Prostitution Hub : बार्देश (गोवा) तालुक्याची वेश्याव्यवसायाचे ठिकाण होण्याच्या दिशेने वाटचाल !

‘अन्याय रहित जिंदगी’ संघटनेचा दावा

पणजी, २ डिसेंबर (वार्ता.) : राज्यात मागील १० वर्षांमध्ये वेश्याव्यवसायातून बाहेर काढलेल्या एकूण महिलांमधील ४७ टक्के महिला या बार्देश तालुक्यातील आहेत. यामुळे बार्देश तालुक्याचे सार्वजनिक आरोग्य धोकादायक बनत चालले आहे. ३ दशकांपूर्वी बायणा, वास्को हे वेश्याव्यवसायाचे ठिकाण म्हणून कुप्रसिद्ध होते.

बार्देश तालुक्याची सध्याची स्थितीही अशीच होत आहे, असा दावा ‘अन्याय रहित जिंदगी’ या वेश्याव्यवसायातून बाहेर काढण्यात आलेल्या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृतीशील असलेल्या संस्थेचे अरुण पांडे यांनी केला आहे.

मागील १० वर्षांत वेश्याव्यवसायातून ६२३ जणांना बाहेर काढण्यात आले आणि यामध्ये बार्देश तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे २९६ महिलांचा समावेश होता. ‘गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार ‘एड्स’बाधित रुग्णसंख्या सर्वाधिक बार्देश तालुक्यात आहे. ‘गोवा राज्य एड्स नियंत्रण सोसायटी’ने लैंगिक संबंधामुळे ‘एड्स’ची बाधा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, असे म्हटले आहे. अरुण पांडे म्हणाले, ‘‘वेश्याव्यवसायात वाढ झाल्यानंतर ‘एड्स’बाधित रुग्णांची संख्याही वाढत असते आणि हा वैश्‍विक नियम आहे. बायणा, वास्को येथेही ‘रेड लाईट’ विभाग असलेल्या ठिकाणी ‘एड्स’बाधित रुग्णसंख्या वाढून तेथील सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले होते.’’


हे ही वाचा –

‘वेश्या’ हा व्यवसाय नसून स्त्रियांना नाडणारी संघटित गुन्हेगारी ! – अरुण पांडे, ‘अर्ज’ संस्था
https://sanatanprabhat.org/marathi/708778.html