे ?’, हे शिकवणे

मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत प्रथमच दौर्‍यावर आलो, तेव्हा बाहेर ‘नवीन ठिकाणी कसे रहायचे किंवा कसे बोलायचे ?’, हे मला ठाऊक नव्हते. एखाद्या ठिकाणी गेल्यावर मला पटकन तिथे कुणामध्ये मिसळता यायचे नाही. तेव्हा त्या आईच्या मायेने मला सर्वांच्या समोर बोलवायच्या आणि माझी ओळख करून देऊन मला गुरुदेवांच्या आठवणी अन् त्यांच्या सेवेत असतांना शिकायला मिळालेली सूत्रे सांगायला लावायच्या. आरंभी बोलतांना कधी मला मध्येच काही सांगता आले नाही, तर त्या क्षणाचाही विलंब न लावता ते सूत्र स्वतःच सांगून मला सांभाळून घ्यायच्या.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सर्वांसमोर बोलण्याची भीती घालवणे

दैवी दौर्‍यावर असतांना आम्ही महर्षि सांगतील, त्या निरनिराळ्या ठिकाणी देवदर्शनासाठी जायचो. त्या गावात साधक असतील, तर तिथे तेथील साधकांसाठी सत्संग व्हायचा.

२ अ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी साधकांच्या सत्संगात बोलायला सांगून माझी सर्वांसमोर बोलण्याची भीती घालवणे : साधकांच्या सत्संगात आम्हालाही बोलायला सांगितले जायचे. मला सर्वांसमोर बोलण्याची फार भीती वाटायची. त्यामुळे मी इतर साधकांना पुढे करून त्यांना बोलायला सांगायचो आणि मी मागे राहून बोलणे टाळायचो. ‘मी बोलायचे टाळतो’, हे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या लक्षात आले. आपण कितीही प्रसंगापासून पळायचा प्रयत्न केला, तरी गुरु आपल्याला सोडत नाहीत. तसेच झाले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी माझे नाव घेऊन मला सत्संगाच्या आरंभीच बोलायला सांगितले. त्यामुळे माझी साधकांसमोर बोलण्याची भीती हळूहळू उणावली.

२ आ. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सत्संगात दौर्‍याची आणि दौर्‍यावरील साधकांची माहिती सांगण्याची सेवा करायला सांगणे : सत्संगाच्या आरंभी श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) ‘दौर्‍यावर आलेल्या साधकांची ओळख करून देणे आणि दौर्‍याविषयी माहिती सांगणे’, अशी सेवा करायचे. नंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ही सेवा माझ्याकडून करून घेतली. त्यांनी मला सत्संगात बोलायला शिकवून माझी सर्वांसमोर बोलण्याची भीती घालवली.

३. हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलता येत नसल्यामुळे बोलतांना चुका होणे, तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आधार दिल्यामुळे भीती उणावणे

मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात असतांना मला हिंदी किंवा इंग्रजी बोलण्याची आवश्यकताच नव्हती. मी सर्वांशी मराठीतूनच बोलायचो. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत दौर्‍यावर असतांना आम्हाला महर्षींच्या आज्ञेने भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. त्यामुळे काही ठिकाणी आम्हाला हिंदी किंवा इंग्रजी बोलावे लागायचे. मला हिंदी किंवा इंग्रजी योग्य प्रकारे बोलता येत नसे, त्यामध्ये बरेच मराठी शब्द यायचे. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला म्हणायच्या, ‘‘बोलतांना चुकले, तर चुकू दे. बोलून बोलून सराव होईल.’’ त्यांनी मला धीर दिल्यामुळे हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलण्याची माझी भीती उणावली आणि ‘देव बोलून घेईल’, अशी श्रद्धाही माझ्या मनात निर्माण झाली.

४. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी चुका सांगून घडवणे

बोलतांना माझे उच्चार चुकायचे, तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी त्याविषयी मला सांगून ते व्यवस्थित करून घेतले. कुंभार मडके बनवतांना त्याला प्रेमाने थापटतो, फिरवतो आणि अजून घट्ट होण्यासाठी भट्टीत भाजतो, तसे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ माझ्या चुका सांगून मला घडवत असत.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्‍यावर असतांना मला ‘गुरु माता, गुरु पिता…’, या एका भजनातील ओळीप्रमाणे त्यांचे रूप अनुभवता आले.

५. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे ‘ईश्वरप्राप्तीसाठी श्री गुरूंना अपेक्षित असे घडायचे आहे’, याची जाणीव होणे

ईश्वर स्वभावदोष आणि अहं विरहित अन् परिपूर्ण आहे. मला ईश्वरप्राप्ती करायची आहे, तर ‘माझे नियमितचे वागणे, बोलणे, रहाणे आणि विचार शुद्ध असायला हवेत. त्यासाठी ‘मला माझ्या नियमितच्या गोष्टींकडेही पुष्कळ लक्ष देऊन श्री गुरूंना अपेक्षित असे घडायचे आहे’, याची मला जाणीव झाली.

‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी दिलेली शिकवण मला साधनेतील पुढच्या टप्प्याला घेऊन जाणारी आहे’, अशी माझ्या मनात दृढ श्रद्धा आहे.

‘प.पू. गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ, तुम्ही या जिवाला साधनेसाठी सर्व गोष्टी शिकवून गुरुकार्य करण्यासाठी सिद्ध करत आहात. ‘ती शिकवण माझ्या अंतर्मनामध्ये जाऊदे. तुम्हाला अपेक्षित असे घडण्यासाठी तुम्हीच मला शक्ती द्या’, एवढीच तुम्हा तिन्ही गुरूंच्या चरणी प्रार्थना !’

– श्री. वाल्मीक भुकन, कांचीपुरम्, तमिळनाडू. (२२.११.२०२३)