पुणे येथून आणखी एक आतंकवादी कह्यात !

 ‘इसिस’च्‍या महाराष्‍ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँबस्‍फोट करण्‍याचा कट !

पुणे –  राष्‍ट्रीय अन्‍वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) १८ डिसेंबर या दिवशी ‘सॅल्‍सबरी पार्क’ परिसरात धाड घालून १९ वर्षीय तरुणाला चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. त्‍याच्‍याकडून संशयास्‍पद कागदपत्रे, भ्रमणभाषसंच जप्‍त करण्‍यात आला आहे. आतंकवादी विचारधारेचा प्रसार, तसेच तरुणांची माथी भडकावून त्‍यांना आतंकवादी कारवायांमध्‍ये ओढणार्‍या ‘इसिस’च्‍या महाराष्‍ट्र गटाकडून पुणे, मुंबईसह देशभरात बाँबस्‍फोट करण्‍याचा कट रचण्‍यात आला होता. हा तरुण पुण्‍यातील अरिहंत महाविद्यालयामध्‍ये शिकत आहे. त्‍याचे नाव साफवान शेख असे आहे. ‘एन्.आय.ए.’च्‍या पथकाकडून त्‍या तरुणाची चौकशी चालू आहे. बेंगळुरू येथील ‘इसिस मॉड्यूल’च्‍या ‘टेलिग्राम’च्‍या गटामध्‍ये हा तरुण सहभागी होता. त्‍यामुळे त्‍याची चौकशी चालू आहे. ‘एन्.आय.ए.’ने ठाणे, पुण्‍यासह राज्‍यातील वेगवेगळ्‍या भागांत ९ डिसेंबर या दिवशी धाडी टाकल्‍या होत्‍या.

‘एन्.आय.ए.’कडून १९ ठिकाणी शोधमोहीम !

पुण्‍यातील गुलटेकडी परिसरात रहाणार्‍या तरुणाकडेही ‘एन्.आय.ए.’ने चौकशी केली आहे. एन्.आय.ए.कडून आज दक्षिण भारतातील १९ ठिकाणी शोध चालू आहे.  महाराष्‍ट्रातील अमरावती येथेही धाड टाकण्‍यात आली आहे.